कृषी स्नातकांनी शेतकऱ्यांकडूनही ज्ञान घ्यावे – राज्यपाल कोश्यारी

दापोली : भारतातील सामान्य शेतकऱ्याकडे शेतीचे पारंपरिक ज्ञान असून कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांकडूनही कृषिविषयक अनेक गोष्टी शिकल्या पाहिजेत, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या ३९ व्या पदवीप्रदान समारंभात राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. त्यावेळी राजभवन येथून सहभागी होताना ते बोलत होते. ते म्हणाले, भारत अन्नधान्य उत्पादन, दुग्ध उत्पादन आणि मत्स्योत्पादनांच्या बाबतीत स्वयंपूर्णच नाही तर निर्यातदारदेखील झाला आहे. कृषी क्षेत्रांत नैसर्गिक शेती, पेटेंट, भौगोलिक मानांकन यांमुळे शेतकऱ्यांसाठी समृद्धीची नवनवी दालने उघडत आहेत. अशावेळी कृषी स्नातकांनी नोकरीच्या मागे न लागता कृषी क्षेत्रात नवी क्रांती आणण्यासाठी प्रयत्न करावे. प्राचीन काळापासून भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी आणि कृषीवर आधारित उद्योग, फलोत्पादन यांमुळे देश संपन्न आहे. मधल्या काळात देशाने अनेक दुष्काळ पहिले. नंतरच्या काळात हरित क्रांती आली. अलीकडच्या काळात धवल क्रांती आणि नील क्रांतीच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. ‘उत्तम खेती, मध्यम बान, निकृष्ट चाकरी, भीख निदान’ या जुन्या काळातील प्रचलित म्हणीचा दाखला देऊन राज्यपालांनी युवकांना कृषी क्षेत्रात येण्याचे आवाहन केले. कृषी विद्यापीठांमध्ये नवनवे संशोधन होत असून आपण नुकतेच परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संशोधन पाहून आल्याचे राज्यपालांनी सांगितले. या संशोधनामुळे आपण प्रभावित झाल्याचे सांगून हे संशोधन प्रयोगशाळेतून शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी कृषिमंत्री आणि विद्यापीठाचे प्रकुलपती दादाजी भुसे यांनी संबोधन केले, तर कृषि वैज्ञानिक निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी यांनी दीक्षांत भाषण केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी विद्यापीठ अहवालाचे वाचन केले.

दीक्षांत समारंभात दोन हजार ८७ स्नातकांना पदवी, पदविका, पदव्युत्तर आणि आचार्य पदव्या प्रदान करण्यात आल्या. तसेच विशेष प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply