मंत्रिमहोदय जेव्हा गल्लीतील पाणी भरतात…

करोनाप्रतिबंधक वीकेंड लॉकडाउनचा उपयोग करून घेऊन रत्नागिरी शहरात मुख्य रस्त्यांना छेद देऊन छोट्या जलवाहिन्या किंवा जलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम नगरपालिकेने केले. ते खूपच चांगले झाले. पण ते करत असताना एका इमारतीकडे जाणारी जलवाहिनी फुटली. इमारतीचा पाणीपुरवठा बंद झाला. या इमारतीमध्ये चार डॉक्टर राहतात. कोविड रुग्णालयांमध्ये ते काम करतात. याच इमारतीत करोनाचे तीन रुग्णही राहतात. ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर त्या इमारतीला दररोज नियमित पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते. पण पालिकेच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद झाला. यात तसे वेगळे काही नाही. अंतर्गत जलवाहिन्या बसविण्यासाठी होणाऱ्या खोदकामामुळे आधीच्या काही जलवाहिन्या, टेलिफोनच्या तारा तुटू शकतात. वास्तविक योग्य ती खबरदारी घेतली तर त्या फुटू नयेत, पण विविध शासकीय कार्यालयांमध्ये समन्वय असूच नये, असा अलिखित नियम असल्यामुळे जलवाहिन्या, टेलिफोनच्या तारा तुटतात. शासकीय कार्यालयांच्या समन्वयातील अभावाची माहिती सर्वसामान्य नागरिकांना असल्यामुळे त्यांनाही त्याचे फारसे काही वाटत नाही. पण जलवाहिन्या फुटतात, तेव्हा तो प्रश्न गंभीर होतो. उन्हाळ्याच्या दिवसात तर पाण्याची अधिक गरज असते. अशा स्थितीत पाणीपुरवठा थांबल्याने इमारतीतील नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

एकीकडे इमारतीचा बंद झालेला पाणीपुरवठा आणि दुसरीकडे जलवाहिनी फुटल्यामुळे वाया जाणारे पाणी असे चित्र त्या इमारतीच्या बाबतीत निर्माण झाले. इमारतीतील सजग नागरिकांनी त्याची छायाचित्रे नगराध्यक्षांना पाठवली. एका स्थानिक नगरसेवकाने इमारतीच्या कोरड्या विहिरीत एक टॅंकर पाणी ओतून पाण्याची गरज काहीशी भागवली. पण मुख्य प्रश्न सुटला नाही. नगराध्यक्षांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. नगराध्यक्षांकडून काम झाले नाही. त्यामुळे रत्नागिरीचे आमदार आणि राज्य शासनातील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना या गल्लीतल्या एका इमारतीच्या पाणीपुरवठ्याकडे लक्ष द्यावे लागले. त्यांनी लक्ष देताच अवघ्या चोवीस तासांत इमारतीचा पाणीपुरवठा सुरू झाला.

ही म्हटले तर किरकोळ बाब आहे. पण एखाद्या गल्लीतल्या एखाद्या इमारतीच्या पाणीपुरवठ्यासाठी राज्य स्तरावरचे निर्णय घेणाऱ्या मंत्र्याला लक्ष द्यावे लागते, ही गंभीर बाब आहे. मंत्र्यांची कार्यतत्परता त्यातून दिसत असली, तरी त्यांना या छोट्याशा गोष्टीत का लक्ष घालावे लागले, हा प्रश्न आहे. मंत्र्यांनी लक्ष घातल्यानंतर जे काम २४ तासांत पूर्ण होऊ शकले, ते नगराध्यक्षांनी वेळीच लक्ष घातले असते, तर नक्कीच झाले असते. गळतीमुळे पाणी वाया गेले नसते. इमारतीतील नागरिकांची गैरसोय दूर झाली असती. कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीत समस्या दूर करणे हे नगराध्यक्षांचे काम होतेच, पण त्या इमारतीमध्ये करोनाचे रुग्ण राहत होते. करोनाविरुद्ध लढणारे डॉक्टर राहत होते. त्यातील एक डॉक्टर तर चरित्रकार आणि रत्नागिरीचे मानबिंदू असलेले डॉक्टर धनंजय कीर यांचे पुत्र होत. या साऱ्यांचे महत्त्व लक्षात घेऊन नगराध्यक्षांनी तरी या समस्येकडे लक्ष द्यायला काहीच हरकत नव्हती त्यांनी दखल घेतली नाही, म्हणूनच मंत्र्यांना या छोट्याशा कामासाठी लक्ष पुरवावे लागले. ही वास्तविक नामुष्की आहे. मंत्र्यांच्या दर्जाचे अवमूल्यन आहे. रत्नागिरी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, कचरा, सार्वजनिक स्वच्छतागृहे, गटारे असे इतर अनेक प्रश्नही असेच दुर्लक्षित आहेत. त्यामध्येही मंत्र्यांना लक्ष घालावे लागणार आहे की पालिकेतील सत्तारूढ नगराध्यक्ष आणि नगरसेवक ते आपले काम समजून करणार आहेत?

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ३० एप्रिल २०२१)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा ३० एप्रिलचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply