रत्नागिरीत सलग चौथ्या दिवशी २०० हून अधिक करोनाबाधित, पाच जणांचा मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१२ एप्रिल) सलग चौथ्या दिवशी २०० हून अधिक करोनाबाधित आढळले. आज नवे २२७ रुग्ण आढळले, तर ७२ रुग्ण करोनामुक्त झाले. पाच जणांचा मृत्यू झाला.

आज राजापूर आणि मंडणगड वगळता इतर सात तालुक्यांमध्ये बाधित रुग्ण आढळले. सर्वाधिक रुग्ण उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील असून त्यातील ९२ जण चिपळूण तालुक्यातील आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ३२, दापोली २२, खेड २१, गुहागर २८, चिपळूण ७५, संगमेश्वर ७, लांजा ८. (एकूण १९३). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ३, खेड १, गुहागर ६, चिपळूण १७ आणि संगमेश्वर ७. (एकूण ३४) (दोन्ही मिळून २२७). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १२ हजार ७३३ झाली आहे.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार ९९ आहे. त्यातील सर्वाधिक १२७ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून ४४५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ७२ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ११ हजार १२२ झाली आहे. करोनामुक्तीचा दर आजही पुन्हा कमी झाला असून तो ८५.८१ टक्के झाला आहे.

आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ९१३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत एक लाख सात हजार ४९६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात पाच जणांच्या मृत्यूची नोंद आज झाली. १० एप्रिलपासून आजपर्यंत मरण पावलेल्यांची नोंद आज करण्यात आली. चौघांचा मृत्यू शासकीय रुग्णालयांत, तर एकाचा खासगी रुग्णालयात झाला. मृतांचा तपशील असा –
१० एप्रिल – चिपळूण, महिला (वय ७२). ११ एप्रिल – रत्नागिरी, पुरुष (५४), दापोली, पुरुष (६५). १२ एप्रिल – खेड, पुरुष (८४), मंडणगड, महिला (८२). या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ४०३ असून मृत्युदर ३.११ टक्के आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply