ग्रंथसंपदेने परिपूर्ण रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाची स्थापना १८२८ साली इंग्रजांच्या काळात झाली. तब्बल १९३ वर्षांची परंपरा असलेले महाराष्ट्रातील ते पहिले सार्वजनिक वाचनालय आहे. करोना महामारीच्या आजच्या काळात विद्यार्थ्यांनी, युवकांनी मिळालेला वेळ वाचनात, ग्रंथांच्या सहवासात घालवावा, सर्व नागरिकांनीही वाचनाचा आस्वाद घ्यावा, या उद्देशाने पुस्तक दिनाच्या निमित्ताने वाचनालयात असलेल्या ग्रंथसंपत्तीचा आढावा घेण्याचा प्रयत्न.
………

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाची ओळख सर्वांत जुने पण सर्वांत अद्ययावत वाचनालय अशी निर्माण व्हावी, म्हणून सतर्क राहत उपक्रम राबवले आणि त्या प्रत्येक उपक्रमाने वाचनालयाला अधिक सांस्कृतिक उंची दिली. स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन वाचनालयाने केले. अत्यंत आखीव रेखीव संमेलन म्हणून या संमेलनाची नोंद झाली. उत्तम साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्र, परिसंवाद, व्याख्याने यांची भरपूर मेजवानी सावरकरप्रेमींना मिळाली. या आयोजनाचे समाधान खूप वेगळे होते. नितीनजी गडकरी, अनंत गीते, श्रीपाद नाईक असे तीन केंद्रीय मंत्री या संमेलनाला उपस्थित होते. त्याचबरोबर या संमेलनाच्या आयोजनाचा खर्च वजा करता सात लाख रुपये वाचनालयाच्या निधीमध्ये जमा झाले.

असे विविध उपक्रम रत्नागिरीतील सांस्कृतिक, साहित्यिक चळवळीला गतिमान ठेवत असतात, तर रसिकांना साहित्यिक, सांस्कृतिक मेजवानीचा लाभ घेता येतो. वाचनालयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सजग होतो. ही सजगता सातत्याने राहावी, हे वाचनालय रत्नागिरीचे सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित व्हावे अशी मनोमन असलेली इच्छा असे कार्यक्रम, उपक्रम राबवण्यास उद्युक्त करते आणि रत्नागिरीतील जाणकार श्रोतृवर्ग सातत्याने भरभरून प्रतिसाद देतो हा अनुभव खूप संस्मरणीय असतो.

वाचनालयाचे खरे वैभव वाचनालयातील विपुल मौल्यवान दुर्मिळ ग्रंथसंपदा हेच आहे. ही ग्रंथसंपदा सातत्याने वाढवत नेण्याचे मूळ उद्दिष्ट आहे. वाचनालयाच्या विविध दालनांमध्ये अनेकविध साहित्य प्रकारचे ग्रंथ उपलब्ध आहेत. वाचकांची वाचनतृष्णा सातत्याने पुरवता येईल, असा ग्रंथखजिना कायम वाचकांच्या स्वागतासाठी सिद्ध असतो.

वाचनालयात चारही प्राचीन वेद – यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद, अथर्ववेद उपलब्ध आहेत. एकूण ३१२ प्रकारचे कोश या वाचनालयात जिज्ञासूंच्या अवलोकनाकरिता सज्ज आहेत. मराठी इंग्रजी शब्दकोश, सरिता कोश, मराठी विश्वकोशाचे बावीस खंड, संस्कृतिकोश, संप्रदाय कोश, तीर्थक्षेत्र आणि मंदिरे कोश, उपासना कोश, आचार्य कोश यासारख्या जिज्ञासूंना मेजवानी ठरतील, अशा कोशांनी वाचनालय समृद्ध आहे.

वाचनालयाच्या ग्रंथसंपदेची विविधता तीन हजार चरित्रे वाढवत आहेत. इंग्रजी साहित्याचे १५ हजार ५०० ग्रंथ, हिंदीचे एक हजार ५०० ग्रंथ, जुने ७० संस्कृत साहित्य, १८ हजार कादंबऱ्या, ५ हजार अनुवादित पुस्तके, २०० प्रवासवर्णने, सुमारे ३००० काव्यसंग्रह, वैद्यकशास्त्राचे मार्गदर्शन करणारे १६२३ ग्रंथ, १० हजार कथासंग्रह, मानसशास्त्रातील ५०० पुस्तके, संगीत नाटके, ऐतिहासिक पुस्तके, अध्यात्म-ज्योतिषावर प्रकाश टाकणारी पुस्तके अशा ग्रंथसंपदेने हे वाचनालय परिपूर्ण आहे. महाभारत, रामायण, विविध बखरी याचबरोबर नव्याने प्रकाशित होणारी पुस्तके वाचनालयामध्ये वाचकांसाठी उपलब्ध आहेत. छावा, स्वामी, झेप, ययाति, संभाजी, मृत्युंजय, युगंधर, पानिपत, माझी जन्मठेप, अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर, राजाशिवछत्रपती, श्रीमान योगी, सावरकर साहित्य, व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, साने गुरुजी, बाबा कदम, नारायण धारप, सुहास शिरवळकर, व्यंकटेश माडगूळकर, मंगेश पाडगावकर, कुसुम अभ्यंकर यांसारख्या लेखकांची कायम मागणी असलेली सर्व पुस्तके याचबरोबर आजच्या पिढीच्या पसंतीस उतरलेली मन में है विश्वास, अग्निपंख, हिंदू, मुसाफिर, माझा साक्षात्कारी हृदयरोग, महाश्वेता, युगंधरा, चकवा चांदण, स्मरणगाथा, क्रांतिकल्लोळ, टू द लास्ट बुलेट, सचिन तेंडुलकरांचे प्लेइंग ईट माय वे, सुधा मूर्ती, एस. एल. भैरप्पा, अमिश, महाबळेश्वर सैल, शिरीष कणेकर, सुदीप नगरकर, चेतन भगत, माधुरी शानभाग, विजया वाड, शोभा राऊत यांची सर्व पुस्तके वाचनालयात आहेत. बालमनाला भुरळ घालणारी फेलुदा, हॅरी पॉटर, शेरलॉक होम्स, फास्टर फेणे, यांच्या श्रृंखला अशी अनेक पुस्तके वाचनालयाच्या ग्रंथखजिन्यात आहेत.

वाचकांनी मागणी केलेले प्रत्येक पुस्तक वाचकाला उपलब्ध करून देण्यासाठी वाचनालय कटिबद्ध आहे. ग्रंथालयाच्या ग्रंथखजिन्यात नसलेले पुस्तक वाचकाने मागितले तरी ते उपलब्ध करून देऊन वाचकांना पुरवावे, हा कटाक्ष वाचनालयाने ठेवला आहे.

वाचकांना आपल्याला हव्या असलेल्या पुस्तकाचा शोध घेता यावा साठी वाचनालयाने एक ॲप विकसित केले आहे. Ratnagiri Nagar Vachanalay या नावाने हे ॲप प्ले स्टोअरमधून विनाशुल्क डाउनलोड करून घेता येते. त्यामध्ये वाचनालयातील पुस्तकांची माहिती असलेल्या अल्पशा माहितीच्या आधारे (पुस्तकाचे नाव/ लेखकाचे नाव/ प्रकाशकाचे नाव/ विषय) शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे.

पुढील दोन महिने शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचनालय मोफत सुविधा देणार आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. फुरसतीचा वेळ ग्रंथांच्या, पुस्तकांच्या अध्ययनात घालवून आपले व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी बनवता यावे, यासाठी ही उत्तम संधी असून विद्यार्थ्यांच्या पालकांनी, गुरुजनांनीही वाचनालयाच्या उपक्रमात आपला पाल्य सहभागी होईल हे आवर्जून पाहावे.

वाचनालयातल्या ग्रंथसंपदेचे संपूर्ण वर्णन करण्यासाठी खास शैली, ती विद्वत्ता माझ्या लेखणीत नाही. केवळ दार किलकिले करून आत डोकावून पाहण्याएवढे वर्णन करून वाचकांनी वाचनालयात यावे, हा ग्रंथसागर स्वतः पाहावा, वाचावा या अपेक्षेने पुस्तक दिनाच्या निमित्ताने माझे हे त्रोटक लिखाण.

  • ॲड. दीपक पटवर्धन
    अध्यक्ष,
    रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय, रत्नागिरी
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply