तिवरे धरणग्रस्तांमधील २४ जणांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घरे सुपूर्द

रत्नागिरी : तिवरे (ता. चिपळूण) येथील धरण दुर्घटनाग्रस्तांसाठी अलोरे (ता. चिपळूण) येथे सिद्धिविनायक न्यासाच्या निधीतून घरे बांधण्यात आली आहेत. त्यातील २४ जणांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे घरे सुपूर्द करण्यात आली.

दोन वर्षांपूर्वी दोन जुलै २०१९ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास तिवरे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथील धरण फुटले होते. त्यामुळे बेघर झालेल्यांचे पुनर्वसन अलोरे येथे करण्यात आले आहे. त्यातील काही घरे दुर्घटनाग्रस्तांना आज ऑनलाइन आणि प्रत्यक्ष कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आली. कार्यक्रमाला मुंबईतून ऑनलाइन उपस्थित असलेले मुख्यमंत्री म्हणाले, तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धिविनायक न्यासाने दिलेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या २४ घरांचे आज लोकार्पण होत आहे. त्यांना हक्काचा निवारा मिळत आहे, याचे समाधान आहे. उर्वरित धरणग्रस्तांनाही एक वर्षाच्या आत घरे देण्यासाठी लागणाऱ्या ७ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव आणि आराखडा तातडीने पाठवावा, हा निधी उपलब्ध करून दिला जाईल. आज माझ्या मनात संमिश्र भावना आहेत. एकीकडे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या दुर्दैवी लोकांच्या कुटुंबीयांविषयी मनात सहवेदना आहे तर दुसरीकडे बाधितांना त्यांच्या हक्काचा निवारा आपण आज देत आहोत. या आपत्तीच्या प्रसंगात अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. त्यात सिद्धिविनायक मंदिर न्यासाचाही सहभाग होता. त्यांनी बाधितांच्या पुनर्वसनासाठी मदत केल्यामुळे भाविकांनी मंदिरात केलेले दान सत्पात्री लागले आहे, असे म्हणता येईल. मी हे दान करणाऱ्या भाविकांना आणि मंदिर न्यासाला त्यांच्या धन्यवाद देतो. कोविड काळात राज्यातील अनेक देवस्थानांनी पुढाकार घेऊन राज्य शासनाला आणि थेट नागरिकांना केलेल्या मदतीचाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.

तिवरे धरणग्रस्तांना नवीन घरे देताना आजूबाजूच्या परिसरात पुन्हा अशा घटना घडू नयेत, याची काळजी घेण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, निसर्गाची ताकद मोठी आहे. निसर्ग लहरी होत आहे. अनियंत्रित, अनियमित पावसामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते, हे लक्षात घेऊन राज्यभरात अशा प्रकारे घटना घडू नयेत यासाठी सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. वित्तहानी भरून काढता येते, परंतु मनुष्यहानी न भरून येणारी असते. त्यामुळे एकही जीव जाऊ न देणे हे आपले पहिले प्राधान्य आहे.

कार्यक्रमाला परिवहन मंत्री तथा पालकमंत्री ॲड. अनिल परब, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मंत्री उदय सामंत यांनी यावेळी तिवरे धरणग्रस्तांचे पुनर्वसन करताना उर्वरित घरांच्या बांधकामासाठी ७ कोटी रुपये लागणार असून हा निधी लवकरात लवकर मिळाल्यास उर्वरित बाधित कुटुंबांनाही हक्काचा निवारा लवकर मिळू शकेल, अशी मागणी केली.

सिद्धिविनायक मंदिराने आपत्तीच्या प्रसंगात तिवरे धरणग्रस्तांच्या पाठीशी उभे राहाताना त्यांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे आदेश बांदेकर म्हणाले. त्यांनी सिद्धिविनायक मंदिर न्यास विविध सामाजिक उपक्रमांसाठी, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रासाठी मदत करत असल्याचेही सांगितले. हा पैसा भाविकांनी मंदिरात दान केलेला आहे. तो राज्यातील नागरिकांच्या मदतीसाठी वापरण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

खासदार विनायक राऊत यांच्यासह इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी तिवरे दुर्घटना, नागरिकांना पुन्हा उभे करण्यासाठी करण्यात आलेले सामूहिक आणि प्रशासकीय पातळीवरचे प्रयत्न तसेच इतर बाबींचा आढावा घेतला. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना राज्य आणि केंद्राची मिळून प्रत्येकी ६ लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आल्याची, पशुधनाच्या हानीपोटी ३ लाख रुपयांच्या रकमेचे वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

त्या दुर्घटनेची भीषणता दर्शविणारा व्हिडिओ…

फेरोसिमेंटच्या घरांच्या प्रस्तावाबद्दलचा व्हिडिओ…

धरणफुटीनंतर आपल्या मालकाच्या घराच्या चौथऱ्यावर झोपलेला कुत्रा

……………………

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply