रत्नागिरी जिल्ह्यात २ जूनपासून पुन्हा कडक निर्बंध, जिल्हासीमा बंद

रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक ब्रेक द चेनअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात दोन ते आठ जून या कालावधीत वैद्यकीय सेवा सोडून इतर सर्व आस्थापना पूर्ण वेळ बंद ठेवण्याससह जिल्हा प्रवेश बंदी करण्याचे निर्देश आज जारी करण्यात आले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी विविध प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. हे प्रतिबंध लागू करूनही रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाच्या रुग्णांच्या पॉझिटिव्हिटीचे प्रमाण २० टक्के असून जिल्ह्यातील ६७ टक्क्यांहून अधिक ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्याप्त आहेत. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी जिल्ह्यातील सद्यःपरिस्थिती विचारात घेता, रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत कडक निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी २ जून रोजी सकाळी ७ पासून ८ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशांनुसार औषधी दुकाने, आरोग्यविषयक सेवा आणि आरोग्यविषयक आस्थापना पूर्णवेळ सुरू राहतील. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे दुकान, आस्थापना पूर्णत: बंद राहतील. दूध आणि किराणा मालाची दुकाने यांना केवळ घरपोच सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत पुरविता येईल. रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा अन्य जिल्ह्यांतून प्रवेश करण्यास किंवा अन्य जिल्ह्यांत जाण्यास बंद करणेत येत आहेत. केवळ नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी, वैद्यकीय उपचारासाठी आणि करोना व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक सेवा किंवा निकडीच्या / आणीबाणीच्या प्रसंगी रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करण्यास किंवा रत्नागिरी जिल्ह्यातूनअन्य जिल्ह्यात प्रवास करणेस मुभा राहील. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ४८ तास अगोदर केलेली करोना निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र सोबत असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.

मालवाहतुकीसाठी कोणतेही बंधन असणार नाही. तथापि अशी मालवाहतूक केवळ दुकानापर्यंत, आस्थापनेपर्यंत माल वितरण करण्यापुरती मर्यादित राहील. कोणत्याही ग्राहकाला थेट माल पुरविता येणार नाही. या अटीचा भंग झाल्यास मालवाहतुकदाराची सेवा करोना प्रादुर्भाव आटोक्यात येईपर्यंत बंद करण्यात येईल. शेतीच्या पेरणीचा हंगाम विचारात घेता कृषीविषयक संलग्न सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या काळात सुरू ठेवता येतील.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply