देवरूख परिसरातील कलाकारांना बाजारपेठ मिळवून देणार – अजय पित्रे

देवरूख : देवरूख परिसरातील कलाकारांनी बाजारपेठेला आवश्यक असलेल्या वस्तू तयार केल्यास आपण त्याला बाजारपेठ मिळवून देऊ, असे आश्वासन उद्योजक अजय पित्रे यांनी दिले.

देवरूख येथील डी-कॅड कलामहाविद्यालय आणि संगमेश्वर तालुका गणेशमूर्तिकार संघटनेने आज आयोजित केलेल्या गणेशमूर्ती तयार करण्याच्या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. उद्या (दि. ११ ऑक्टोबर) या मूर्तींचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

संगमेश्वर तालुक्यात मातीकाम करणारे अनेक कलाकार आहेत. या कलाकारांनी आर्थिक उत्पन्न अधिक मिळावे, यासाठी सजग होऊन काम करणे गरजेचे आहे. माझ्या आईवडिलांनी म्हणजेच बाळासाहेब आणि विमल पित्रे यांनी नेहमीच कलाकारांना संधी दिली. डी-कॅडची निर्मिती करून कोकणातील कलाकारांना व्यासपीठ दिले. हेच सूत्र मी पुढे सुरू ठेवणार आहे. या भागातील कलाकारांना न्याय मिळवून देणार आहे, असेही ते म्हणाले.

लहान गट आणि खुला गट अशा दोन गटांतशारदोत्सवानिमित्त मातीची गणेशमूर्ती तयार करण्याची स्पर्धा आयोजित केली होती. त्यावेळी श्री. पित्रे बोलत होते. दोन्ही गटांत मिळून चाळीस कलाकारांनी सहभाग घेतला. मातीकामात नवीन कलाकार घडावेत हा यामागचा हेतू आहे.

यावेळी कार्यवाह विजय विरकर, प्राचार्य रणजित मराठे, संदेश झेपले, मूर्तिकार आत्माराम हुमणे, राजेंद्र जाधव, संतोष जामसंडेकर आदींसह प्राध्यापक, मूर्तिकार उपस्थित होते.

लहान मुलांनी तयार केलेल्या गणेशमूर्ती सोमवारी रसिकांना पाहायला मिळणार आहेत.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply