कुशेवाडा ग्रामपंचायतीला पंधरा लाखाचे स्वच्छता बक्षीस प्रदान

सिंधुदुर्गनगरी : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा २०१७-१८ चा बक्षीस वितरण सोहळा आज ऑनलाइन पद्धतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी राज्यात तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या कुशेवाडा (ता. वेंगुर्ले) ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना पंधरा लाखाचे बक्षीस प्रदान करण्यात आले.

बक्षीस वितरण समारंभात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतून ऑनलाइन सहभागी झाले होते. ते म्हणाले, महाराष्ट्रला संताची परपंरा आहे. संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनी स्वच्छतेचा वसा दिला आहे. हेच स्वच्छतेचे कार्य पुढे नेण्याचे काम सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. जेथे जिद्द आणि निश्चय असतो, तेथे यश नक्की मिळते. त्यामुळेच हागंदारीमुक्त महाराष्ट्र अभियानाप्रमाणे करोनामुक्त महाराष्ट्र नक्की होईल.

कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, ऑनलाइन माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, वेंगुर्ले पंचायत समिती सभापती अनुश्री काबंळी, कुशेवाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच स्नेहा राऊळ, उपसरपंच नीलेश सामंत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे, पाणी आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते कुशेवाडा ग्रामपंचायतीला १५ लाखाचा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या अभियानात अनवखेड (ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक) ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक, लोणी बुद्रुक (ता. राहता, जिल्ह अहमदनगर) ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांक मिळाला. याशिवाय कान्हेवाडी तर्फ चाकण (ता. खेड जिल्हा पुणे) ग्रामपंचायतीला स्व. वसंतराव नाईक पुरस्कार (पाणी गुणवत्ता पिण्याचे पाणी व सांडपाणी व्यवस्थापन क्षेत्र), पारकुडी (ता., जि. गडचिरोली) ग्रामपंचायतीला स्व. आबासाहेब खेडकर स्मृती पुरस्कार (कुटंबकल्याण क्षेत्र) चादोरे (ता. माणगाव, जिल्हा रायगड) ग्रामपंचायतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (सामाजिक एकता) असे विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

स्वच्छतेसाठी श्रमदान, लोकसहभाग, माध्यमातून स्व. आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ही लोकचळवळ उभी केली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कारामुळे राज्यातील गावे स्वच्छ होण्यास नक्कीच मदत झाली आहे. सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमांत सर्वांनी सहभागी घेऊन स्वच्छतेत सातत्य राखने गरजेचे आहे. यामुळे सर्वांचेच आरोग्यमान सुधारण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply