कोटकामते येथील कान्होजी आंग्रेस्थापित श्री भगवती मंदिर

कोटकामते (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) या गावात सुमारे ३८० वर्षांपूर्वी सेनासरखेल कान्होजीराव आंग्रे यांनी श्री भगवती मंदिराचे बांधकाम केले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण मंदिराविषयी वैद्य मुरलीधर प्रभुदेसाई यांनी लिहिलेला हा लेख…

………..

कोटकामते हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड या तालुक्याच्या ठिकाणापासून रस्त्याने सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेले एक छोटेसे खेडेगाव. व्यक्तिगत इनामे आणि संस्थाने खालसा झाली, तरी देवगडमधील अद्याप अस्तित्वात असलेल्या देवस्थान इनामांपैकी एक! या गावच्या सर्व जमिनींवर प्रमुख कब्जेदार म्हणून ‘इनामदार श्री देवी भगवती संस्थान, कोटकामते’ असा शिक्का प्रत्येक जमिनीच्या ७-१२ च्या उताऱ्यावर असतो.

शिलालेख

या गावचे ग्रामदैवत श्री देवी भगवती हिचे मंदिर इतिहासकालीन आहे. सुमारे ३८० वर्षांपूर्वी सेनासरखेल कान्होजीराव आंग्रे यांनी या देवळाचे बांधकाम केले, या अर्थाचा एक शिलालेख मंदिराच्या भिंतीत बसवलेला आहे. पूर्वी या गावी एक किल्ला होता. अद्याप बऱ्यापैकी टिकून असलेला आणि गावात प्रवेश करतानाच डोळ्यांत भरणारा बुरूज आणि तटाचा काही भाग हे त्या किल्ल्याचे अवशेष. या किल्ल्याच्या अस्तित्वामुळेच गावाला नाव मिळाले – ‘कोटकामते’. या गावाला आणि मंदिराला अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे.

मंदिरासमोरची सिंहाची मूर्ती

मंदिरासमोरच असलेल्या एसटी बसथांब्यावर उतरले की प्रथमच लक्ष वेधून घेतात ते देवळासमोरील वड आणि पिंपळ या पुरातन वृक्षांचे विस्तृत पार. (सध्या वीज पडल्याने पिंपळाचे झाड नष्ट झाले आहे.) त्यानंतर देवळाच्या अगदी समोर देवीचे वाहन असलेल्या सिंहाची बसलेल्या स्थितीतील रंगीत मूर्ती दिसते. या मूर्तीमागे एक आणि प्रवेशपायरीच्या दोन्ही बाजूला गाड्यावर ठेवलेल्या दोन तोफा आढळतात. बाजूच्या छोट्या पारावर देवीचे निशाण उभारण्यासाठी उंच लाकडी ढालकाठी आहे. प्रवेशपायरीसमोर उभे राहिले असता मांडातूनच (देवळासमोरील मोकळा भाग) श्री देवी भगवतीच्या मूर्तीचे लांबून मनोहर दर्शन घडते आणि मंदिराचा भव्य प्रवेश दरवाजा दृष्टिपथात येतो.

किल्ल्याच्या भव्य प्रवेशद्वारापाशी असतो तसा एक छोटा दिंडी दरवाजा येथील महाद्वाराला आहे. त्यावरील दोनमजली बांधकामाचा अलीकडे जीर्णोद्धार केला आहे. तेथून आत आल्यावर या मंदिराचे वैशिष्ट्य असलेला भव्य सभामंडप लक्ष वेधून घेतो. सुमारे ७०० ते ८०० माणसे एका वेळी बसू शकतील एवढी त्याची क्षमता आहे. या मंडपाचे भव्य लाकडी खांब, त्यामधील लाकडी महिरपी आणि त्यावरील लाकडातील कोरीवकाम यांचे निरीक्षण करता करता रसिकांचा वेळ केव्हाच निघून जातो. स्थानिक/मुंबई मंडळातर्फे करण्यात आलेल्या रंगकामामुळे लाकडावरील नक्षीकाम अधिकच विलोभनीय वाटते. या सभामंडपाच्या तळाचे बांधकाम संपूर्ण चिरेबंदी आहे. त्यावर लाद्या बसवून जीर्णोद्धार केला आहे.

सभामंडपातून पायऱ्या चढून गेल्यावर आपण गोपुरात येतो. येथेच देवळाच्या दर्शनी भिंतीतील शिलालेख दिसतो. त्यावरून १६३५ मध्ये कान्होजी आंग्रे यांनी या देवालयाचा जीर्णोद्धार केला, हे स्पष्ट होते. येथे अत्यंत सुबक, नाजुक नक्षीकाम असलेली, परंतु भक्कम बांधणीची आणि मुख्य म्हणजे गावातील सुतार मंडळींनीच तयार केलेली सुंदर आणि भव्य पालखी टांगलेली आढळते. या गोपुरातील खांब आणि सभामंडप आणि गोपुरी यांना सांधणाऱ्या भागातील महिरपी यावरील लाकडी नक्षीकाम अधिकच चित्ताकर्षक आहे. येथून आत प्रवेश करण्याच्या दरवाजाच्या चौकटीवरील नक्षीकाम रसिकांची नजर खिळवून ठेवते. वर मध्यभागी कोरलेली श्री गणेशमूर्ती, दोन्ही बाजूला ऋद्धी-सिद्धी आणि बाजूची घोड्यांची तोंडे सर्वच अप्रतिम. या चौकटीच्या दोन्ही बाजूंना पूर्वी सांबराची तोंडे शिंगासह लावलेली असायची.

कोरलेली गणेशमूर्ती

या दरवाजातून आत गेल्यावर आतील मंद प्रकाशाला डोळे सरावेपर्यंत थोडा वेळ जातो. येथून देवालयाच्या गाभाऱ्यापर्यंतचा भाग सेनासरखेल कै. कान्होजी आंग्रे यांनी बांधून घेतला आहे. सहा प्रचंड लाकडी खांबांनी तोललेली लाकडी तक्तपोशी येथे आढळते. दोन माणसांच्या कवेत जेमतेम मावेल एवढा एकेका खांबाचा परीघ आहे. त्याशिवाय प्रत्येक खांबाचा वरचा निम्मा भाग कोरीव नक्षीकामयुक्त आहे. येथील तक्तपोशी समान भागांत विभागलेली असून प्रत्येक भागातील लाकडावरचे नक्षीकाम वेगवेगळे आहे. येथे टांगलेल्या जुन्या घंटांचा नाद कर्णमधुर आहे. डाव्या बाजूला, अंगांत संचार येणाऱ्या चार प्रमुख देवतांचे तरंग नेसवून ठेवलेले दिसतात.

लाकडी महिरप

समोर दिसणाऱ्या गाभाऱ्याचे संपूर्ण बांधकाम वेगळे केलेले आढळते. हे मूळ मंदिर असावे, असा जाणत्यांचा कयास आहे. सामान्यत: श्री शंकराच्या पिंडीवर आढळणाऱ्या घुमटीप्रमाणे याची रचना आहे. आत काळ्या पाषाणात कोरलेली श्री देवी भगवतीची अत्यंत सुबक आणि रेखीव मूर्ती पाहून आपली दृष्टी तिच्यावरून हलवूच नये, असे वाटते. बाजूला सतत तेवणारे लामणदिवे असतात.

लाकडी महिरप

देवळाच्या चारही बाजूंना चिऱ्यांची तटबंदी आहे. देवळाभोवतीचा भाग चिऱ्यांच्या फरसबंदीने बांधलेला आहे. देवीभोवती प्रदक्षिणा घालावयाची असल्यास भाविकांना याच भागाचा वापर करावा लागतो. देवीच्या पालखीच्या प्रदक्षिणेचादेखील हाच मार्ग आहे. आवारात श्री पावणादेवीचे मंदिर असून, ही मूर्ती मात्र संगमरवरी आहे. दुसऱ्या बाजूला कलात्मक बांधणीची विहीर आहे. विहिरीच्या बाजूला धर्मशाळा असून तेथे पुजाऱ्याचे निवासस्थान, तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी निवासाची व्यवस्था आहे. देवालयाच्या मागच्या बाजूला रामेश्वर आणि जटेश्वर यांची जीर्णोद्धार केलेली मंदिरे आहेत.

नवरात्रौत्सव

या गावचा प्रमुख ग्रामोत्सव म्हणजे नवरात्रोत्सव. या काळात देऊळ गजबजलेले असते. या उत्सवात सकाळी आणि सायंकाळी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असतात. नामवंत गायक/गायिका या कार्यक्रमात हजेरी लावतात. मुख्य कार्यक्रम रात्री असतो. त्या वेळी पुराणवाचन, आरती, पालखी-प्रदक्षिणा, पानसुपारी, कीर्तन आणि शेवटी देवीचा संचार असा दररोजचा कार्यक्रम असतो. अष्टमीच्या दिवशी संचार झालेली देवी घरोघरी भेटीला जाते. नवमीच्या दिवशी होम आणि महाप्रसाद असतो. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनाचा आणि सोने लुटण्याचा कार्यक्रम चार देवतांच्या संचारासहित साजरा होतो.

संचार

देवळाबाहेरील आवारात श्री देव रवळनाथ आणि श्री मारुतीची मंदिरे आहेत. याच गावात थोड्या दूर अंतरावरील देवळांना निसर्गरम्य परिसराचा लाभ झाला आहे. आडिवरेवाडी येथील श्री वडची देवी आणि आणि पलीकडच्या वाडीतील श्री ब्राह्मणदेव यांची वाहत्या पाण्याचे सान्निध्य लाभलेली मंदिरे ही निसर्गप्रेमींसाठी पिकनिक स्पॉट्स आहेत.

गावातून प्रमुख जिल्हामार्ग क्र. १३ जातो. येथून सुमारे १७ किलोमीटर अंतरावर सुप्रसिद्ध श्री कुणकेश्वर मंदिर आहे. मालवण आणि कणकवलीपासून कोटकामते गाव सुमारे ५५ किलोमीटर अंतरावर आहे. देवगड, मालवण आणि कणकवलीतून दररोज आणि मुंबईतून आठवड्यातून तीन वेळा एसटीची व्यवस्था आहे. (मंदिरातील अन्य काही फोटोंचा स्लाइड शो, तसंच उत्सवातील काही व्हिडिओ लेखाच्या शेवटी दिले आहेत.)

मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनयोग्य स्थळांच्या यादीत कोटकामते गावाचा अलीकडेच समावेश झाला आहे. सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ कुणकेश्वरला जवळचे रेल्वेस्टेशन असलेल्या कणकवलीशी जोडणारा पर्यटन-मार्ग कोटकामते, खुडी, बुधवळेमार्गे सुरू केल्यास या दुर्लक्षित देवालयाला पर्यटकांसमोर आणायला मदत होईल.

– वैद्य मुरलीधर पुरुषोत्तम प्रभुदेसाई (माजी अध्यक्ष, श्री देवी भगवती संस्थान ट्रस्ट)

मोबाइल : 9422435323
………
(हा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या पहिल्या दिवाळी अंकात (२०१६) प्रकाशित झाला होता. १०० किंवा त्याहून अधिक वर्षे झालेल्या कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण वास्तू, महान व्यक्ती आदींचा मागोवा त्या अंकात घेण्यात आला होता. त्या दिवाळी अंकाचे ई-बुक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply