शंभराव्या मनोरुग्णाला राजरत्नमुळे मिळणार शहाणपण

रत्नागिरी : केस वाढून त्यात जटा झालेल्या, हातापायांची नखे अर्धा इंच वाढलेली, अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या झालेल्या, काखेत एखादे कळकट बोचके, हातात पाण्याची बाटली आणि एखादी काठी अशी व्यक्ती दिसली की, आपण सुरक्षित अंतर राखतो अथवा रस्ता बदलतो. लांबूनच ‘अरे वेडा येतोय रे’ असे म्हणून इतरांना सावध करतो. मात्र अशा वेड्यांना शहाणे करण्याचे व्रत रत्नागिरीच्या राजरत्न प्रतिष्ठानने सहा वर्षांपूर्वी हाती घेतले. शंभरावा मनोरुग्ण उपचारांसाठी ताब्यात घेऊन आपल्या सामाजिक कार्याच्या ध्येयाची शतकपूर्ती केली आहे.

रत्नागिरी रेल्वे स्थानकाजवळ एका छोट्या हॉस्पिटलवर एक मनोरुग्ण बेभान होऊन दगडफेक मारत असल्याची माहिती राजरत्न प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांना समजली. सहकाऱ्यांना सोबत घेण्याआधी शिंदे तडक हॉस्पिटलजवळ पोहचले आणि बेभान झालेल्या त्या मनोरुग्णाला त्यांनी मोठ्या युक्तीने शांत केले. नंतर त्याला आपल्या गाडीतून सहकाऱ्यांच्या साहाय्याने पुढील सोपस्कार पूर्ण करत रत्नागिरीच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारांसाठी भरती केले. दिल्लीहून आलेला हा मनोरुग्ण राजरत्नच्या उद्दिष्टाची शतकपूर्ती करणारा ठरला आहे. विशेष म्हणजे राजरत्न प्रतिष्ठानने सहा वर्षांपूर्वी ज्यावेळी मनोरुग्णांना ताब्यात घेण्याचे काम सुरू केले, त्यावेळी जेथे पहिला रुग्ण सापडला, तेथेच शंभरावा मनोरुग्ण सापडला, हा एक आगळा योगायोग ठरला.

राजरत्नला सापडलेला हा शंभरावा रुग्ण दिल्लीतून सुमारे दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झाला होता. कौटुंबिक वादामुळे तो घराबाहेर पडला आणि त्याच्या मनावर आघात होऊन तो अखेरीस मनोरुग्ण बनला. सुनील असे त्याचे नाव असून तो बारावी शिकलेला आहे. उत्तम इंग्रजी बोलत असल्याने तो स्वतःची वेगवेगळी ओळख सांगत असल्याचे दिसून आले. आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर राजरत्नने सुनीलला प्रादेशिक मनोरुग्णालयात भरती केले. सुनील हा मॅनिया रुग्ण असून अशा आजाराचे रुग्ण वेगवेगळ्या प्रकारची माहिती सांगत असतात. त्याच्यावर अधीक्षक डॉ. आमोद दडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नितीन शिवदे आणि मनोरुग्णालयातील कर्मचारी उपचार करत आहेत. एखादा मनोरुग्ण मृत्यू पावला, तर तो शारीरिक आजारानेच मृत होतो. यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्णांचे आरोग्य उत्तम राहावे, म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश ढगे मनोरुग्णालयात चोवीस तास कार्यरत असतात.

मनोरुग्णांना मनोरुग्णालयात दाखल करण्याचे राजरत्नचे काम म्हणजे एक टीमवर्क असून सध्या आमच्यासोबत ५६ कार्यकर्ते यासाठी कार्यरत आहेत. मनोरुग्णावर होणारे आघात त्याच्या जीवनाची दशा करतात, म्हणूनच राजरत्न प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही अशा मनोरुग्णांना नवी दिशा देण्यासाठी झटत आहोत, असे सचिन शिंदे यांनी सांगितले. समाजानेही त्यांना वेडे न म्हणता त्यांच्याकडे मायेने पाहिले, तर आमच्या कामाला समाजातील प्रत्येक घटकाचा हातभार लागल्यासारखेच होईल, असे श्री. शिंदे यांनी नमूद केले.
(संपर्कासाठी – सचिन शिंदे – 8007841111)

  • जे. डी. पराडकर, संगमेश्वर
  • (9890086086)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply