काहीशी विलंबाने, पण नव्या रूपातील जनशताब्दी थाटात धावली

रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर नवीन सुरू होणारी गाडी उशिरा धावते, ही परंपरा नव्या एलएचबी डब्यांच्या जनशताब्दी एक्स्प्रेस गाडीने आजही कायम राखली. रत्नागिरीत तब्बल २५ मिनिटे उशिरा आलेल्या या गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद लाभला नाही. नेहमी खच्चून भरलेल्या या गाडीतून आज जेमतेम ६० टक्के प्रवाशांनी प्रवास केला.

आज १० जूनपासून कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक लागू झाले आहे. त्याच दिवशी नव्या रूपातील जनशताब्दी एक्स्प्रेस गाडी धावू लागली आहे. काल मुंबई अतिवृष्टीने जलमय झाली होती. मध्य रेल्वेवर काही ठिकाणी प्लॅटफॉर्मपर्यंत पाणी भरले होते. तरीही आज, गुरुवारी सकाळी नवीन एलएचबी डब्यांच्या जनशताब्दी एक्स्प्रेस गाडीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वेळेवर म्हणजे ठीक पाच वाजता प्रयाण केले. नंतर कोकण रेल्वे मार्गावर आल्यावर ही गाडी रखडली आणि रत्नागिरीत तब्बल २५ मिनिटे उशिरा दाखल झाली. जुन्या १४ ऐवजी १६ डब्यांच्या या गाडीची लांबी जास्त आहे. त्याचप्रमाणे डब्यांची जागा बदलली आहे. नवीन रचनेत गोव्याला जाताना इंजिननंतर दुसऱ्या वर्गाचे ६ डबे, त्यानंतर ३ वातानुकूलित निळे डबे, त्यानंतर पुन्हा दुसऱ्या वर्गाचे ६ डबे आणि सोळावा पूर्व रेल्वेचा निळा-पांढरा विस्टाडोम डबा अशी या गाडीच्या डब्यांची रचना आहे.

नवीन एलएचबी डब्यांच्या गाडीमुळे प्रवासी क्षमता वाढली असून एक जादा वातानुकूलित डबाही गाडीला जोडला गेला आहे. एकाच वेळी दोन गाड्या धावणार आहेत. पहाटे ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघणारी गाडी संध्याकाळी ४ वाजता मडगाव येथे पोहोचेल, तर त्याच दिवशी दुसरी गाडी मडगाव येथून दुपारी १२.३० वाजता निघेल. या दोन्ही गाड्या नवीन एलएचबी डब्यांच्या आहेत.

उद्घाटनाचा बाविसावा प्रवास हुकला

कोकण रेल्वे मार्गावर नवीन गाडी सुरू झाली की उद्घाटनाच्या फेरीने प्रवास करण्याची रत्नागिरीतील प्रा. उदय बोडस यांची परंपरा यावेळी कोविड निर्बंधांमुळे खंडित झाली. आज सुरू झालेल्या नव्या रूपातील गाडीतून प्रवास करता आला असता, तर तो त्यांचा उद्घाटनाचा बाविसावा प्रवास ठरला असता. जून २०१९ मध्ये कोकणकन्या/मांडवी एक्स्प्रेसचे नव्या एलएचबी डब्यांच्या गाडीत परिवर्तन झाले, तेव्हा प्रा. बोडस यांनी मडगाव येथून उद्घाटनाचा प्रवास केला होता. तो त्यांचा उद्घाटनाचा एकविसावा प्रवास होता. त्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर बदल होऊन नवीन सुरू होणारी जनशताब्दी एक्स्प्रेस आज धावली. मात्र कोविड निर्बंधांमुळे हुकली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे करोनाच्या चौथ्या स्तरात आहेत. गोवा राज्य वेगळे असल्याने कोविडसंदर्भात चाचण्या अनिवार्य आहेत. वयाचा विचार करता प्रवास टाळणे इष्ट असल्याचा सल्ला मिळाल्याने यावेळी उद्घाटनाचा प्रवास आपण करू शकलो नाही, असे प्रा. उदय बोडस यांनी सांगितले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply