सूडाच्या राजकारणात कोकणाची होरपळ

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर रत्नागिरी जिल्ह्यात त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान कारवाई झाली. त्यामुळे त्यांची यात्रा काही काळासाठी स्थगित करावी लागली. श्री. राणे यांनी महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नेहमीच्या शैलीत वैयक्तिक टीका केली, हे त्यांच्यावरील कारवाईचे प्रमुख कारण होते. करोनाच्या काळातील अनेक अटी शिथिल करण्याच्या बाबतीत आणि नव्या नियमांच्या बाबतीत जो वेळकाढूपणा राज्य शासनाने केला होता, त्याची भरपाई अवघ्या काही तासांमध्ये केंद्रीय मंत्र्याविरुद्ध पोलीस कारवाई करण्याची तत्परता दाखवून केली आहे. या कारवाईच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षांमधील नव्हे, तर नारायण राणे आणि उद्धव ठाकरे या दोन व्यक्तींमधील द्वेषाने किती हीन पातळी गाठली आहे, त्याचे दर्शन घडले. रात्रंदिवस कोकणविकासाचा धोशा लावणाऱ्या नेत्यांनी आणि त्यांच्या पक्षांनी सूडाचे राजकारण करून कोकणाची मात्र होरपळ चालविली आहे.

कोकणच्या विकासाच्या गप्पा हा तर कोणत्याही सामाजिक आणि राजकीय व्यक्ती आणि संस्थांचा परवलीचा शब्द झाला आहे. पण खरोखरी विकास होतो आहे का, याचे उत्तर शोधण्याची तसदी त्यांच्याकडून घेतली जात नाही, हे कोकणवासीय जनता प्रत्यही अनुभवत आहे. जैतापूर, नाणार अशा मोठ्या औद्योगिक प्रकल्पांचे सोडून द्या, पण शिवसेनेला भरभरून पाठिंबा देणाऱ्या कोकणवासीयांना विकासाच्या बाबतीत किती अन्याय्य पद्धतीने दूर ठेवले जात आहे, त्याचे एकमेव उदाहरण रत्नागिरी शहराचे देता येईल. रत्नागिरी शहर हे केवळ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे असे नव्हे, तर त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. विविध उपक्रमांसाठी रत्नागिरी म्हणजे एक हब म्हणून विकसित करण्याचा विचार सातत्याने मांडला जात आहे. याच शहरातील पायाभूत सुविधांचा पाया असलेले रस्ते विकासाने जणू भरभरून वाहत आहेत! पावसाळ्यात तर या विकासाचे शिंतोडे पादचाऱ्यांनाही विकासकणांनी चिंब भिजवून टाकत असतात! एवढा सारा विकास नारायण राणे नावाच्या एका शिवसेनेच्या कट्टर विरोधकावर चिखलफेक करण्यासाठी जाणीवपूर्वक तयार केला गेला आहे, असे म्हटल्यास ते वावगे का ठरावे?

या साऱ्या पार्श्वभूमीवर नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युद्धाकडे पाहिले पाहिजे. कोकणविकासाच्या गप्पा मारण्यामध्ये हे नेतेही अर्थातच सध्या अग्रस्थानी आहेत. पण विकासाचे नाव तोंडी लावण्यापुरते असते. जेव्हा या दोन व्यक्तींची नावे परस्परांकडून आणि त्यांच्या संघटनांकडून घेतली जातात, तेव्हा त्यांची वाणी विखाराशिवाय दुसरे काहीच ओकत नाही. एकमेकांच्या कृती त्यांना महाभयंकर आणि जनतेच्या विरोधातील वाटतात. त्यापेक्षाही व्यक्ती म्हणून त्या किती हीन दर्जाच्या आहेत, हेच सांगण्यासाठी त्यांची वैखरी कारणी पडते. त्यांचे त्यांचे भक्त तर ही वैखरी झेलण्यासाठी सरसावलेलेच असतात. त्यातूनच नारायण राणेंवर आता कारवाई झाली आहे. सत्तेचा पुरेपूर उपयोग करून घेण्यात आला आहे.

केवळ एकमेकांवरची आगपाखड म्हणजेच विकास आणि समृद्धी असा समज या दोघांनीही करून घेतला आहे. हा समज नागरिकांनी आपल्या उराशी विकास म्हणून बाळगला पाहिजे, अशीच दोन्ही नेत्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची धारणा आहे. प्रत्यक्षात या दोघांमधील द्वेषाग्नीमुळे कोकण होरपळून निघाले आहे, याचा दोन्ही नेत्यांनी वेळीच विचार करायला हवा आहे. लोकशाही मार्गाने सत्तास्थाने मिळालेल्या या दोन्ही नेत्यांनी सूडाचे राजकारणच सुरू ठेवले, तर या दोन्ही व्यक्ती जोपर्यंत सत्तास्थानी आहेत, तोपर्यंत कोकणाची होरपळ कमी होणार नाही.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २७ ऑगस्ट २०२१)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा २७ ऑगस्टचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
स्थानिक उपलब्ध साधनांच्या साह्याने कमी खर्चात टिकाऊ पाणीसाठवण टाक्यांच्या निर्मितीचे उल्हास परांजपे यांचे तंत्र. त्यांची पुस्तके ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी लिंक्स
‘चला पाणी साठवू या… अर्थात फेरोसिमेंटची किमया’ : shorturl.at/mrsM2
नैसर्गिक धागे-सिमेंट तंत्रज्ञानाने चला पाणी साठवू या!’ : shorturl.at/dFR37

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply