मनसेच्या कार्यकर्त्याने बिहारी बाबूला दाखवला पाटण्याचा रस्ता

रत्नागिरी : मथळा वाचून कोणालाही असे वाटेल की मनसेने परप्रंतीयाविरोधात एखादी कारवाई केली की काय? पण तसे काही नाही. उलट मनसे कार्यकर्त्याच्या मनात असलेल्या माणुसकीचे दर्शन घडविणारी घटना रत्नागिरी रेल्वेस्थानकात सोमवारी (२८ जून) घडली.

बिहारमधून रोजगाराच्या आमिषाने फसवून राजापूरला आणल्या गेलेल्या एका बिहारी ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या घरी पाठविण्याचे सत्कार्य रत्नागिरीतील मनसेचे शहर उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल श्रीनाथ यांनी केले. त्याचे असे झाले, रत्नागिरी रेल्वेस्थानकाच्या कोविड चाचणी केंद्रावर हेल्पिंग हँड्सचे सदस्य नियमितपणे मदतकार्य करत आहेत. नेहमीप्रमाणे त्यांचे कार्य चालू होते. मुंबईतून किंवा दक्षिण भारतातून आलेल्या प्रवाशांची करोनाविषयक चाचणी रत्नागिरी स्थानकात केली जाते. एकाच वेळी अनेक प्रवासी येत असल्याने त्यांची रांग लावणे, योग्य ते मार्गदर्शन करणे, तेथे उपस्थित असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक ती मदत करणे अशा स्वरूपाचे हे कार्य आहे. तशीच एक गाडी जाऊन बराच वेळ झाल्याने अमोल श्रीनाथ यांच्यासह इतर कार्यकर्ते आणि स्वयंसेवक निवांतपणे आलेल्या प्रवाशांची नोंद करत होते.

तेवढ्यात तेथे एक अनोळखी आणि घामाने डबडबलेली व्यक्ती येऊन उभी राहिली. त्या व्यक्तीचे डोळे पाणावलेले होते. विचारणा केली असता त्यांचे वय ६५ वर्षे होते. त्यांच्याकडे असलेल्या आधार कार्डावर जन्मतारीख १ जानेवारी १९५७ अशी होती. अरुणसिंग असे त्या आजोबांचे नाव होते. हात थर थर कापत होते. त्या आजोबांनी मदतीची मागणी केली. त्यांना कोणी तरी काम देतो, सांगून राजापूर येथे आणले होते, पण काम न देता अर्ध्या रस्त्यात त्यांना सोडून दिले होते. ते आजोबा कसेबसे रत्नागिरी रेल्वेस्थानकापर्यंत पोहोचले होते. आजोबांनी सकाळपासून काही खाल्ले नव्हते. म्हणून बहुधा त्यांचे हात कापत होते. त्यांना पाटणा (बिहार) येथे मुलीकडे जायचे होते. पण अनोळखी शहर, वेगळा प्रांत, भाषेची अडचण आणि खिशात पैशाचा अभाव यामुळे ते घाबरून गेले होते.

त्यांची ही अवस्था पाहून अमोल श्रीनाथ त्यांना घेऊन तिकीट काऊंटरवर गेले. तेथे चौकशी केली असता पाटण्याला जाणारी गाडी काल दिवशी नव्हती. एका टीसीने सल्ला दिला की मुंबईत कुर्ला येथून दुसऱ्या दिवशी (म्हणजे आज) दुपारी दोन वाजता पाटणा विशेष गाडी आहे. काळाचा विलंब न करता तात्काळ आजोबांना रात्री सुटणाऱ्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसचे रत्नागिरीहून कुर्ल्यापर्यंतचे आणि पुढे कुर्ला ते पाटणा गाडीचे रिझर्व्हेशन तिकीट तेथेच काढून दिले. तेथून श्रीनाथ त्यांना रेल्वे कॅन्टीनमध्ये घेऊन गेले. तेथे त्यांना जेवू घातले. आता आजोबांचे हात कापायचे बंद झाले होते. त्यांना एक आधार मिळाल्यासारखे वाटू लागले. त्यांना घेऊन रात्री ११ वाजता श्रीनाथ फलाट क्रमांक १ वर गेले. तेथे गाडी आल्यावर त्यांना त्यांना त्यांच्या आसनावर बसवून दिले. पुढे कुर्ला येथे उतरून पुढील प्रवास कसा करावा, हे समजावून सांगितले आणि एका कागदावर लिहूनही दिले. आजोबांच्या डोळ्यांत पाणी आले… पण आताचे ते आनंदाश्रू होते.

त्यांनी श्रीनाथ यांचा फोन नंबर एका चिठ्ठीवर लिहून मागितला. पोहोचल्यावर फोन करतो, असेही सांगितले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आता आनंदच वेगळा होता. जाता जाता त्या आजोबांनी श्रीनाथ यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ‘बेटा इतना कोई सगा भी अपने लिये नही करेगा.. मैं गांव जाके फोन करूंगा बेटी के मोबाइल से!’ असे म्हणून आजोबांनी आशीर्वाद दिला आणि ते रवाना झाले. आज कुर्ला येथे पोहोचल्यानंतर त्यांनी श्रीनाथ यांना आवर्जून फोन केला. आपला पुढचा प्रवास लवकरच सुरू होणार आहे, असे त्यांनी सांगितले. श्रीनाथ यांना कृतकृत्य वाटले.

याबाबत ते म्हणाले, आपल्या सगळ्यांचे माणुसकीचे एक नाते जुळलेले असते. आजोबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला बरं वाटलं. कधी कोण कोणत्या अडचणीत असेल, सांगता येत नाही. त्यामुळे अडीअडचणीच्या वेळी एकमेकांना मदत करा …हाच माणुसकीचा धर्म!

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply