रत्नागिरी : मराठी चित्रपट सृष्टीत नाव कमावण्याचे स्वप्न बाळगण्यापासून ते मराठी कलासृष्टीतील मराठी कलाकाराने सर्वांत महागडी गाडी घेण्यापर्यंतची आपली स्वप्ने अफाट कष्ट करत कशी साकारली, याचा पट नाट्य-चित्रपट अभिनेते भरत जाधव यांनी रत्नागिरीत उलगडला.
चतुरंग प्रतिष्ठान आणि रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी वाचनालयाच्या सभागृहात ‘मुक्तसंध्या’ कार्यक्रमात भरत जाधव यांच्या दिलखुलास मुलाखतीतून त्यांची कारकीर्द उलगडली गेली. रत्नागिरीत ‘पुन्हा सही रे सही’ या नाटक दौऱ्यावर असताना त्यांची मुलाखत लेखिका, निवेदिका, अभिनेत्री सौ. संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी घेतली.
लॉकडाउननंतरच्या चतुरंग प्रतिष्ठानच्या पहिल्याच ऑफलाइन कार्यक्रमाला रत्नागिरीकर प्रेक्षक-श्रोत्यांनी आवर्जून उपस्थित होते. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय एक यशस्वी अभिनेता होऊन मराठी नाटक तसेच चित्रपटांत आपला वेगळाच ठसा उमटवणाऱ्या भरत जाधव यांचा रंगमंच आणि रूपेरी पडद्यावरचा अनेक चढउतारांचा, प्रेरणादायी जिद्दीचा अथक प्रवास या मुलाखतीत रसिकांना जाणून घेता आला. कॉलेजमध्ये प्रवेश एकांकिका करण्यासाठी घेतला, असे भरत जाधव सांगतात. यावरून त्यांची कलाकार म्हणून असलेली तळमळ अधोरेखित होते. याच तळमळीतून जिद्द आणि अथक प्रयत्नांनी उंच भरारी घेणाऱ्या भरत जाधव यांची पुढच्या यशस्वी वाटचालीतील दोन लोकप्रिय नाटके म्हणजे ऑल दी बेस्ट आणि सही रे सही. ‘ऑल दी बेस्ट’ नाटकाचे एका वर्षात ४३३ प्रयोग झाले आणि ते ‘लिम्का रेकॉर्ड बुक’मध्येही झळकले. ‘सही रे सही’ या नाटकाने त्याही पुढच्या रेकॉर्डचा टप्पा गाठला आणि एका वर्षात ५६७ प्रयोग केले. पुढे याच नाटकाने तीन हजाराचाही टप्पा ओलांडला. या दोन नाटकांविषयी त्यांनी मुलाखतीत भरभरून सांगितले. मुलाखत घेणाऱ्या सौ. संपदा या त्यांच्या ‘ऑल दी बेस्ट’ नाटकातील प्रारंभीच्या एक सहकलाकार होत्या.
‘अधांतर’ या जयंत पवार यांच्या नाटकात काम केल्यानंतर प्रद्युम्न कुलकर्णी यांच्या ‘प्रपंच’ मालिकेत जाधव यांनी काम केले. दादा कोंडकेंसारख्या विनोदाच्या बादशहाची शाबासकीची थाप त्यांना लाभली. पु. ल. देशपांडे यांची ‘पोरं वाघ मागे लागल्यासारखी प्रयोग करतायत’ ही प्रशस्तीदेखील त्यांच्याकरिता खूप महत्वाची ठरली. त्यांचा पहिला चित्रपट ‘चालू नवरा भोळी बायको’ हा होता. ‘पछाडलेला’ हा त्यांचा मराठी चित्रपट सुपरहिट ठरला. ‘जत्रा’ या चित्रपटाचा प्रभाव अजूनदेखील प्रेक्षकांवर असल्याचे जाधव नमूद करतात. त्यांच्या ६ ते ७ चित्रपटांची सिल्व्हर ज्युबिली झालेली असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून लपत नव्हता. ‘शिक्षणाच्या आयचा घो’ , ‘वन रूम किचन’, ‘क्षणभर विश्रांती’ ‘ बकुळा नामदेव घोटाळे’ या उत्तम भूमिकाअसलेले चित्रपट त्यांच्या आवडीचे आहेत. ‘ढॅण्टढॅण’ या व्यावसायिक नाटकाबरोबर ‘श्रीमंत दामोदरपंत’ हे नाटकदेखील लोकप्रिय झाले. आपल्या सहकलाकारांची अडचण लक्षात घेता अभिनेते भरत जाधव यांनी स्वतःच्या ‘व्हॅनिटी बस’ची सोय सहकलाकारांसाठी उपलब्ध करून दिली. अशी अभिमानास्पद उपलब्धी करून देणारे ते बहुधा पहिले मराठी कलाकार असावेत. त्यांनी स्वतःच्या ‘भरत जाधव एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीची निर्मिती केली आहे.
चित्रपटसृष्टीत काम करताना अंकुश चौधरी, केदार शिंदे, सुधीर भट यांसारख्या व्यक्तिमत्त्वांनी त्यांच्या आयुष्यात मोलाचे मार्गदर्शन केले. एक कलाकार म्हणून कितीही मोठेपणा लाभला तरी माणूस म्हणून जमिनीवरच राहणे ते पसंत करतात. आतापर्यंत शंभरापेक्षाही जास्त चित्रपटांत काम केलेल्या या कलावंताने लॉकडाउनच्या काळात आपल्या जमिनीत केशर-आंबा लागवड करून स्वतःचे फार्महाऊस तयार केले आहे. एक कलाकार म्हणून आलेले अत्यंत हृद्य तसेच कटू-गोड अनुभव त्यांनी प्रांजळपणे ‘मुक्तसंध्ये’त सांगितले.
केवळ चारच दिवसांच्या अल्पावधीत सुनिश्चित केलेल्या या कार्यक्रमातील दोन्ही कलाकारांचे स्वागत रत्नागिरी नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले. चतुरंग कार्यकर्ती राधा सोहोनी हिने कार्यक्रमाची प्रस्तावना केली तर चतुरंगी आर्या वंडकर हिने कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.