चिपळूणच्या दिशान्तर संस्थेला मराठी विज्ञान परिषदेचा पुरस्कार

रत्नागिरी : मराठी विज्ञान परिषदेने शेतीतील नावीन्यपूर्ण कामासाठी विविध पुरस्कारांची घोषणा केली आहे. चिपळूण येथील दिशान्तर संस्थेने अल्पभूधारक आणि भूमीहीन महिला शेतकऱ्यांच्या साथीने उभारलेल्या अन्नपूर्णा प्रकल्पांची दखल घेऊन परिषदेने संस्थेला बळीराजा पुरस्कार जाहीर केला आहे.

मराठी विज्ञान परिषदेतर्फे दर तीन वर्षांनी शेतीतील नावीन्यपूर्ण कामासाठी व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कार दिले जातात. त्यासाठी राज्यभरातील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम व कार्यक्रमांची नोंद घेऊन परीक्षक मंडळाकडून निवड केली जाते. राज्यभरातील स्पर्धकांमधून दिशान्तर संस्थेला बळीराजा अण्णासाहेब शिंदे पुरस्कार जाहीर केला आहे.

अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून अल्पभूधारक आणि भूमिहीन महिलांना शेतीतले सर्वतोपरी साह्य करीत शेतीतून पद, पैसा, प्रतिष्ठा मिळवून देण्याचे महत्तम काम संस्थेने केले. आतबट्ट्याच्या शेतीवर उतारा मिळवून शेतीतून अर्थक्रांती घडविण्यासाठी कल्पतेने आखलेल्या पंचसूत्रीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचेदेखील या सन्मानातून कौतुक करण्यात आले आहे. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र व दहा हजार रुपये असे आहे. अमरावतीचे प्रा. प्रतीक देशमुख यांना शंख किडीच्या निर्मूलनासाठी योजलेल्या उपायांसाठी वसंतराव नाईक पुरस्कार (दहा हजार रुपये) आणि औरंगाबादचे राजेंद्र नलावडे यांना पर्यावरणस्नेही शेतीसाठी ज्योती चापके पुरस्कार (पाच हजार रुपये) जाहीर झाला आहे. पुरस्काराची घोषणा परिषदेचे कार्यवाह अ. पां. देशपांडे यांनी केली.

मराठी विज्ञान परिषदेचा ५५ वर्धापन दिन २५ एप्रिल रोजी आहे. त्यादिवशी हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

दिशान्तर संस्थेने कोकणात गेल्या सहा वर्षांपासून सहकारातून, सामुदायिक, महिलांकडून नैसर्गिक शेती व दलालमुक्त विक्री व्यवस्था यशस्वीरीत्या अमलात आणली आहे. त्यातून तीन ठिकाणी अन्नपूर्णा प्रकल्प उभारण्यमात आले आहेत. महिला शेतकर्यांषनी तालुका स्तरापासून राज्यस्तरापर्यंत शेतीतील अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. शेतीतून स्वयंपूर्णता, अर्थप्राप्ती, श्रम सन्मान मिळतो, हे दाखवून देणारे हे प्रकल्प नावीन्यपूर्णच नव्हे, तर आदर्शवत पथदर्शी ठरले आहेत. मराठी विज्ञान परिषदेचा शेतीतील हा नावीन्यपूर्ण उपक्रमाचा सन्मान म्हणजे कष्टकरी-श्रमकरी महिलांचा गौरव असल्याची भावना दिशान्तर संस्थेतर्फे सीमा यादव, राजेश जोष्टे आणि संचालक मंडळाने व्यक्त केली आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply