रत्नागिरी : करोना विषाणूच्या ओमिक्रॉन या नव्या व्हॅरिएंटचा संसर्ग रत्नागिरी जिल्ह्यात कोणालाही झालेला नसल्याचे आज (६ डिसेंबर) जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. जिल्ह्यात आज एकही नवा करोनाबाधित आढळला नसून, तीन जण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३२वर आली आहे.
जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, २८ नोव्हेंबर २०२१ पासून रत्नागिरी जिल्ह्यात परदेशातून २१२ नागरिक आले असून, त्यापैकी ११४ नागरिकांचा शोध घेऊन पडताळणी करण्यात आली आहे. त्यापैकी ५१ नागरिकांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली आहे. परदेशातून जिल्ह्यात आलेल्या कोणालाही कोविड संसर्ग झाल्याचे निदर्शनास आलेले नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. २८ नोव्हेंबरपासून परदेशातून रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्यांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – मंडणगड १०, दापोली ३१, खेड ४२, गुहागर ३, चिपळूण ४७, संगमेश्वर १६, रत्नागिरी ५६, लांजा ३, राजापूर ४
दरम्यान, ओमिक्रॉनचा संसर्ग जिल्ह्यात आढळला नसला, तरी नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्यासह जि. प. अध्यक्ष विक्रांत बने, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जि. प. आरोग्य सभापती उदय बने आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ६ डिसेंबर) आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या २४ तासांत करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार १०१ आहे. आज तीन रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ५८० एवढी आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९६.८१ आहे.
जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या सर्व १६० आणि रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या सर्व २२० नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ३९ हजार ५८२ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ३२ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले १७, तर लक्षणे असलेले १५ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या १७, तर संस्थात्मक विलगीकरणात १५ जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. १४ जणांची नावे डुप्लिकेट एंट्रीमुळे कोविड पोर्टलवरून काढून टाकण्यात आली. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ८, तर डीसीएचमध्ये ७ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी ७ जण ऑक्सिजनवर असून, एक रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहे.
आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४८९ आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. या आठवड्यात तो ३.१५ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७४, चिपळूण ४७८, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८२९, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४८९).
लसीकरणाची स्थिती
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या तपशिलानुसार काल (दि. ५ डिसेंबर) करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ४ सत्रे झाली. त्यात १५० जणांनी पहिला, तर १२९ जणांनी दुसरा डोस घेतला. काल एकूण २७९ जणांचे लसीकरण झाले. कालपर्यंत जिल्ह्यातील ९ लाख ६८ हजार २४२ जणांचा पहिला, तर ५ लाख ८ हजार ४६२ जणांचा दुसरा डोस घेऊन झाला आहे. एकूण १४ लाख ७६ हजार ७०४ जणांचे लसीकरण जिल्ह्यात पार पडले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड