फॅमिली डॉक्टर संस्थेचे पुनरुज्जीवन

करोनाचा वाढता प्रादुर्भाव कसा टाळायचा, ही एक मोठीच समस्या होऊन बसली आहे. सर्व तर्हेुचे सावधानतेचे इशारे जनतेला देण्यात आले. करोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले. अनेक वेळा लॉकडाउन पुकारण्यात आले. पण तरीही दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी झालेले नाही. आरोग्य यंत्रणेची अतिशय तारांबळ उडत आहे. सर्व तऱ्हेच्या सुविधा आणि साधनेही अपुरी ठरत आहेत. गावागावांमध्ये वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचलेल्या करोनाच्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फॅमिली डॉक्टरांची मदत घेण्याचे ठरविले आहे. अगदी सुरुवातीपासूनच या पद्धतीने त्यांची मदत घेतली गेली असती, तर कदाचित करोनाने उग्र रूप धारण केले नसते. पण रुग्णसंख्या वाढल्यानंतर का होईना, फॅमिली डॉक्टरांची आठवण झाली आहे, हेही खूप झाले.

आता प्रत्येक रोगाचे आणि प्रत्येक अवयवाचे स्पेशालिस्ट आहेत. मल्टिस्पेशालिटी रुग्णालये ठिकठिकाणी आहेत. शेकडो चाचण्या सहज उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे अशा चाचण्यांची गरज आहे का, याचाही विचार न करता डॉक्टर्स या चाचण्या करायला लावू लागले आहेत. लोकांना त्याची इतकी सवय झाली की एखाद्या डॉक्टरने अशा चाचण्या करायला सांगितले नाही, तर त्या डॉक्टरच्या ज्ञानाबद्दल लोकांना शंका येऊ लागल्या. त्यामुळे छोट्या-मोठ्या आणि सहज बऱ्या होऊ शकणाऱ्या अनेक आजारांकरिताही स्पेशालिस्टकडे जाण्याची प्रथा पडली. त्यामुळेच फॅमिली डॉक्टकर ही संकल्पना तशी आता मोडीत निघाली आहे.

अगदी ग्रामीण भागामध्ये मात्र काही डॉक्टर्स अजूनही अनेक कुटुंबांचे आरोग्य सांभाळत आहेत. त्यामध्ये सर्व शाखांच्या डॉक्टरांचा अंतर्भाव आहे. या डॉक्टरांना खरोखरीच अनेक कुटुंबांच्या आरोग्याविषयी, त्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीची माहितीही असते. करोनाच्या आजच्या काळात हेच फॅमिली डॉक्टर अनेक कुटुंबांचे आधार बनले आहेत. कारण साधा सर्दी-पडशाचा त्रास झाला तरी करोनाची तपासणी करावी लागण्याच्या भीतीने अनेक रुग्ण आपला आजार लपवतात. अंगावर काढतात. मोठ्या डॉक्टरांकडे जाण्याचे नाव तर ते काढतच नाहीत. त्यातूनही आजारांची गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. अनेक लोकांना या त्रासातून जावे लागले असू शकते. अशा स्थितीत त्यांना सावरणाऱ्या फॅमिली डॉक्टरांना आत्तापर्यंत राज्याच्या आरोग्य यंत्रणेने विचारातच घेतले नव्हते. फक्त करोनासारखी लक्षणे आढळलेल्या रुग्णांना शासकीय आरोग्य यंत्रणेकडे पाठवावे, असेच त्यांना सांगण्यात आले होते. ऑनलाइनच्या आजच्या काळात खरे तर त्यांच्याशी संवाद साधणे तसे अशक्य आणि कठीण नव्हते. आता ते विचारात घेण्यात आले आहे.

राज्यस्तरीय टास्क फोर्सचे सदस्य विभागवार राज्यातील अधिकाधिक फॅमिली डॉक्टरांशी ऑनलाइन संवाद साधत आहेत. त्यातून अनेक समस्यांची उकल होण्याची शक्यता टास्क फोर्सला वाटू लागली आहे. फॅमिली डॉक्टरांच्या मर्यादा आणि तरीही ग्रामीण भागात विणले गेलेले त्यांचे जाळे करोनाच्या प्रतिबंधाचा किती उपयोगी ठरू शकते, हेही टास्क फोर्सच्या लक्षात आले आहे. मुंबईतील काही बैठकांमध्ये मुख्यमंत्री सहभागी झाले होते. फॅमिली डॉक्टरांची ही ताकद त्यांच्याही लक्षात आली आहे. ग्रामीण भागापर्यंत सर्वदूर पोहोचलेल्या करोनाला आळा घालण्यासाठी फॅमिली डॉक्टर्स उपयोगी ठरू शकतात, याची खात्री टास्क फोर्सला आली आहे. म्हणूनच त्यांनी डॉक्टरांचे प्रबोधन करताना त्यांना येणाऱ्या अडचणींचा विचार केला असून त्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यातून करोनाला आळा नक्कीच बसेल. पण त्याचबरोबर फॅमिली डॉक्टर ही कालबाह्य होत आलेली संस्था पुन्हा एकदा पुनरुज्जीवित व्हायला मदत होईल. राज्याचे आरोग्य सुधारण्यासाठीही राज्य शासनाचा हा फारच उपयुक्त उपक्रम आहे.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १४ मे २०२१)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा १४ मेचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply