दिशान्तर संस्थेतर्फे ३.३० लाखाच्या श्रमसन्मानाचे वितरण

चिपळूण : शेतीतून महिलांना आर्थिक समृद्धीचा राजमार्ग दाखविणाऱ्या दिशान्तर संस्थेतर्फे ३ लाख ३० हजार रुपयांच्या श्रमसन्मानाचे वितरण करण्यात आले.

सहकारातून सामुदायिक शेतीच्या अन्नपूर्णा प्रकल्पातील महिला शेतकऱ्यांनी सलग पाचव्या वर्षीच्या रब्बी हंगामात लक्षावधींची उलाढाल साधली. आजच्या वैश्विक करोना संकटात सारे जग ठप्प झाले असताना आणि उद्योग-व्यवसायातून उत्पन्नाचे साधन उरले नसताना अन्नपूर्णा प्रकल्पाची ही यशोगाथा शेतीकडे पाहण्याची जीवनदृष्टी देऊन जाणारी ठरली आहे. आज तीन महिला शेतकरी गटांनी आपल्या श्रमसन्मानाचे वितरण केले. पहिल्या टप्प्यातील वितरित करण्यात आलेली ही रक्कम ३ लाख ८० हजार ५३२ इतकी होती. विशेष म्हणजे पुढील वर्षीच्या रब्बी हंगामासाठी आर्थिक तरतूद करून दुसऱ्या टप्प्यात लाभांशाचे वितरण केले जाणार आहे. अल्पभूधारक आणि भूमिहीन महिलांनी शेतीत केलेले हे काम क्रांतिकारी ठरले आहे.

पोटातील भुकेची खळगी केवळ अन्नच भरू शकते. पण शेती करायची कोणी, असा मोठा प्रश्नप गेल्या काही वर्षांमध्ये प्रकर्षाने उभा ठाकला. शेती आतबट्ट्याची होते, शेतीत राम राहिला नाही, माझा मुलगा शेती करतो, हे अभिमानाने सांगण्याची नव्हे, तर बोलण्याचीदेखील सोय राहिली नाही. शेतीचा पोत बिघडला. त्यातही जुन्या पिढीतील ज्येष्ठ शेतकऱ्यांनी ती कशीबशी केली. पण आता वर्षभर शेतात राबून फक्त एक भातपीक कमवायचे. शेतीतला खर्चदेखील त्यातून निघत नाही. अशा साऱ्यात पार्श्वभूमीवर शेतीतले हे प्रत्ययकारी यश साऱ्यांनाच अचंबित करणारे ठरले आहे.
महिलांनी केलेली शेती, सहकार आणि सामुदायिक नि नैसर्गिक पद्धत याच जोडीने दलालमुक्त विक्री व्यवस्था अशा पंचसूत्रीचे दिशान्तर संस्थेचे धोरण आहे. यातून शेतीतून महिलांनी मोठी आर्थिक उलाढाल केली. याच जोडीने तालुका, जिल्हा ते विभाग स्तरापर्यंत शेती स्पर्धेत यशदेखील मिळवले. या शेतीने वेहेळे (ता. चिपळूण) येथील प्रगती आणि भाग्यश्री शेतकरी महिलांना ओळख दिली. जलव्यवस्थापन, विक्री व्यवस्था, स्व-मालकीची मालवाहक गाडी अशा साऱ्या कौशल्यासह आणि आर्थिक समृद्धीसह महिला सक्षमीकरण इथे साधले गेले. वेहेळे -राजवीरवाडीतील याच यशाची पुनरावृत्ती चिपळूण तालुक्यातील मांडवखरी गावात घडली आहे. दिशान्तर संस्थेने कन्साई नेरोलॅक पेन्ट्स लि. या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्वातून तेथे समृद्ध परसबाग आणि सहकारातून सामुदायिक शेती तसेच अळंबी, मसाले पीक अशा पद्धतीचा अन्नपूर्णा प्रकल्प साकारला आहे. दिशान्तर संस्थेने कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्वातून अन्नपूर्णा प्रकल्प साकारला. त्यायोगे बी-बियाणे, सेंद्रिय खतांची निर्मिती, पॉवर टिलर, पाणी पंप, भात मळणी यंत्र, मोबाइल राइस मिल अशा यंत्रसामग्रीचे सहकार्य करण्यात आले. दरवर्षी सरासरी सहा लाख रुपयांवर शेतीतून उत्पन्नाचे सातत्य राखण्यात यश मिळाले आहे, हे विशेष. तीन गटांनी मिळविलेली आर्थिक उन्नती आत्मनिर्भर भारताचे एक छोटेसे प्रतिबिंब ठरली आहे.

शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याची दृष्टी विकसित करून अर्थसबलता, सामाजिक प्रतिष्ठा, शेती सन्मान, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे ज्ञान अशा साऱ्यातून महिला सक्षमीकरण अशी किमया दिशान्तर संस्थेने साधली आहे. विशेष म्हणजे शेतीतील हे यश येत्या खरीप हंगामात अर्ध्या तपाच्या वर्षपूर्तीकडे वाटचाल सुरू करीत आहे.

हीच पद्धत चिपळूण तालुक्यातील चार ठिकाणी परावर्तित होत आहे. तेथील शेतकरी समूहाने सहकार आणि वैयक्तिक स्तरावर खरीप, रब्बी हंगामातील शेतीसह अळंबी, विविध प्रकारची फळबाग आणि परसबाग लागवड केली आहे. काळीमिरी, हळद यासारखी मसाले पिके उत्तम पद्धतीने घेतली आहेत. खरीप हंगामात पांढऱ्या भातासह लाल व काळ्या भाताचे बीजारोपण दरवर्षीप्रमाणे करण्यात आले आहे. शेतीपूरक व्यवसायांना या भागात आता चालना देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply