विसर्जनाबाबत प्रबोधन आवश्यक

करोनाच्या सावटातही वार्षिक गणेशोत्सव साधेपणाने तरीही मोठ्या उत्साहात साजरा झाला. दरवर्षीप्रमाणेच आपापल्या प्रथांनुसार घरगुती आणि सार्वजनिक उत्सवांच्या मूर्तींचे विसर्जनही होत आहे. दरवर्षी जसा पावसाळा येतो, जसा गणेशोत्सव येतो, त्याच पद्धतीने गणेश विसर्जन हाही मोठा विषय असतो. नद्या आणि पाणवठ्यांमध्ये होणारे मूर्तींचे आणि निर्माल्याचे विसर्जन, त्यातून होणारी प्रदूषणाची समस्या, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे पाण्यात विघटन न झाल्याने होणारी विटंबना हे विषय काही दिवस चर्चिले जातात. त्यानंतर पुढच्या गणपतीपर्यंत ते विसरले जातात. निसर्गाबद्दलची कृतज्ञता म्हणून गणपतीचे पूजन केले जात असेल तर त्याच मूर्तींचे विसर्जन पर्यावरणाची हानी करणारे असता कामा नये, याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी प्रत्यक्ष कृती करायला हवी.

छोट्या गावांमध्येही विसर्जनामुळे प्रदूषण होत असले, तरी फार मोठा फरक पडत नाही. जवळच्या छोट्या-मोठ्या पाणवठ्यांवर किंवा समुद्रामध्ये विसर्जन केले जाते. त्याचा फार मोठा उपद्रव दर्शनी स्वरूपात दिसत नाही. विसर्जनाचा प्रश्न येतो तो प्रामुख्याने छोट्या-मोठ्या शहरांमध्ये. तेथे पालिकांकडून कृत्रिम विसर्जन केंद्रे तयार केली जातात. पण तेथे विसर्जित होणाऱ्या मूर्ती आणि निर्माल्यही शेवटी मोठ्या पाणवठ्यांमध्येच टाकले जाते. लोकांचा त्या पाणवठ्यापर्यंत जाणारा त्रास वाचतो इतकेच. निर्माल्यापासून खताची निर्मिती केवळ प्रायोगिक स्वरूपातच असल्याचे दिसून येते. यावर गांभीर्याने विचार करायला हवा.

कोकणापुरता विचार करायचा झाला तरी समुद्रात आणि नद्यांमध्ये होणारे प्रदूषण रोखता येऊ शकेल. गावागावांमध्ये चिऱ्यांच्या धोकादायक खाणी आहेत. या खाणींचा उपयोग त्या त्या गावांमधील मूर्तिविसर्जनासाठी करता येऊ शकेल. दिवस पावसाळ्याचे असल्यामुळे या खाणींमध्ये भरपूर पाणी असते. तेथे विसर्जन करणे सोपे आणि सुलभही होईल. गावातील सर्व मूर्तींचे विसर्जन त्याच खाणींमध्ये केले तर अनेक हेतू साध्य होऊ शकतील. चिरेखाणी बुजल्या जाऊ शकतील. मूर्तीचे आणि निर्माल्याचेही चांगले विघटन होऊ शकेल. मोठ्या पाणवठ्यांमधील, समुद्रामधील प्रदूषण टाळता येऊ शकेल. रत्नागिरी, चिपळूणसारख्या शहरांमध्ये पालिकांकडून कृत्रिम तलाव तयार केले जातात. तेथे संकलित होणाऱ्या मूर्ती पुन्हा समुद्र किंवा खाड्यांमध्येच विसर्जित केल्या जातात. या पालिकांकडून कचऱ्यासाठी डम्पिंग ग्राऊंड म्हणून जसा परिसरातल्या गावांमधील मोकळ्या जागांचा शोध घेतला जातो, त्याच पद्धतीने धोकादायक चिरेखाणी, उत्खननामुळे निर्माण झालेले खड्डे, भूस्खलनामुळे मुळे तयार झालेल्या धोकादायक घळी इत्यादींचा शोध घेऊन तेथे शहरांमधील मूर्ती आणि निर्माल्य विसर्जन करता येऊ शकेल.

शहरांमध्ये अनेक ठिकाणी गणेशमूर्ती तयार करण्याची प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात. ती लहान मुलांसाठी असतात. मध्यमवयीन व्यक्ती आणि वृद्धांसाठीही छंद म्हणून आणि वेगळेपण म्हणून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातून चांगल्या मूर्तींचे पूजनही केले जाते. पण तयार होणाऱ्या तेथील तसेच इतर ठिकाणच्या मूर्तींचे आणि या मूर्तींचे पूजन केल्यानंतर निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे काय करायचे, याचे प्रशिक्षणही याच शिबिरांमध्ये दिले गेले पाहिजे. कारण मूर्ती साकारणे ही कला असेल तर त्याचे योग्य पद्धतीने विघटन करणारे विसर्जन हासुद्धा त्याच कलेचा एक आविष्कार म्हटला गेला पाहिजे. याशिवाय गणेशमूर्ती जेथे तयार केल्या जातात, तेथेही अशाच पद्धतीने प्रबोधन होईल अशी व्यवस्था करता आल्यास ते आणखी एक वेगळेपण ठरेल.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १७ सप्टेंबर २०२१)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा १७ सप्टेंबरचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply