गणराया, करोनाच्या घोळात सर्वांना चांगली बुद्धी दे!

गेल्या महिन्याच्या १५ तारखेला “संकटीरक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया” असा लेख लिहिला आणि त्यामध्ये गणपतीसाठी गावाला येणारे चाकरमानी, त्यांचे लसीकरण, गावातील स्थानिकांचे लसीकरण आणि गणपतीमध्ये होणारी गर्दी याबाबत चर्चा केली. त्या लेखामध्ये लसीकरणाविषयी स्वतंत्र लेखात चर्चा करू, असे मी म्हटले होते. आज ती चर्चा करायचीच आहे. पण त्याबरोबरच सध्या आरोग्य विभागाकडून सक्तीने केल्या जाणाऱ्या टेस्टिंगवरही चर्चा करणे जास्त आवश्यक आहे.

गेले अनेक महिने आपण पाहत आहोत की करोनाबाबत शासन आणि प्रशासन या दोन्ही स्तरावरून अतिशय नियोजनशून्य कारभार सुरू आहे. कोणाचा कोणाला मेळ नाही, अशी परिस्थिती आहे आणि यात भरडला जातोय तो सामान्य माणूस. साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार असलेल्या तरतुदींच्या भीतीमुळे सामान्य लोक याविरुद्ध आवाज उठवायला घाबरतात आणि नेमका याचाच फायदा प्रशासन आणि राजकारणी घेत आहेत. प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या एखाद्या कृतीचे कोणतेही ठोस असे शास्त्रीय कारण त्यांच्याकडे नसते, आम्हाला वाटले म्हणून किंवा एखाद्या नेत्याने सांगितले म्हणून इतक्या बालिश पद्धतीने एवढ्या मोठ्या महामारीच्या काळात कारभार केला जात असेल, तर सामान्य माणसाचे हाल होणार, यात शंका नाही.

जून महिन्यात संगमेश्वर तालुक्यातील पाच गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली होती. त्याबाबतचे योग्य स्पष्टीकरण अजूनही प्रशासनाला देता आलेले नाही. त्यावेळी डेल्टा रुग्ण आहेत म्हणून ही सगळी वातावरण निर्मिती करण्यात आली, त्याचे पुढे काय झाले हे माहीत नाही. त्याच पुढे काहीच झाले नसेल तर तेव्हा असे का केले, याचे उत्तर कोणाकडे नाही किंबहुना जनतेला ते उत्तर देण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेला वाटत नाही. त्या पाच गावांमधील लोकांच्या सरसकट टेस्ट केल्या गेल्या आणि त्या माध्यमातून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी केला गेला, हे आकड्यांचे खेळ करून प्रशासनाने स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेतली, पण त्यासाठी त्या गावातील लोकांना किती त्रास झाला याचा विचार कोण करणार? त्यावेळी त्या पाच गावांमधील लसीकरणाला प्राधान्य देण्याची घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात किती जणांचे लसीकरण झाले, याचीही आकडेवारी एकदा जाहीर झाली पाहिजे.

आता पुन्हा एकदा हा खेळ जिल्हा स्तरावर सुरू झाला आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला रोज १५० आरटी-पीसीआर टेस्ट करण्याचे बंधन घातले गेले आहे. मला या यंत्रणेच्या भविष्यकथनाची खरेच कमाल वाटते की यांना कसे कळते की प्रत्येक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या गावांमध्ये करोनाबाधित रुग्ण आहेत हे? १५० टेस्टचे टारगेट हा विषयच मुळात अनाकलनीय आहे. १५० च काय एखाद्या ठिकाणी १५०० सुद्धा टेस्ट कराव्या लागू शकतात, तर एखाद्या ठिकाणी १५ सुद्धा लागणार नाहीत. याचा मुळात बेस, ट्रेसिंग हा असायला हवा. ते सोडून सरसकट अशा वाट्टेल तशा टेस्टचा आकड्यांचा खेळ खेळायचा आणि गणपतीपूर्वी आमच्या जिल्ह्यातील करोना कसा आटोक्यात आला, याचे ढोल वाजवायचे म्हणजे कोणतेही निर्बंध न लावता किंवा काळजी न घेता आपले मतदार कोकणात आणायला राजकारणी मोकळे. असा हा सगळा उद्योग गणपतीच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे आणि पुन्हा एकदा त्यात सामान्य माणूस भरडला जाणार आहे.

हे सगळे होत असताना लसीकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचे! गावपातळीवर लसीकरणाची गती अत्यंत कमी आहे. त्यावेळी “काय करणार, वाडीवरचे लोक लसीकरणाला येतच नाहीत”, असे म्हणायचे. पण या लोकांना लसीकरणासाठी उद्युक्त करायला गावपातळीवरच्या पुढाऱ्यांनी किती प्रयत्न केले? ज्या शक्तीने त्या पाच गावांमधील लोकांचे टेस्टिंग करण्यासाठी सर्व शक्तीचा उपयोग करण्यात आला ती शक्ती लसीकरणासाठी का वापरण्यात आली नाही?

हे सगळे करत असताना ना ICMR चे नियम पाळले जात, ना शास्त्रज्ञांच्या मताचा विचार केला जात. प्रत्येक गावामध्ये सरसकट टेस्टिंग करताना लोकांना टेस्टिंगचे बंधन घालायचे आणि ICMR ला सांगायचे की या सर्व टेस्ट ऑन डिमांड आहेत, असा सर्व बनवाबनवीचा खेळ सुरू आहे. ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे आणि ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशांचे टेस्टिंग कशासाठी करायचे? असे असेल तर मग लसीकरणाचा हेतूच संपुष्टात येईल.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच राजकारण्यांना आपापल्या मतदारांना गणपतीला गावी आणायची घाई झाली आहे. गणपतीला येणारे चाकरमानी हे कोकणातल्या कोणाचे ना कोणाचे नातेवाईकच आहेत. ते सर्वजण कोकणातील लोकांना येऊ नयेत, असे बिलकुल वाटत नाहीये. पण त्यासाठी गावी राहणाऱ्या लोकांना वेठीस धरू नका, आमच्या चाकरमानी बांधवांची योग्य काळजी घेऊन त्यांना इकडे जरूर येऊ द्या, त्यांचे लसीकरण करा, कोकणात राहणाऱ्या सर्व लोकांचे जास्तीत जास्त लसीकरण होईल याकडे लक्ष द्या. नुसत्या आकड्यांच्या खेळाने काही होणार नाही. गणपती होतील, चाकरमानी निघून जातील आणि पुन्हा इकडे राहणारा सामान्य माणूस अडचणीत येईल. जे शिमग्यानंतर झाले तेच पुन्हा आता करू नका आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, राजकारण्यांचे हे सर्व खेळ सामान्य माणूस पाहतो आहे. तो आत्ता शांत आहे याचा अर्थ त्याला काही समजत नाही असा नाही. योग्य वेळी त्याचा जाब विचारल्याशिवाय तो स्वस्थ बसणार नाही. पण त्यापूर्वीच लोकांच्या सहनशक्तीचा अंत बघू नका.

हे गणराया, सर्वांना चांगली बुद्धी दे !

  • निबंध कानिटकर, संगमेश्वर
    (संपर्क – ९४२२३७६३२७)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply