रत्नागिरी : मतदानाविषयी जनजागृतीसाठी उद्या (दि. १६ नोव्हेंबर) जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगातर्फे नोव्हेंबर महिन्यात मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये १६ नोव्हेंबर रोजी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये नागरिकांना मतदार यादी पाहण्यासाठी, तपासण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार असून यादीचे ग्रामसभेत वाचन करण्यात येणार आहे. गावातील सर्व नागरिकांनी मतदार यादीतील नोंदी तपासून घेणे, काही हरकती असल्यास, नोंदणीमध्ये दुरुस्ती असल्यास किंवा नाव नसल्यास पात्र नागरिकांना त्यांचे नाव नव्याने नोंदविण्याचे असल्यास त्यांना विहित नमुना ग्रामसभेतच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मयत मतदारांची नावे वगळणे, कायम स्थलांतरित मतदारांची वगळणी, लग्न होऊन परगावी गेलेल्या महिलांचे नाव वगळणे तसेच लग्न होऊन अन्य गावांतून आलेल्या माहिलांची नावनोंदणी, दिव्यांग मतदार चिन्हांकित करणे, ज्यांचे वय १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण होणार आहे, त्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्यात येणार आहे.
ग्रामसभेत नागरिकांना ऑनलाइन नोंदणी NVSP पोर्टल/Voter Help line App वरून कशा पद्धतीने करता येईल, याची माहिती देण्यात येईल. याशिवाय २७ आणि २८ नोव्हेंबर या शनिवार-रविवारच्या सुटीच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओ उपस्थित राहून नागरिकांकडून येणारे अर्ज स्वीकारणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केलेल्या आवाहनाचा व्हिडीओ –