गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांना तळेरेवासीयांची आदरांजली

तळेरे (ता. कणकवली) : सिंधुदुर्गचे सुपुत्र, ज्येष्ठ पत्रकार, अखिल भारतीय गझल संमेलनाचे माजी अध्यक्ष, गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे गेल्या रविवारी (११ जुलै) निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या दृक्श्राव्य माध्यमातील शोकसभेत अनेकांचे डोळे पाणावले. यावेळी उपस्थितांनी मधुसूदन नानिवडेकर यांच्या हृद्य आठवणींना उजाळा दिला.

अलीकडील तीन-चार वर्षे नानिवडेकर तळेरे येथे राहत होते. त्यांचे तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ आणि येथील सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राशी सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दृक्श्राव्य माध्यमातून शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध मते व्यक्त केले.

सुरेश भट यांच्यानंतर मराठीमध्ये गझल या काव्यप्रकाराच्या समृद्धीचा वारसा नानिवडेकर यांनी जपला. त्यांचे निधन म्हणजे जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्राची खूप मोठी हानी असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. अनेकांना त्यांनी लिहिते केले आणि साहित्य क्षेत्रात असंख्य लिहित्या हातांना त्यांनी आपल्यासोबत घेऊन मार्गदर्शन केले. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या गझलेचा विशेष चाहता वर्ग आहे, असे मत साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले.

शोकसभेला डॉ. प्रकाश बावधनकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, सुप्रसिद्ध कवी प्रा. प्रदीप पाटील (इस्लामपूर), सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सूर्यकांत तळेकर, संतोष टक्के, नाधवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. एस. पाटील, प्राचार्य बाजीराव जांभेकर, कवी-लेखक प्रमोद कोयंडे, सदाशिव पांचाळ, राजेश जाधव, तळेरे येथील श्रावणी कॉम्प्युटर एज्युकेशनच्या संचालिका सौ. श्रावणी मदभावे, सुधीर नकाशे, बाबा कोकाटे, अरविंद कुडतरकर, प्रा. सुरेश पाटील, वारगावचे मुख्याध्यापक हनुमंत वाळके, कोकिसरे हायस्कूलचे शिक्षक स्वप्नील पाटील, तळेरे‌ हायस्कूलच्या शिक्षिका धनलक्ष्मी तळेकर, तळेरे पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय मारकड, उपाध्यक्ष उदय दुदवडकर, उत्तम सावंत, सचिव संजय खानविलकर, निकेत पावसकर, सचिन राणे, गुरुप्रसाद सावंत, सतीश मदभावे, प्रा. विनायक पाताडे आणि अन्य उपस्थित होते. यावेळी तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाकडून नानिवडेकर यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याबाबत आवाहन करण्यात आले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply