संपूर्ण देश चिपळूण महापूरग्रस्तांच्या पाठीशी – राज्यपाल कोश्यारी

पूरग्रस्त चिपळूण परिसराची पाहणी

चिपळूण : केवळ राज्य आणि केंद्र सरकारच नव्हे, तर संपूर्ण देश चिपळूणमधील महापूरग्रस्तांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली.

मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मदत करणे महत्त्वाचे आहे. केंद्र शासनाकडूनही आवश्यक ती मदत दिली जाईल, संपूर्ण देश पूरग्रस्तांच्या दुःखात सहभागी आहे, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

चिपळूण येथील पूरपरिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्यपाल श्री. कोश्यारी आज चिपळूण दौऱ्यावर आले होते, त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी गुहागर येथील आरजीपीपीएल गेस्ट हाऊस येथे झालेल्या आढावा बैठकीत सूचना देताना श्री. कोश्यारी म्हणाले, अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरावर ही दुर्दैवी वेळ आली आहे. मात्र प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही करावी.

आढावा बैठकीत राज्यपालांनी प्रशासनाकडून आतापर्यंतच्या झालेल्या बचाव आणि मदत कार्याबाबतची सविस्तर माहिती घेतली. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे पूरपरिस्थिती आणि प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. सध्या देण्यात असलेल्या मदतीबाबतची माहिती दिली. हे मदतकार्य असेच सुरू राहावे आणि प्रत्येक पूरग्रस्त नागरिकाला शासकीय मदत वेळेवर पोहोचवावी, अशा सूचना यावेळी राज्यपालांनी केल्या.

राज्यपालांनी बैठकीनंतर चिपळूण शहरात व्यापारी तसेच नागरिकांशी संवाद साधला. आपल्या या भेटीदरम्यान त्यांनी बाजारपेठेत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, आमदार आशीष शेलार, विभागीय आयुक्त विलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग आदी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply