प्रकोप : किती नैसर्गिक? किती मानवनिर्मित?

चिपळूणसह कोकणात पुन्हा एकदा अतिवृष्टी.. पुन्हा एकदा महापूर… पुन्हा एकदा दरडी कोसळणं… पुन्हा एकदा बचावकार्य… पुन्हा एकदा मदतकार्य.. गेली अनेक दशकं हे असं आणि असंच चालू आहे.. यावर काहीच उपाय नाही का? निसर्गाचा प्रकोप झाला तर मनुष्य काही करू शकत नाही, पण किमान मानवी चुका टाळल्या जाऊ शकत नाहीत का? प्रश्न असा आहे की या चुका टाळण्याची खरंच आपली इच्छा आहे का?
……

तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कटारी
तेच दंश करिती आम्हा साप हे विषारी
आम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुशाली

वर्षानुवर्षं हे असंच सुरू आहे, तरी त्याचे चिंतन आम्ही कधी करणार? गाळाने भरलेली नदीपात्रं, अतिक्रमणाने आक्रसलेले ओढे हे तर निसर्गान नाही केलं? बाजापेठेची रचना जी चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे, ती तर निसर्गाने नाही केली? नगररचना नावाचं शास्त्र अस्तित्वात असूनसुद्धा भ्रष्टाचार करून त्यातील शास्त्रोक्त पद्धत धुळीला मिळवण्याचं काम तर निसर्गानं नाही केलं? बेसुमार जंगलतोड करून सिमेंट-काँक्रीटचं जाळं उभारून तापमानवाढीचं पाप तर निसर्गानं नाही केलं? मान्सूनपूर्व तयारीच्या बैठका घेऊन फक्त कामाचे देखावे करून त्यातून आपणच टेंडर घेऊन आपली पोट भरण्याचा कृतघ्नपणा तर निसर्गाने नाही केला? शहर विकासाच्या आराखड्याच्या नावाखाली आपल्याच बगलबच्च्यांना वाट्टेल तिथे वाट्टेल तशा अनधिकृत इमारतींना परवानगी देण्याचं दुष्टकर्म तर निसर्गाने नाही केलं? प्रत्येक वेळी सगळं खापर निसर्गावर फोडून आपण आपल्या पापातून मुक्त होऊ शकत नाही.

मग हे आपल्याला दंश करणारे साप कोण आहेत, हे ओळखायला आपणच कमी पडतोय का, याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे, हे आपल्याला समजतच नाही का?

धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली

या सर्व संकटसमयी मदत करणाऱ्या सर्वांचं कौतुक करताना आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की या मदतकार्यातसुद्धा आपापल्या नेत्याची जाहिरात करण्याची अहमहमिका काही कार्यकर्त्यांमध्ये लागलेली दिसतेय. जिथे काही सामाजिक संस्था अत्यंत निरपेक्ष वृत्तीने आणि आपल्या कामाचा कोणताही गवगवा न करता काम करताहेत, तिथे आपल्या नेत्याचे पाहणी करतानाचे फोटो आणि ते कसे तत्परतेने मदतीसाठी धावले, याची वर्णनं करण्यात कार्यकर्ते मश्गूल असावेत, हे कुठल्या संवेदनशीलतेचं लक्षण आहे? विझल्या चितांचे निखारे अजून धुमसतायत तरी मुर्दाड वधस्तंभांना अजून रक्ताची आस आहे, याचं दुःख होण्यापेक्षा जास्त संताप येतो आणि कींव वाटते.

आज आलेल्या संकटात मदत करायला हवीच आहे यात कुठलीही शंका नाही पण यापुढे अशा प्रकारची संकटं येऊ नयेत, म्हणून आपण अधिक जबाबदारीने वागणार असू आणि संबंधितांना वागायला लावणार असू तर ती खरी आज या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली ठरेल. अन्यथा परत ये रे माझ्या मागल्या याप्रमाणे हे चालूच राहील.

निसर्गाची हाक मानवाने ऐकली तर आणि तरच मानवाची हाक निसर्गसुद्धा ऐकेल. प्रश्न आहे तो आपल्याला निसर्गाची हाक ऐकू येते का, याचा. ती ऐकायला शिकलो तर आणि तरच पुढच्या काळात काही खरं आहे अन्यथा विनाश अटळ आहे!

  • निबंध कानिटकर
    (संपर्क – ९४२२३७६३२७)
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply