सिंधुदुर्गच्या शाश्वत आराखड्याला देणार सहकार्य – सुरेश प्रभू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शाश्वत आराखड्याला सक्रिय सहकार्य देणार असल्याचे आश्वासन माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी आज, ८ जून रोजी दिले.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या पहिल्या बहुभाषि प्रयत्न वेबसाइटचे लोकार्पण आज श्री. प्रभू यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. त्यावेळी ते बोलत होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख जागतिक स्तरावर व्हावी, यासाठी महासंघाने जगातील आणि इतर देशांतील पन्नासहून जास्त भाषांमध्ये कोकणातील पर्यटनस्थळांची माहिती देणारी वेबसाइट सुरू केली. त्याचे लोकार्पण आज माझ्या हस्ते होत आहे. याचे विशेष कौतुक असल्याचे श्री. प्रभू यांनी यावेळी सांगितले. पर्यटनाशी संबंधित कोकणाची संस्कृती, खाद्यपदार्थ, लोककला, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळे याबाबत ठोस भूमिका घेऊन ही चळवळ जास्तीत जास्त मजबूत होऊन त्यातून रोजगार आणि शाश्वत विकास कसा साधता येईल, याचा एक आराखडा या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आणि अधिकाऱ्यांना घेऊन महासंघाने तयार करावा, त्यासाठी आपला सक्रिय पाठिंबा आणि योगदान राहील, असे आश्वासन या प्रसंगी त्यांनी दिले.

यावेळी भारत सरकारचे प्रादेशिक संचालक वेंकटेशन यांनी पुढील काळात महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी योग्य समन्वय ठेवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. भारत सरकारच्या पर्यटन विभागाच्या माजी डेप्युटी डायरेक्टर सौ. नीला लाड यांनी आपल्या अनुभवाचा फायदा या महासंघाला निश्चितच करून दिला जाईल, असे सांगितले.

यावेळी महासंघाचे पदाधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालक दीपक हर्णे, ट्रॅव्हल एंजट असोसिएशनचे सेक्रेटरी उदय कदम आदी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply