‘फेरोसिमेंट’ तंत्रज्ञानाने मंडणगड तालुक्यात प्रथमच पर्जन्यजल साठवण

मंडणगड : ‘फेरोसिमेंट’ तंत्रज्ञानाने मंडणगड तालुक्यात कुंबळे गावात प्रथमच ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग टॅँक’ बांधण्यात आली असून त्यासाठी मुंबईच्या जलवर्धिनी प्रतिष्ठानने साह्य केले आहे.

टाकी बांधण्याच्या या कामाची पाहणी मंडणगडचे गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे आणि कृषी अधिकारी विशाल जाधव यांनी केली. त्यांनी फेरोसिमेंट तंत्रज्ञान समजून घेतले. आणि फेरोसिमेंटच्या तंत्रज्ञानाने बांधण्यात आलेली टाकी बांधणारे शेतकरी संदेश लोखंडे तसेच जलवर्धिनी प्रतिष्ठानचे कौतुक केले. यावेळी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, ग्रामसेवक शरद बुध, ग्रामपंचायत सदस्या सौ. समीक्षा लोखंडे, संदेश लोखंडे उपस्थित होते.

मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठान ही पावसाचे पाणी साठविण्याच्या विषयात काम करणारी सामाजिक संस्था आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत तीसपेक्षा अधिक टाक्या फेरोसिमेंट तंत्रज्ञानाचा वापर करून जलवर्धिनी संस्थेने बांधल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी सुमारे तीन हजार ते साडेतीन हजार मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. म्हणजेच तीन ते साडेतीन मीटर किंवा १० फूट उंचीची कोणतीही टाकी केवळ पडणाऱ्या पावसाच्या थेंबाने भरू शकते. कोकणात मुसळधार पाऊस पडतो. पावसाचे हे पाणी समुद्राला जाऊन मिळते. पावसात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडून पावसाळ्यानंतर डोंगराळ भागात किंवा अनेक ठिकाणी फळझाडांना पाणी देण्यासाठी, इतर वापरासाठी पाणी संकलन करण्याची व्यवस्था नसते. ज्या उपाययोजना किंवा इतर पद्धतीने केलेल्या टाक्या पाणी साठवण्याच्या तुलनेत अधिक खर्चिक असतात.

ही बाब जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि मूळचे कोकणवासी उल्हास परांजपे यांच्या लक्षात आली त्यांनी कोकणातील अनेक लोकांचे त्याबाबत प्रबोधन केले आणि फेरोसिमेंट तंत्रज्ञान समजावून सांगितले. या तंत्राचा करून आठ हजार ते १५-16 हजार लिटर पाणी साठविता येऊ शकेल, अशी माहितीही त्यांनी दिली. या पद्धतीने रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यात तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यात टाक्या बांधल्या आहेत.

मंडणगड तालुक्यात जलवर्धिनी प्रतिष्ठानच्या सहकार्याने पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली कुंबळे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात संदेश लोखंडे यांच्या शेतावर १० फूट व्यास आणि ५ फूट उंचीचीसुमारे १० हजार लिटर पावसाचे पाणी साठणारी टाकी बांधण्यात आली. या टाकीचे बांधकाम स्थानिक कारागीर सुरेश पवार यांनी केले. मंडणगड तालुक्यात फेरोसिमेंट तंत्राचा वापर करून प्रथमच नावीन्यपूर्ण अशा टाकीचे काम कुंबळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात केल्याबद्दल सरपंच किशोर दळवी यांनी जलवर्धिनी प्रतिष्ठानबद्दल समाधान व्यक्त केले.

फेरोसिमेंट तंत्रज्ञान अद्भुत आहे. सिमेंट, वाळू, चिकनमेश, वेल्डमेश, स्टीलचा वापर करून साधे कारागीर या तंत्राने ह्या टाक्या बांधू शकतात. या तंत्रज्ञानाने बायोगॅस टाक्याही बांधू शकतो. काही ठिकाणी तर छोटी घरे आणि शौचालयेसुद्धा या तंत्रज्ञानाने बांधली आहेत. काँक्रीटने किंवा जांभ्या दगडाने, चिऱ्याने बांधण्यात येणाऱ्या टाकीच्या तुलनेत या पद्धतीने बांधलेल्या टाकीचा खर्च कमी येतो, असे कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी सांगितले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply