रत्नागिरी : रत्नागिरी, चिपळूण आणि खेड शहरातील करोनाप्रतिबंधक लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार आता ऑनलाइन नोंदणीनंतरच लसीकरण होणार आहे. ऑनलाइन नोंदणी कशी करावी, याचा व्हिडीओ शेवटी दिला आहे.
रत्नागिरी शहरातील शासकीय रुग्णालय, झाडगाव आरोग्य केंद्र आणि कोकणनगर आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी नागरिकांनी आज मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामुळे सुरक्षित अंतराचे पालन होत नव्हते. वादावादीचे प्रकारही होत होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता. त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने शहरी भागासाठी लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २२ एप्रिलपासून रत्नागिरी, चिपळूण आणि खेड शहरातील लसीकरण केंद्रावर थेट जाऊन लस मिळणार नाही. आतापर्यंत रांग लावून लसीकरण केले जात होते. मात्र लस घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना आता ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर संबंधितांना मोबाइलवर मेसेज येईल. त्यानंतरच त्याने त्या वेळेनुसार लसीकरण केंद्रावर जायचे आहे. हा निर्णय फक्त शहरी भागातील लसीकरण केंद्रासाठीच घेण्यात आला आहे.
रत्नागिरी शहर, चिपळूण आणि खेड येथील २२ ते २६ एप्रिल या कालावधीतील लसीकरणाचे वेळापत्रक देण्यात आले आहे.

ऑनलाइन नोंदणी कशी करावी, याबाबतचा सोबतचा व्हिडीओ पाहावा.

