रत्नागिरीतील गायक अभिजित नांदगावकरचे पहिले गीत लवकरच प्रसारित

रत्नागिरी : सध्या पुण्यात राहणारा मूळचा रत्नागिरीतील गायक अभिजित नांदगावकर याचे “केव्हा केव्हा वाटते” हे पहिले प्रोफेशनल गीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रसारित होत आहे.

जगभरातील रसिकांमध्ये लोकप्रिय असलेल्या मराठी संगीत क्षेत्रातील नामांकित “स्मृतिगंध” या डिजिटल प्लॅटफॉर्मवर १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता हे गाणे प्रसारित होईल. स्वतः गीतकार, संगीतकार असलेल्या अभिजितने गीत गायिले आहे. एकवीस वर्षांपूर्वी हे गीत “ताक धिना धिन” या तत्कालीन लोकप्रिय कार्यक्रमात निर्मात्या नीना राऊत (“लोकमान्य, तान्हाजी” या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांच्या मातोश्री) यांनी आवर्जून समाविष्ट केले होते. अभिजितने तेव्हा पाहिलेले स्वप्न आता साकार होत आहे. अभिजितच्या गीताचे प्रथमच व्यावसायिक रेकॉर्डिंग केले आहे.

या गीताबाबत अभिजितने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, माझा पहिलावहिला व्हिडीओ अल्बम रसिकांच्या भेटीला येतोय, याची मला खूप उत्सुकता आहे. गाणे खूप सुंदर झाले आहे. आजच्या युवा पिढीसह सर्वांना हे गाणे आवडेल. गीताचे व्हिडीओ मेकिंग दिवंगत प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांच्या पुण्यातील अद्ययावत डॉन रेकॉर्डिंग स्टुडिओत झाले आहे. ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे.

गीताचे संगीत संयोजन समन्वयक म्हणून प्रसिद्ध संगीतकार मयुरेश माडगावकर यांनी काम पाहिले आहे, तर प्रसिद्ध गायक केवल वाळंज याने गीताचे रेकॉर्डिंग, मिक्सिंग आणि मास्टरिंग केले आहे. सांताक्रूझ-मुंबई येथील डीएम स्टुडिओत या गीताचे रेकॉर्डिंग झाले आहे. पुण्यातील डी सेव्हन फिल्म्स अँड मीडियाचे संचालक, तसेच दिग्दर्शक दिनेश पवार यांनी या गीताच्या व्हिडीओची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री पूनम घाडगे यांच्यावर हे गाणे चित्रित झाले आहे. या दोघांनीही उत्कृष्ट जबाबदारी सांभाळल्याने व्हिडीओ सुंदर झाला आहे. छायाचित्रण- गौरव कुंभार, संकलक शुभम राऊत, मेकअप-हेअर ड्रेसर वृषाली पानसरे, स्नेहल साळुंके, वेशभूषाकार माधुरी पवार, प्रॉडक्शन मॅनेजर यश शाह, समाधान बागुल या सर्वांनी आपले काम उत्तम केले आहे.

अभिजितला भाऊ गुरुदेव नांदगावकर, मित्र संजीव कबीर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. यश गोखले, चिराग गुजराते, दुर्वा बागवे, सतीश मेस्त्री, राज मेस्त्री, सौरभ मलुष्टे, अभिजित हेगशेट्ये, प्रवीण पावसकर, प्रणीत मेस्त्री, कैलास सोनवणे, योगेश सोनवणे, रितू सोनवणे, हर्षदा सोनवणे यांचेही सहकार्य लाभल्याचे अभिजितने सांगितले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply