यश फाउंडेशनच्या उपक्रमात पहिल्या दिवशी ५०० जणांचे लसीकरण

रत्नागिरी : येथील यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजच्या पुढाकाराने आजपासून सुरू झालेल्या करोनाप्रतिबंधक लसीकरणाच्या उपक्रमात पहिल्या दिवशी पाचशे जणांना लस देण्यात आली.

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट, बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक (कोंढवा), पुणे वैद्यकीय सेवा आणि संशोधन प्रतिष्ठान, पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स, दि यश फाउंडेशन, फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशन आणि दक्षिण रत्नागिरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या संयुक्त विद्यमाने आज लसीकरण सुरू झाले. येथील स. रा. देसाई अध्यापक विद्यालयात लसीकरणाचे केंद्र आहे. उद्घाटनपर भाषणात यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त माजी आमदार बाळ माने म्हणाले की, पूर्वीच्या काळी साथीच्या आजारांवर लस उपलब्ध होण्यासाठी बरीच वर्षे लागत होती. परंतु आताच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा आणि प्रोत्साहनामुळे शास्त्रज्ञांनी करोनाप्रतिबंधक लस अल्पावधीत शोधली. रत्नागिरी शहर आणि लगतच्या १६ गावांतील नागरिकांन आणि पुढच्या काळात १२ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांनाही लसीकरण करण्यात येणार आहे. आज सामाजिक बांधिलकीच्या नात्याने विविध संस्थांच्या सहकार्याने कोविशीिल्ड लसीकरण केले जाणार आहे. आता पाच हजार डोस उपलब्ध असून लवकरच आणखी डोसही उपलब्ध होतील.

श्री. माने पुढे म्हणाले, २००६ मध्ये दि यश फाउंडेशनचे नर्सिंग कॉलेज सुरू केले. त्यातून दोन हजारांहून अधिक विद्यार्थी शिकले आणि आज ते विविध रुग्णालयांमध्ये सेवा बजावत आहेत. करोना महामारीच्या कालावधीतहीत्या रुग्णांची चांगली सेवाशुश्रूषा करत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आम्ही महाविद्यालयाच्या माध्यमातून बेटी बचाओ, बेटी पढाओचा संदेश देत आहोत. सामाजिक बांधिलकीने मोठ्या प्रमामात लसीकरण व्हावे याकरिता प्रयत्न केले. याकरिता विविध संस्थांसह रितू छाब्रिया यांचे सहकार्य लाभले. दीड ते दोन लाख व्यक्तींना लसी देण्याची गरज आहे. ग्रामीण भागात लसीकरण वेळेवर होण्याकरिता प्रयत्न आहेत. लसीकरण वाढले पाहिजे याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली होती.

यावेळी व्यासपीठावर फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे मॅनेजर तानाजी काकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुप करमरकर, शिफ्ट इन्चार्ज योगेश सामंत, रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे अध्यक्ष गोविंदभाई पटेल, नगर संघचालक वैद्य महेंद्र पाध्ये, मराठा मंदिर संस्थेचे स्थानिक प्रमुख संतोष नलावडे, प्राचार्य नेताजी कुंभार उपस्थित होते. श्री. काकडे म्हणाले, कोरोनामुळे अनेक लोक बाधित झाले. लॉकडाउन काळात अनेकांचा रोजगार गेला. अशा काळात फिनोलेक्स इंडस्ट्रीजने रितू छाब्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड लॅब, मोबाइल टेस्टिंग सेंटरसह विविध ठिकाणी मदत दिली. आता लसीकरणासाठी मदत केली जात आहे. यापुढेही इंडस्ट्रीजचे सहकार्य कायमस्वरूपी लाभेल. यश फाउंडेशनमध्ये नर्सिंग शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थिनींचे कौतुक आहे. लसीकरणातूनच कोरोनातून आपला बचाव होईल, असे सांगितले.

बाळ माने यांच्या सामाजिक उपक्रमांना मराठा मंडळाचे नेहमीच सहकार्य लाभते. त्यामुळे लसीकरणाच्या या महोत्सवात दि यश फाउंडेशनसोबत स. रा. देसाई अध्यापक विद्यालय, मराठा मंडळही मदत करत आहे. बाळ माने यांचे हे उपक्रम समाजोपयोगी असतात, त्यामुळे त्यांना आम्ही भविष्यातही मदत करणार आहेत, अशी ग्वाही संतोष नलावडे यांनी दिली.

कार्यक्रमाला इन्फिगो आय केअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकुर यांच्यासमवेत मनोज पाटणकर, सचिन वहाळकर, राजेंद्र पटवर्धन, राजन फाळके, राजीव कीर यांच्यासह अनेक जणांनी भेट दिली.

स. रा. देसाई अध्यापक विद्यालयात सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मोफत लसीकरण सुरू राहणार आहे. ऑनस्पॉट नोंदणी आणि ऑनलाइन नोंदणीद्वारे लसीकरण प्रक्रिया होणार आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर राखावे, सॅनिटायझरचा वापर, करावा. कोविन पोर्टलवर नोंदणी करताना दि यश फाउंडेशन, रत्नागिरी केंद्र निवडावे. तेथे पेड (सशुल्क) असे लिहिलेले असले तरीही कोविशील्ड लस मोफत दिली जाणार आहे. त्यावर नोंदणी करावी. नेटवर्कअभावी, माहिती नसणाऱ्या व्यक्तींना ऑनस्पॉट नोंदणी करून लस घेता येईल.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply