सिंधुदुर्गात ऑक्सिजन लेव्हल ६५ पर्यंत आलेल्या करोनाबाधिताला नवजीवन

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाच्या नव्या बाधितांची संख्या करोनामुक्त झालेल्यांपेक्षा खूपच अधिक आहे. आज २१ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ८४ तर एकूण ३० हजार ६१२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामध्ये ऑक्सिजनची लेव्हल ६५ पर्यंत खाली आलेल्या रुग्णाचा समावेश आहे.

सध्या जिल्ह्यात ६ हजार ३६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसऱ्यांदा तपासणी केलेल्या १६ जणांसह ४९६ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ९२, दोडामार्ग – २१, कणकवली – ९९, कुडाळ – १३७, मालवण – ५६, सावंतवाडी – ३२, वैभववाडी – ७, वेंगुर्ले – ३५, जिल्ह्याबाहेरील १. एकूण करोनाबाधितांची संख्या ३७ हजार ९३६ झाली आहे.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ७८८, दोडामार्ग १७९, कणकवली १११७, कुडाळ १३७७, मालवण ११५०, सावंतवाडी ७३३, वैभववाडी २८३, वेंगुर्ले ७१२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २७. सक्रिय रुग्णांपैकी २८७ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ९५२ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – दोडामार्ग १, मालवण २, वैभववाडी १, कणकवली १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड १३०, दोडामार्ग – २९, कणकवली – १८८, कुडाळ – १४४, मालवण – १८२, सावंतवाडी – १३८, वैभववाडी – ६४, वेंगुर्ले – ७२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ५.

दिलासादायक वृत्त

ऑक्सिजनची पातळी ६५ पर्यंत खाली आलेल्या रुग्णाला नवसंजीवनी

ऑक्सिजन पातळी घटलेली. धाप लागलेली अशा परिस्थितीत आम्ही आमच्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. उपचारादरम्यान तेथील डॉक्टर्समधील व्यवसायापलीकडील माणुसकीचे दर्शन घडविले, अशी भावना व्यक्त केली आहे, सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील करोनामुक्त रुग्णाच्या नातेवाईकांनी.

रुग्णालयातील आपल्या अनुभवाविषयी त्यांचे नातेवाईक सांगतात, ऑक्सिजनच्या आधारावर त्यांना ठेवणे अत्यंत गरजेचे होते. खासगी डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांनी तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. पण सावंतवाडी, कुडाळ या ठिकाणी ऑक्सिजन खाटा उपलब्ध झाल्या नाहीत. म्हणून आम्ही त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आणले. तेथेही सुरुवातीस खाट मिळाली नाही. पण, खाट नाही म्हणून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्सनी उपचार थांबवले नाहीत. त्यांना रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन देण्यात आला. खाट उपलब्ध झाल्या झाल्या त्यांना दाखल करून घेतले आणि उपचारांना सुरुवात केली. एचआरसीटी स्कॅन केल्यानंतर त्याचा स्कोअर १८ आला. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष दिले जात होते. दिवसातून चार वेळा डॉक्टर्स तपासणीसाठी येत होते. त्यांच्या आरोग्याविषयी नियमितपणे आम्हाला माहिती दिली जात होती. रुग्णासाठी सकस आणि चांगले जेवण दिले जात होते. सुरुवातीस आम्ही घरून डबा आणण्याचा निर्णय घेतला होता. पण डॉक्टर्सनी सल्ला दिला की घरून डबा आणू नका. करोना वॉर्डमधील डबा घरी घेऊन जाण्यामुळे घरातील लोकांनाही करोनाची बाधा होऊ शकते. त्यामुळे तुम्ही येथीलच जेवण द्या. डॉक्टरांचा सल्ला आम्ही ऐकला आणि रुग्णालयातीलच जेवण दिले. जेवणही चांगले होते. रोज अंडी दिली जात होती, काढा दिला जात होता. नाष्ट्याचीही चांगली सोय होती. डॉक्टर्स, नर्स अगदी व्यवस्थितपणे लक्ष देत होते. नियमितपणे इतर तपासण्याही करण्यात येत होत्या. घरी सोडण्याच्या आदल्या दिवशी रक्त तपासणीमध्ये शुगर वाढल्याचे दिसले. त्यामुळे आम्ही पुन्हा घाबरलो. पण, डॉक्टर्सनी सर्व माहिती दिली आणि शुगरसाठी काही गोळ्या सुरू केल्या. आणखी काही दिवस या गोळ्या घ्याव्या लागतील, असेही सांगितले. या संपूर्ण काळामध्ये डॉक्टरांमधील माणुसकीचे आम्हाला दर्शन घडले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply