बदलायला लावणारा गणेशोत्सव

करोनाच्या सावटाखाली दुसरा गणेशोत्सव यावर्षी साजरा होणार आहे. तो साजरा करताना गेल्या वर्षीप्रमाणेच अनेक बंधने पाळावी लागणार आहेत. पण दोन वर्षांचा अनुभव लक्षात घेता सव्वाशे वर्षांपेक्षा अधिक परंपरा असलेला सार्वजनिक गणेशोत्सव आणि त्याहून कितीतरी अधिक वर्षे घरोघरी साजरा केला जाणारा गणेशोत्सव या साऱ्यातच बदल करण्याची वेळ आली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास सांगता येतो. त्याची कारणेही ज्ञात आहेत. लोकांनी एकत्र यावे आणि स्वातंत्र्याचा हुंकार मनामनामध्ये घुमावा, हा सार्वजनिक उत्सवाचा उद्देश होता. पण घरोघरचे गणपतिपूजन पिढ्यानपिढ्या सुरू आहे. गणपती हे प्रथम दैवत आहे. म्हणून अग्रपूजेचा मान गणपतीला असतो. सर्व कला आणि विद्यांची अधिष्ठात्री देवता म्हणजे गणेश. व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् म्हणजे व्यासांनी हाताळलेला नाही, असा एकही विषय जगात नाही, असे म्हटले जाते. व्यासांनी सांगितलेले महाभारत गणपतीने लिहून घेतले, अशी आख्यायिका आहे. सारे रीतीरिवाज, प्रथापरंपरा, घटना-घडामोडी, इतिहास, वर्तमान आणि भविष्य याविषयी व्यासांनी सांगितले. ते गणपतीने लिहून ठेवले आहे. दैनंदिन जगण्याचा पाठ्यक्रमच जणू गणपतीने लिहिला आहे. म्हणूनच ते ब्रह्मवाक्य आहे. पण त्यापलीकडे जाऊनही माणूस अनेक कृती करत असतो. त्याला मिळालेल्या जन्मजात बुद्धीचा वापर तो त्यासाठी करतो. गणपती या आराध्य दैवताच्या पूजनाने सृष्टीकर्त्याविषयीची कृतज्ञता तो व्यक्त करत असतो. त्याचा आविष्कार गणेश चतुर्थीला केल्या जाणाऱ्या पूजनामध्ये होत असतो. उत्सवात काळानुरूप विविध बदल होत गेले. योग्य प्रथा आणि परंपरांना अयोग्य आणि अनिष्ट प्रथाही चिकटल्या. पण त्याच योग्य मानल्या जाऊ लागल्या. त्या कोणत्या आणि योग्य पद्धती कोणत्या, याचा विचार करण्याएवढा अवधी आपल्याकडे नाही. पण तो करोनामुळे गेल्या दीड-दोन वर्षात आपल्याला उपलब्ध झाला आहे. त्याचा उपयोग करून अनिष्ट प्रथा आणि परंपरा नष्ट करण्याचा विचार करायला हवा.

लोकांनी एकत्र येण्यासाठी असलेला हा उत्सव लोकांनी एकत्र येऊ नये, तो व्यक्तिगतरीत्या साजरा करावा, अशी वेळ करोनाने आणून ठेवली आहे. धर्म, धार्मिक परंपरा आपापल्या घरापुरत्याच असाव्यात, असाही त्याचा अर्थ निघू शकतो. व्यक्तिगत जीवन वेगळे आणि सार्वजनिक जीवन वेगळे. घरात धार्मिकता ठेवता येते. पण घराबाहेर पडल्यावर समाजात वावरताना माणूस म्हणूनच वावरले पाहिजे, अशीही शिकवण एक प्रकारे करोनाने दिली आहे, असे म्हणावे लागेल. उत्सवात लोकांनी एकत्र येऊ नये आणि पर्यायाने करोना विषाणू संसर्गापासून लोकांनी एकमेकांपासून दूर राहावे, यासाठी विविध निर्बंध जारी करण्यात आले आहेत. ते ठरावीकच भागात का, आपल्यावरच निर्बंध का, निर्बंधांची खरोखरीच गरज आहे का, अशा शंका उपस्थित करून नवे विघ्न कोणीही निर्माण करू नये. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश लक्षात घ्यावा. म्हणजे अनेक प्रश्न सहजासहजी सुटतील. गाजावाजा करूनच उत्सव साजरा करायला हवा का, डामडौल हवाच का, त्याशिवाय उत्सव साजरा करता येतो का, शांतता आणि मंगलमय वातावरणाची खरीखुरी अनुभूती उत्सवाच्या निमित्ताने घेता येते का, याचाही विचार करायला काय हरकत आहे? तो तसा केला तर आणि तो विचार आचरणात आणला तर धर्माधर्मांमध्ये, व्यक्तीव्यक्तींमध्ये, जातीपातींमध्ये निर्माण झालेले वितुष्टरूपी विघ्न लयाला जाईल. तसे ते यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्हावे, नवे बदल घडावेत, नव्या आणि चांगल्या प्रथा निर्माण व्हाव्यात, अशीच अपेक्षा.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १० सप्टेंबर २०२१)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा १० सप्टेंबरचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
स्थानिक उपलब्ध साधनांच्या साह्याने कमी खर्चात टिकाऊ पाणीसाठवण टाक्यांच्या निर्मितीचे उल्हास परांजपे यांचे तंत्र. त्यांची पुस्तके ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी लिंक्स
‘चला पाणी साठवू या… अर्थात फेरोसिमेंटची किमया’ : shorturl.at/mrsM2
नैसर्गिक धागे-सिमेंट तंत्रज्ञानाने चला पाणी साठवू या!’ : shorturl.at/dFR37

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply