रत्नागिरी-रायगड जोडणारा आंबेत पूल वाहतुकीला वर्षभरानंतर खुला

महाड : रत्नागिरी या जिल्ह्यांना जवळच्या मार्गाने जोडणारा आंबेत पूल वाहतुकीला वर्षभरानंतर खुला झाला आहे. रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी त्याचे आज उद्घाटन केले. नवीन पुलाचा प्रस्ताव लवकरच मंजूर होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जलद गतीने जोडणारा सावित्री नदीवरील आंबेत पूल आज खुला झाला. दुरुस्त झालेल्या या महत्त्वपूर्ण पुलाचे लोकार्पण पालकमंत्र्यांनी केले. रायगड जिल्ह्यातून रत्नागिरीतील दापोली, मंडणगड आणि खेड या तीन तालुक्यांना जोडणारा आंबेत पूल धोकादायक बनल्याने दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले होते. या दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद ठेवल्याने एसटी महामंडळाच्या बसेसअभावी नागरिक, विद्यार्थी तसेच पर्यटकांची मोठी गैरसोय होत होती. पर्यायी जलमार्गाने रो-रो सेवा सुरू करण्यात आली. मात्र ती सर्वसामान्यांना परवडणारी नसल्याने त्रासदायक बनले होते. पूल वाहतुकीसाठी सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. आजपासून पूल पुन्हा सुरू झाल्याने आता गैरसोय दूर झाली आहे. दुरुस्तीच्या कामासाठी बारा कोटी रुपये खर्च झाला.

पालकमंत्री अदिती तटकरे यांनी फीत कापून पूल वाहतुकीसाठी खुला केला. यावेळी म्हसळा पंचायत समितीच्या सभापती सौ. छाया म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य बबन मनवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष समीर बनकर, दापोलीचे माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे नेते अजय बिरवटकर, आंबेतचे माजी उपसरपंच नवीद अंतुले तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सावित्री नदीवरील आंबेत या ठिकाणी नवीन पूल उभारावा, अशी स्थानिकांची मागणी असून तसा प्रस्ताव संबंधित विभागाकडून राज्य सरकारकडे पाठवला गेला आहे. लवकरच या प्रस्तावाला महाविकास आघाडी सरकारकडून मंजुरी मिळून तेथे नवा पूल येत्या काही वर्षांत उभा राहील, असा विश्वास पालकमंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply