काय आहे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम?

रत्नागिरीत इन्फिगो आय केअरमध्ये सुरू झाले कॉम्प्युटर व्हिजन क्लिनिक

गेल्या वर्षी मार्चपासून करोनाचा पहिला लॉकडाउन लागला आणि आपल्या देशात हळूहळू वर्क फ्रॉम होम या कल्चरने जोर पकडला. गेल्या दीड वर्षापासून तरुणवर्ग, कॉर्पोरेट सेक्टर, शिक्षक, विद्यार्थी आणि एकूणच समाजाच्या सर्व स्तरांमध्ये आणि सर्व वयोगटामध्ये मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटर्स, टॅबलेट, टीव्ही यांचा वापर भरपूर प्रमाणात वाढला आहे. इतकेच नव्हे तर ३-४ वर्षांची लहान मुले पण आई-वडिलांकडून हट्टाने मोबाइल घेऊन गेम किंवा कार्टून्स बघताना दिसत आहेत. त्यामुळे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम अनेकांना जाणवत आहे.
……..

आपल्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की घरात बसल्याने किंवा ऑफिस अथवा शाळा-कॉलेजात न गेल्याने या सर्व गॅझेट्सबरोबर मोबाइल किंवा टीव्हीवर ऑनलाइन सिरिअल्स बघणे किंवा करमणूकप्रधान कार्यक्रमांचे सर्फिंग करणे वाढले आहे. म्हणजेच आपल्या डोळ्यांचा स्क्रीनटाइम वाढला आहे. याचाच दुसरा अर्थ असा की आपल्या डोळ्यांचे काम पूर्वीपेक्षा जवळजवळ दुप्पट झाले आहे. डोळे सतत काम करू लागल्याने किंवा सतत स्क्रीनकडे एकटक बघत राहिल्याने डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप निसर्गतःच कमी होते. त्यामुळे डोळ्यांत उतरणाऱ्या आणि आर्द्रता राखणाऱ्या अश्रूंचा स्राव कमी झाल्याने डोळे कोरडे पडतात. त्यामुळे डोळ्यांमध्ये तणाव, धुरकट दिसणे, डोळ्यांत आग किंवा डोळे लाल होणे, दूर किंवा जवळ एकाच वेळी बघताना त्रास होणे, मान, पाठ आणि खांदे यांमध्ये दुखणे, कोरडे डोळे यांसारखी लक्षणे प्रामुख्याने दिसू लागतात.

ही सर्व चिन्हे म्हणजे “कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम” या हल्ली सर्व वयोगटात आढळणाऱ्या समस्येची लक्षणे आहेत, हे समजून घ्यायला हवे. यामध्ये डबल व्हिजन, एखाद्या वस्तूकडे पाहताना त्रास होणे ही लक्षणेही दिसतात. कॉम्प्युटर किंवा इतर गॅझेट्सवर काम करत असताना चुकीची लाइट व्यवस्था, चेहऱ्यावर किंवा डोळ्यांवर हवेचा किंवा एसीचा येणार झोत, यामुळे हा आजार अधिकच बळावतो. विशेष करून गेल्या ८-१० महिन्यांत डोळ्यांच्या सर्वच डॉक्टरांकडे संपूर्ण देशात या आजाराच्या रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली असून लहान मुले किंवा तरुण पिढीमध्ये ३० ते ३५ टक्के इतक्या प्रमाणात कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम आढळून येत आहे.

बऱ्याच युजर्समध्ये ही लक्षणे तात्पुरत्या स्वरूपाची असतात, कॉम्प्युटरवरील काम थांबवल्यानंतर ही लक्षणे थांबतात. पण काही जणांना मात्र दृष्टीची क्षमता कमी झाल्याचा अनुभव स्क्रीनवरील काम थांबवल्यानंतर बराच वेळपर्यंत येतो. त्यावर वेळीच उपाय केले नाहीत तर हा आजार बळावू शकतो. ज्यांना चष्मा आहे किंवा जे कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात, त्यांना हा त्रास जास्त होतो. अनेकदा अशा व्यक्ती कॉम्प्युटरकडे जास्त झुकून काम करत असतात. त्यातून मान, पाठ आणि खांदेदुखी उद्भवत असते. सर्वसाधारणपणे दृष्टीच्या क्षमतेपेक्षा कॉम्प्युटरवर करावे लागणारे काम जास्त वेळ असेल तर ही लक्षणे उद्भवतात. दररोज सलग २ तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ कॉम्प्युटर किंवा मोबाइलवर काम करणाऱ्यांमध्ये या सिंड्रोमची लक्षणे दिसतात.

कॉम्प्युटरची जागा
सर्वसाधारणतः नजर खाली झुकेल, अशा लेव्हलवर कॉम्प्युटर असावा. आय लेव्हलपेक्षा १५-२० अंशाच्या कोनात म्हणजे ४-५ इंच खाली आणि डोळ्यांपासून २०-२८ इंच (साधारणतः २ फूट) अंतरावर कॉम्प्युटर असावा.

बसण्याची पद्धत
कॉम्प्युटरसमोर बसताना आपल्या पायाचे तळवे जमिनीवर टेकतील अशा पद्धतीने खुर्ची ठेवावी. म्हणजे खुर्चीला हात असतील तर आपल्या हातांना त्याचा सपोर्ट मिळेल आणि ऑपरेट करताना मनगट थोडे उतरते राहील अशा पद्धतीने खुर्ची ठेवलेली असावी.

डोळ्यांवरील ताण टाळण्यासाठी कॉम्प्युटरवर काम करताना पापण्यांची सतत उघडझाप होत राहील हे बघावे किंवा ती मुद्दाम करावी. काम करताना अधूनमधून ब्रेक घ्यावा. दोन तास सलग काम केल्यानंतर १५ मिनिटांचा ब्रेक घ्यावा प्रत्येक १५-२० मिनिटांनंतर थोड्या वेळेसाठी स्क्रीनवरून नजर हटवावी आणि पापण्यांची उघडझाप करावी, जेणेकरून डोळ्यांमधील ओलसरपणा कायम राहील.

काम करताना लागणारे रेफरन्स मटेरियल कीबोर्डच्या बाजूला आणि मॉनिटरच्या खाली असावे आणि ते शक्य नसेल तर मॉनिटरवर शेजारी डॉक्युमेंट होल्डर ठेवावा. त्यामुळे डॉक्युमेंट पाहताना डोक्याची फार हालचाल करावी लागणार नाही. ओव्हरहेड लाइटिंग किंवा खिडकीतून मॉनिटरवर तीव्र प्रकाश येणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. मॉनिटरवरून येणाऱ्या प्रकाशाची तीव्रता कमी करण्यासाठी ॲन्टीग्लेअर स्क्रीनचा चांगला उपयोग होऊ शकतो.

ही लक्षणे का उद्भवतात?
घरातील किंवा ऑफिसमधील प्रकाशाची व्यवस्था किंवा स्क्रीनवर थेट पडणारा प्रकाश आणि चुकीची प्रकाशयोजना, स्क्रीनवरील ग्लेअर, कॉम्प्युटरपासून जास्त दूर किंवा एकदम जवळ बसणे, बसण्याची चुकीची पद्धत आणि आपण किती वेळ स्क्रीनसमोर बसतो, यानुसार लक्षणे बळावू शकतात.

एक लक्षात ठेवा, छापील मजकूर आणि मॉनिटरवरील मजकूर वाचण्यात फार मोठा फरक असतो. कॉम्प्युटरवरील अक्षरे शार्प नसतात. अक्षरांची आणि बॅकग्राउंडची कॉन्ट्रास्ट लेव्हल खूपच कमी असते. तसेच तीव्र प्रकाश आणि मॉनिटरवरील रिफ्लेक्शनमुळे अक्षरे पाहणे कठीण जाते. पुस्तक, मासिक किंवा पेपर वाचताना तसेच कागदावर लिहिताना डोळ्यांपासूनचे अंतर आणि अँगल आणि कॉम्प्युटरवरील कामासाठी डोळ्यांपासूनचे अंतर आणि अँगल यात फरक पडतो. दोन्हींची तुलना केली तर कॉम्प्युटरवर काम करणे अधिक ताण निर्माण करणारे असते. यासाठी आपले वय कोणतेही असेल, पण स्क्रीनटाइम जास्त असेल तर आपल्याला कॉम्प्युटरमुळे दृष्टीला बाधा होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. त्यामुळे इथे नमूद केलेल्या कोणत्याही लक्षणांपैकी लक्षणे आढळली किंवा नसली तरीही रत्नागिरीत इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये उघडलेल्या खास कॉम्प्युटर व्हिजन क्लिनिकमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोमची तपासणी करून घ्यावी. त्यामुळे पुढे होणारी गुंतागुंत किंवा चष्म्याचा सतत वाढला जाणारा नंबर या गोष्टी नियंत्रणात ठेवता येतील.

इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये अशी तपासणी करण्यासाठी विशेष कॉम्प्युटर व्हिजन सूट तयार करण्यात आला असून यामध्ये जपानमधून आणलेल्या अत्याधुनिक यंत्रणेद्वारे अत्यंत कमी दरात सर्वंकष तपासणी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अशा प्रकारची सुविधा आणि कॉम्प्युटर व्हिजन क्लिनिक ही संकल्पना काळाची आणि लोकांची गरज लक्षात घेऊन इन्फिगोने सर्वप्रथम प्रत्यक्षात आणली आहे. ज्यांना रोज कॉम्प्युटर्स किंवा तत्सम साधनांवर काम करावे लागते, अशा सर्व वयोगटातील लोकांनी इन्फिगोच्या कॉम्प्युटर व्हिजन क्लिनिकचा सल्ला जरूर घ्यावा.

कॉम्प्युटर व्हिजन क्लिनिकमध्ये वेळ घेण्याकरिता ९३७२७६६५०४ या मोबाइल क्रमांकावर अपॉइंटमेंट आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.

  • डॉ. श्रीधर ठाकूर,
    व्यवस्थापकीय संचालक,
    इन्फिगो आय केअर, रत्नागिरी

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply