रत्नागिरीत करोनाबाधितांच्या संख्येत तिसऱ्या दिवशीही वाढ

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२६ मार्च) सलग तिसऱ्या दिवशी नव्या करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली. आज नवे ६२ रुग्ण आढळले, तर केवळ १२ रुग्ण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज नवे २८ रुग्ण आढळले, तर केवळ ५ जण करोनामुक्त झाले.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी १४, खेड ७, गुहागर १ आणि चिपळूण १५ (एकूण ३७). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी, दापोली आणि संगमेश्वर प्रत्येकी ३, खेड, मंडणगड आणि लांजा तालुका प्रत्येकी २, तर चिपळूण १० (एकूण २५). (दोन्ही मिळून ६२). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार ६१७ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ११०८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ९६ हजार ५६४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २६२ आहे. त्यातील सर्वाधिक ७९ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून १२३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज १२ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या नऊ हजार ९११ झाली आहे. करोनामुक्तीचा दर घटून ९३.३५ टक्के झाला आहे.

आज नव्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची संख्या ३७१ असून मृत्युदर ३.४९ टक्के आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२६ मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ५, तर एकूण ६ हजार ३८९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात सध्या २७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २८ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ६८४६ झाली आहे, तर आतापर्यंत जिल्ह्यात १८१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply