तौते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावणेसहा कोटीचे नुकसान

सिंधुदुर्गनगरी : तौते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच कोटी ७७ लाख ४५ हजार ११७ रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. नुकसानीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

नुकसानीचा तपशील असा – जिल्ह्यात एकूण २ हजार ६० घरांचे अंशतः तर १२ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. तर १३९ गोठ्यांचे, १९ शाळांचे, ११ शासकीय इमारतींचे, १३ शेड्सचे, ४ सभागृहाचे आणि इतर ५३ ठिकाणी अंशतः नुकसान झाले आहे. विजेचे ७८२ खांब अंशतः आणि ९८ पूर्णतः पडले आहेत. ३०५ विद्युत वाहिन्यांचे नुकसान अंशतः नुकसान झाले असून १ विद्युत वाहिनीचे पूर्णतः नुकसान झाल्याची माहिती आहे.

एकूण २ हजार ७२ घरांचे ३ कोटी ४२ लाख ३७ हजार १० रुपयांचे नुकसान झाले आहे. १३९ गोठ्यांचे १६ लाख ९४ हजार १०० रुपये, १९ शाळांचे ८ लाख ७५ हजार ७०७ रुपयांचे, ११ शासकीय इमारतींचे १ लाख ७० हजार रुपयांचे, १३ शेडचे १ लाख १० हजार रुपयांचे ४ सभागृहांचे ६ लाख १६ हजार रुपयांचे आणि इतर ६ लाख ३८ हजार ३०० असे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची विभागनिहाय आणि तालुकानिहाय माहिती अशी (सर्व नुकसानीची माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे.)

दोडामार्ग – ४४ घरांचे नुकसान झाले असून त्यामध्ये ४३ घरांचे अंशतः आणि एका घराचे पूर्णतः नुकसान झाले आहे. २ शांळांचेही नुकसान झाले असून ४३ ठिकाणी विद्युत खांब पडले आहेत. ४३ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

सावंतवाडी – ११६ घरांचे अंशतः तर ४ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. १३ गोठ्यांचे अंशतः नुकसान झाले आहे. ३५० ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या असून १०० विद्युत खांबही पडले आहेत. एका सभागृहाचे अंशतः नुकसान झाले आहे.

वेंगुर्ले – ८७ घरांचे अंशतः नुकसान झाल्याची नोंद असून ६ गोठ्यांचे, एका शाळेचे, ३ शासकीय इमारतींचे, ४५ विद्युत खांब आणि २ विद्युत वाहिन्यांचे अंशतः नुकसान झाले आहे.

कुडाळ – ३०२ घरांचे, २२ गोठ्यांचे, ७ शाळांचे, २ शेडचे आणि २ सभागृहांचे अंशतः नुकसान झाले असून १२० विद्युत खांबचे अंशतः नुकसान झाले आहे.

मालवण – ९७२ घरांचे अंशतः तर ७ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. २५ गोठ्यांचे, २ शाळांचे, ८ शासकीय इमारती, १५७ विद्युत खांब, १० शेडचे आणि एका सभागृहाचे अंशतः नुकसान झाले आहे. ४१२ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

कणकवली – १३३ घरांचे, २९ गोठ्यांचे, एका शाळेचे, ६६ विद्युत खांब, १६ विद्युत वाहिन्या यांचे अंशतः नुकसान झाले आहे.

देवगड – १४५ घरांचे, ३६ गोठ्यांचे, ४ शाळांचे, १३२ विद्युत खांब, ९५ विद्युत वाहिन्या यांचे अंशतः नुकसान झाले आहे.

वैभववाडी – २६२ घरांचे, ८ गोठ्यांचे, एका शाळेचे, १२० विद्युत खांब, ३५ विद्युत वाहिन्या आणि एका शेडचे अंशतः नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात एकूण ९०७ ठिकाणी झाडे कोसळण्याची घटना घडली असल्याची माहितीही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

सर्वांत जास्त फटका महावितरणला

तौते चक्रीवादळाचा सर्वांत जास्त फटाका महावितरणला बसला असून त्यामुळे महावितरणच्या एकूण ४६० विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत. त्यामध्ये ३३० लो टेन्शन आणि १३० हाय टेन्शन विद्युत वाहिन्यांचा समावेश आहे. त्याशिवाय जिल्ह्यात ८८० विद्युत खांबही तुटले आहेत. विद्युत वितरणच्या नुकसानीचा प्राथमिक आकडा सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचा आहे. त्याशिवाय वादळामुळे जिल्ह्यातील २१ सब स्टेशन बंद पडली होती. दुपारपर्यंत त्यापैकी १३ सब स्टेशन सुरू करण्याचे काम पूर्ण झाले होते. उर्वरित सब स्टेशन सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी बाहेरील जिल्ह्यातील मनुष्यबळही जिल्ह्यात दाखल होत आहे.

देवगड तालुक्यात दोन बोटी गेल्या वाहून, एका खलाशाचा मृत्यू, तीन बेपत्ता

तौते चक्रीवादळाच्या फटक्यामुळे देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये राजाराम कृष्णा कदम (वय ५३, रा. गढीताम्हणे, ता. देवगड) या खलाशाचा मृत्यू झाला, तर दिनेश गजानन जोशी (वय ३९ रा. पावस, रत्नागिरी), नंदकुमार नार्वेकर (वय ६०, रा. कोल्हापूर), प्रकाश बिरीद (वय ३९, रा. राजापूर, रत्नागिरी) हे बेपत्ता आहेत. तर यशवंत डोर्लेकर (वय ६१, रा. पूर्णगड, रत्नागिरी), विलास सुरेश राघव (वय ३७, रा. पुरळ – कळंबई, ता. देवगड), सूर्यकांत सायाजी सावंत (वय ६०, रा. हुमरठ, ता. कणकवली) हे सुखरूप बाहेर आले.

याविषयी देवगड उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार काल दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या रघुनाथ यशवंत कोयंडे यांच्या रुक्मिणी या बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ती पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून जाऊ लागली. त्यामुळे बोटीवरील खलाशांना वाचवण्यासाठी नीरज यशवंत कोयंडे यांची आरची नावाची दुसरी बोट रुक्मिणी बोटीजवळ नेण्यात येत होती. पण वादळी वाऱ्यामुळे आरची बोटीवरील खलाशांचे नियंत्रण सुटून दोन्ही मच्छीमार बोटी लगतच्या पालये किनाऱ्यावरील खडकावर आदळल्या. त्यानंतर दोन्ही बोटीवरील खलाशांनी पाण्यात उड्या मारल्या. या दोन्ही बोटींवर मिळून एकूण ७ खलाशी होते. त्यापैकी तीन खलाशी सुखरूप बाहेर आले, तर चार खलाशी वाहून गेले. यापैकी एका खलाशाचा मृतदेह आज सकाळी देवगड मळई येथील खाडीमध्ये आढळून आला. स्थानिक प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक लोकांच्या सहकार्याने इतर तीन बेपत्ता खलाशांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेनंतर उपविभागीय अधिकारी (महसूल) यांनी बचावलेल्या खलांशांची भेट घेतली. हे खलाशी मौजे पालये येथील सागर करंगुटकर यांच्या घरी सुखरूप असल्याची माहिती मिळाली.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply