रत्नागिरी, चिपळूण शहरात खासगी वाहनांना पूर्णपणे बंदी

रत्नागिरी : करोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर करोना प्रतिबंधक संचारबंदीचा भाग म्हणून रत्नागिरी आणि चिपळूण शहरात केवळ अत्यावश्यक सेवेच्या वाहतुकीला मुभा देण्यात आली असून दुचाकी वाहनधारकांना आता हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज (७ मे) तसे आदेश जारी केले आहेत.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ या वेळेत दूध, अन्नधान्य, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना बाहेर पडण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु या वेळेत रत्नागिरी आणि चिपळूण शहरातील बाजारपेठेत दुचाकी वाहन चालक मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. चिपळूण शहरात काही दुचाकी चालक विनाहेल्मेट प्रवास करीत असून मोटार अधिनियमाचा भंग करताना दिसत आहेत.

ही स्थिती लक्षात घेऊन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी रत्नागिरी शहर आणि चिपळूण बाजारपेठेमध्ये सर्व प्रकारच्या खासगी वाहनांची वाहतूक बंद केली आहे. अत्यावश्यक सेवेतील मालवाहतूक वाहनांना मुभा राहील. आदेशाच्या पालनासाठी बॅरॅकेटिंगची व्यवस्था पोलीस यंत्रणा करणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी वाहनचालकांवर पोलीस विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग दंडात्मक कारवाई करणार आहेत.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply