सिंधुदुर्गनगरी : व्हीआयपींच्या मोटारीचे सारथ्य आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने केले. तृप्ती मुळीक असे त्यांचे असून त्या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप पाडळी येथील आहेत. सध्या त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस दलामध्ये सेवा बजावत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विविध ठिकाणी उद्घाटनाचे कार्यक्रम होते. मंत्र्यांच्या ताफ्यात अनेक मोटारी होत्या. पोलीस ज्या त्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. मात्र सगळ्यात नजरेस पडेल असे एक दृश्य म्हणजे या तिन्ही मंत्र्यांचे सारथ्य तृप्ती मुळीक यांनी केले. लहानपणापासूनच त्यांना ड्रायव्हिंगची आवड आहे. त्यामुळे त्यांनी व्हीआयपी ड्रायव्हिंग कोर्समध्ये भाग घेतला आणि गेल्या २३ डिसेंबर २०२१ रोजी तो कोर्स त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर आज पहिल्यांदाच व्हीआयपींच्या मोटारीचे प्रत्यक्ष सारथ्य करून त्यांनी जबाबदारी पार पाडली.
आज त्यांच्या या नव्या जबाबदारीचा पहिलाच दिवस होता. त्यांचे ड्रायव्हिंग कौशल्य वाखाणण्याजोगे असून राज्यातील तरुणींना प्रेरणा देणारे आहे. या प्रसंगामुळे माझ्या मनात माझ्या पोलीस विभागाबद्दलचा अभिमान अधिकच वाढला, त्यांना भरपूर शुभेच्छा, अशा भावना गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या.
राज्यात आतापर्यंत महिला कॉन्स्टेबलने उपमुख्यमंत्री किंवा मंत्र्यांच्या मोटारीचे सारथ्य केले नव्हते. आज दिवसभर सिंधुदुर्गात मंत्र्यांचे सारथ्य करणाऱ्या तृप्ती मुळीक यांची जोरदार चर्चा झाली. व्हीआयपी ड्रायव्हिंग करण्याचा आजचा पहिला दिवस असला तरी तृप्ती यांनी कोणतीही भीती मनात न बाळगता आपली जबाबदारी बिनधास्तपणे पार पाडली.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media