करोनामुळे कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबाला ‘माय राजापूर’ची मदत

राजापूर : करोनामुळे घरचा कर्ता पुरुष गमावलेल्या उन्हाळे (ता. राजापूर) येथील सोड्ये वाडीतील रवींद्र सोड्ये यांच्या कुटुंबाला माय राजापूर या सामाजिक संस्थेने दहा हजाराची मदत आज सुपूर्द केली.

राजापूर तालुक्यातील करोनामुळे कर्ता पुरुष गमावलेल्या आणि लहान मुले असलेल्या कुटुंबाची यादी माय राजापूर संस्थेचे प्रवर्तक प्रदीप कोळेकर यांनी प्रयत्नपूर्वक तयार करून ती ग्रुपवर जाहीर केली. या प्रादुर्भावात ज्या कुटुंबाला कर्ता माणूस गमवावा लागला, त्यांच्या संसाराची दैना झाली आहे. सर्वांवर आभाळच कोसळले आहे, किती आणि कोणाला मदत करावी, हे समजेनासे झाले आहे. संकटच एवढे मोठे आहे की आपण पुरे पडू शकत नाही. हे खरे असले, तरी त्या फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावण्याचे काम कर्तव्य भावनेने आणि सामाजिक बांधिलकीने केले पाहिजे, अशा भावनेने माय राजापूर संस्थेचे कार्यकर्ते एकत्र झाले.

उन्हाळे गावी सोड्येवाडीत राहणारे रवींद्र सोड्ये करोनातून बरे झाले आणि घरी गेले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे त्यांची पत्नी रविना (वय ३७), अदिती (वय १४, दहावी), श्रवणी (वय ८, चौथी) आणि अथर्व (वय ५, पहिली) ही तीन लहान मुले आहेत. त्यांना दहा हजाराची आर्थिक मदत, किराणा सामान आणि मुलांना दप्तर असे मदत साहित्य आज देण्यात आले. त्यासाठी त्यांच्या घरी माय राजापूरचे अध्यक्ष जगदीश पवार, सदस्य प्रदीप कोळेकर, प्रकाश परवडी सर, राजापूरचे प्रसिद्ध व्यापारी माजी नगरसेवक अभय मेळेकर, उन्हाळे पोलीस पाटील प्रकाश पुजारी इत्यादी गेले आणि त्यांना मदत सुपूर्द केली.

संध्याकाळची भयाण वास्तवता

ही मदत देण्यासाठी गेलेले प्रदीप कोळेकर यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दांत.

राजापूर तालुक्यातील करोनामुळे कर्ता पुरुष गमावलेल्या आणि लहान मुले असलेल्या कुटुंबांची यादी प्रयत्नपूर्वक तयार केली आणि ती ग्रुपवर जाहीर केली. त्यानंतर जे वास्तव समोर आले, त्याने हादरून जायला झाले. या प्रादुर्भावात ज्या कुटुंबाला कर्ता माणूस गमवावा लागला त्यांच्या संसाराची दैना झाली आहे. सर्वांवर आभाळच कोसळले आहे, किती आणि कोणाला मदत करावी हे समजेनासे झाले आहे. संकटच एवढे मोठे आहे की याकामी आपण पुरे पडू शकत नाही. हे खरे असले, संकटांचे आभाळच कोसळले असले तरी त्या फाटलेल्या आभाळाला ठिगळे लावण्याचं काम तरी कर्तव्य भावनेने आणि सामाजिक बांधिलकीने केले पाहिजे. काहीजण म्हणतील या तुमच्या अल्पशा मदतीने खरंच त्यांना उभं राहता येणार आहे का?

सांगता येत नाही पण…… सगळंच थांबलं असताना, सगळीकडे संकटाचे डोंगर असताना, प्रत्येकजण अडचणींचा सामना करत असताना, अशा कठीण परिस्थितीतही काही माणसं त्यांना झेपेल तेवढी मदत करत होती, हे पुढील पिढ्यांना दिसेल आणि या महामारीत माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यात माय राजापूर संस्थेचं नाव असेल.

या भावनेतूनच रवींद्र सोड्ये यांच्या कुटुंबीयांना मदत देऊन आलो. पोलीस पाटील प्रकाश पुजारी यांनी रवींद्र सोडये यांच्या पत्नीला आणि मुलांना माजघरात बोलावलं. त्यांची नावं सांगून ओळख करून दिली. कौटुंबिक परिस्थिती खूप हलाखीची. तीन मुलांची आई अल्पशिक्षित, मोलमजुरी करून उपजीविका होते. मोठी मुलगी वाटेल अशा सोड्ये यांच्या पत्नीकडे पाहून या लहान वयात या माऊलीच्या वाट्याला किती कठीण काळ समोर आणून ठेवलाय, हे जाणवलं आणि गहिंवरून आलं. पण या कठीण वेळेतही ती माऊली सावरली होती. धीराने परिस्थितीतिला समोर जाण्याचं बळ तिच्या देहबोलीतून जाणवत होतं. कुठेतरी आशेचा किरण दिसत होता. मोठी मुलगी दहावीला आहे. तिच्यावर ताण जाणवत होता, दोन लहान मुलांना मात्र आपला बाप गेला म्हणजे काय, हे जाणवण्याची समज नसल्याने ती निरागसपणे वावरत होती.

आम्ही त्या कुटुंबाला धीराचे चार शब्द सांगितले आणि मदत निधी आणि वस्तू दिल्या. रोख दहा हजार रुपये, तीन मुलांना शाळेची दप्तरं, कुटुंबाला महिनाभरासाठी शिधा आणि श्रीमती रविना सोड्ये हिला बंधुत्वाच्या नात्यानं माय राजापूरकडून साडी दिली. माय राजापूर संस्था कुटुंबाच्या पाठी सदैव राहील, असं सांगून या कुटुंबाचा आम्ही विषण्ण मनाने निरोप घेतला.

खूप अस्वस्थ करणारी संध्याकाळ म्हणून कायम लक्षात राहील, अशी भयाण वास्तवता आम्ही आज अनुभवली. या मदत कार्यात ज्यांनी आपल्या स्वतःच्या अडचणी बाजूला ठेवून मदत केली, त्या सर्वांच्या वतीने आम्ही मदत करू शकलो, याची जाणीव मात्र या भयानकतेतून दिलासादायक आशावाद निर्माण करत होती आणि हेच सहकार्य पुढील मदत कार्यासाठी बळ देत राहील हे निश्चित.

  • प्रदीप कोळेकर, माय राजापूर
    (82751 34404)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply