दापोली : वटपौर्णिमेच्या निमित्ताने येथे वटवृक्षाच्या रोपांचे मोफत वितरण करण्यात आले. प्रत्येक घरामागे एक वृक्ष लावण्याचा उपक्रम दापोलीतील निवेदिता प्रतिष्ठानने आखला आहे.
वारंवार होणाऱ्या वृक्षतोडीमुळे आणि वादळात कोसळलेल्या वृक्षांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. तो सुधारण्याच्या हेतून आज वटपौर्णिमेनिमित्त घरपट एक वडाचे रोप देण्याचा संकल्प निवेदिता प्रतिष्ठानने केला आहे. नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी केले आहे. दापोलीतील प्रभाकर शिंदे यांनी आपल्या रोपवाटिकेतील दोन वर्षे वयाची वडाची रोपे निवेदिता प्रतिष्ठानला दिली आहेत. वटपौर्णिमेला नागरिकांनी एक तरी झाड लावावे आणि ते जगवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या स्वतःच्या जागेत अथवा सार्वजनिक ठिकाणी हे वृक्ष लावावेत, अशी अपेक्षा आहे. वडाच्या झाडाबरोबरच जैवविविधता जपणाऱ्या वृक्षांची रोपेही नागरिकांना देण्यात येणार आहेत. रस्त्याच्या कडेची आणि इतर अशी अनेक झाडे वादळात जमीनदोस्त झाली आहेत. अशा ठिकाणी हे वृक्ष लावले जाणार आहेत. या मोहिमेत ७०० वृक्षांची लागवड केली जाणार आहे.
झाडे लावा, झाडे जगवा हा संकल्प शंभर टक्के राबविण्याचा निर्धार केलेले निवेदिता प्रतिष्ठानचे प्रशांत परांजपे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, दापोलीतील सरस्वती विद्यामंदिर आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या आवारात अशोकवनाची संकल्पना राबवली जाणार असून अशोकाशिवाय इतर अनेक झाडे लावली जाणार आहेत. त्यांची जपणूक केली जाणार आहे. यासाठी प्रभाकर शिंदे यांचे योगदान लाभणार आहे.
झाडे लावा प्लास्टिकची पिशवी द्या…..
वटपौर्णिमेच्या निमित्ताने सुरू केलेल्या मोफत वृक्षवाटप मोहिमेत लाभार्थींना दोन प्रेमाच्या अटी घालण्यात आल्या आहेत.
१) एका रोपासाठी दोन खड्डे खोदा. पहिल्या खड्ड्यात रोप लावल्यावर दुसरा खड्डा पावसाचे पाणी जिरण्याकरिता मोकळा ठेवा. सप्टेंबरअखेरीला तो बुजवून टाका.
२) रोप लावल्यावर त्या रोपाची पिशवी निवेदिता प्रतिष्ठानच्या कचरा संकलन केंद्रात आणून द्या. सोबत घरातील अविघटनशील कचराही द्या.
या दोन अटी मान्य असणाऱ्यांनाच संस्थेतर्फे मोफत रोपे दिली जात असल्याचे श्री. परांजपे यांनी सांगितले.
(अधिक माहितीसाठी संपर्क : प्रशांत परांजपे, निवेदिता प्रतिष्ठान, जालगाव, दापोली, मोबाइल – 95611 42078)

