का साजरी करतात दीप अमावास्या?

आज, आठ ऑगस्टला आषाढी अमावास्या म्हणजेच दीप अमावास्या आहे. ही तिथी का साजरी केली जाते?

………………………..
आषाढी अमावास्येला दिव्यांची अवस असेही म्हणतात. या तिथीला परंपरेने तिन्हीसांजेला सामुदायिक दीपपूजन केले जाते. अंधाराचा नाश झाल्यामुळे सर्वत्र सुरेख प्रकाश पडतो. तेज, अग्नी, मांगल्याचा सुरेख प्रत्यय येतो. त्यामुळे परंपरेने आपल्याकडे नवरात्र, दिवाळी यादरम्यानदेखील दीपप्रज्वलन केले जाते. परंपरेने आपल्याकडे रोज तिन्हीसांजेला तुळशी वृन्दावन वा देव्हाऱ्यासमोर घरातील सारी मंडळी एकत्र बसून अत्यंत मंगल वातावरणात परवचा [‘’ शुभं करोति कल्याणं,आरोग्यधन संपदा………..’’] म्हणतात. सर्वांना उत्तम आयुरारोग्य, शांती, संपत्ती, संतती, स्थिरता लाभावी, हा त्यामागे प्रमुख उद्देश असतो.
आषाढ महिना संपून दुसऱ्या दिवशी श्रावण महिना चालू होतो. हिंदू परंपरेत श्रावण महिना अत्यंत पवित्र समजला जातो. त्या महिन्यात बहुतांशी धार्मिक कार्ये केली जातात. उपास-तपास, व्रतवैकल्ये, पूजाअर्चा, दानधर्म, नवे संकल्प इत्यादींनी हा काळ अत्यंत समृद्ध होत असतो. त्या पवित्र महिन्याच्या आदल्या दिवशी अमावास्येला दीपपूजन केले जाते. त्याला विशेष महत्त्व आहे.
दीपपूजन पद्धती – दिव्याची आरास आपल्याला नवीन नाही. त्यामुळे साहजिकच दीपावली [दिव्याची रांग] सर्वत्र लावली जाते. ते दिवे तेवल्यानंतर सर्वत्र पसरणारा प्रकाश सर्वांना खचीतच प्रेरणा आणि वेगळा उत्साह, आनंद देऊन जातो. दीप अमावास्येच्या अगोदर घरातील सर्व प्रकारचे दिवे, समया, लामणदिवे, निरांजने, पणत्या साफसूफ केल्या जातात. तिन्हीसांजेच्या वेळी पाट किंवा चौरंगावर वस्त्र पसरवून विविध प्रकारचे दिवे तेल, तुपाने लावले जातात. पाटासभोवती छानशी रांगोळी काढली जाते. दिव्यांना हळद-कुंकू, गंध, फुले वाहून, धूप ओवाळून फळे आणि इतर नैवैद्य दाखविला जातो. कणीक आणि गूळ, तूप एकत्र करून त्याचाही नैवैद्य बनविला जातो. यथाशक्य दिव्यांचे पंचोपचारी पूजन केले जाते. त्यावेळी यथायोग्य मंत्र म्हटले जातात. दिवे संध्याकाळी म्हणजे कातरवेळी/तिन्हीसांजेच्या वेळी लावले जातात. त्या वेळेस लहान मुलांच्या उपस्थितीत ते पूजन केले जाते आणि मुलांचे औक्षण करून तेजरूपी अग्नीची प्रार्थना केली जाते. अत्यंत श्रद्धेने दीपपूजन केले जाते. दीपप्रज्वलनाने सर्वत्र सुरेखसा उजेड पडतो. अंधाराचा नाश होऊन त्याद्वारे खरेखुरे ज्ञान प्रचार-प्रसार होऊन आपल्यातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, परंपरा, रोग, व्याधी नष्ट व्हाव्यात, हा मोठा विचार त्यामागे आहे [तमसोमा ज्योतिर्गमय].
मात्र दुर्दैवाने घडते मात्र भलतेच. या अमावास्येला गटारी म्हणून अत्यंत वाईट आणि हीन शब्दांनी आपल्या समाजाकडूनच अपमानित केले जाते. वास्तविक गटारी हा इंग्रजी शब्द आहे. दीपपूजनाचा आणि मद्याचा काहीही संबंध नाही. चंगळवाद जोपासताना आपण नको तेथे विचाराने आणि कृतीने भरकटत चाललो आहोत, हे आपल्या लक्षातच येत नाही. आपल्या संस्कृतीत सणांना फार महत्त्व दिले आहे, त्यामागे सामाजिक आरोग्याचाही विचार नक्कीच केला आहे.
वैद्यकीय महत्त्व – आषाढी अमावास्येला गताहारीदेखील म्हटले जाते. गत + आहारी म्हणजे गेलेला आहार. या अमावस्येअगोदरचा आहार. तो सोडून श्रावणात वेगळा आणि सात्त्विक आहार घ्यावयाचा असतो. त्याचा प्रारंभ अमावास्येच्या दीपप्रज्वलनाने होतो. एक प्रकारे दिव्याच्या साक्षीने श्रावणातील आहारासाठी आपण सज्ज होत असतो. सज्ज व्हावे अशी अपेक्षा असते. श्रावण महिन्यातील हवामान अन्नपचनास अनुकूल नसल्याने हलका आहार अपेक्षित असतो. ताज्या भरपूर भाज्या या काळात उपलब्ध असल्याने वैद्यकीयदृष्ट्या उत्तम शाकाहार योग्य असतो. जडान्न किंवा पचायला कठीण अन्न केव्हाही आरोग्य बिघडविण्यास प्रवृत्त करीत असते. त्यासाठीच उपवास, व्रत-वैकल्यांमुळे श्रावणात मर्यादित अन्नसेवन होत असते. उपवासाच्या निमित्ताने खाल्ल्या जाणाऱ्या कंदमुळांमुळे आपसूक दुर्मिळ खनिजे आणि पोषक द्रव्ये सेवन केली जातात.
या साऱ्या गोष्टींचा सर्वांकडून या दीप अमावस्येच्या निमित्ताने आरोग्याच्या दृष्टीनेही योग्य तो विचार आणि कृती होणे आवश्यक वाटते.

  • रामकृष्ण विनायक अभ्यंकर,
    2-46, भक्तियोग सोसायटी, परांजपे नगर,
    वझिरा नाका, बोरिवली (प.), मुंबई 91
    (संपर्क – 9819844710)
    ……….

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply