रत्नागिरी जिल्ह्याची ओळख सायकल डिस्ट्रिक्ट ऑफ इंडिया म्हणून व्हावी – धनंजय मदन

खेड : मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात होणारे सायकलिंग बघता रत्नागिरी जिल्हा हा संपूर्ण जगात सायकल डिस्ट्रिक्ट ऑफ इंडिया म्हणून ओळखला जावा, अशी अपेक्षा अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण संघाचे उपाध्यक्ष धनंजय मदन यांनी व्यक्त केली.

खेड येथील पाटणे लॉन्स येथे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले सायकल संमेलन काल (दि. २ जानेवारी) अतिशय उत्साहात पार पडले. देश-विदेशातील अनेक ठिकाणी सायकलभ्रमंती केलेले श्री. मदन प्रमुख पाहुणे म्हणून समारंभाला उपस्थित होते. श्री. मदन यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून तसा ठराव सर्वानुमते संमेलनात संमत करण्यात आला. सर्व कोविड नियमांचे पालन करून झालेल्या या संमेलनाला चांगला प्रतिसाद मिळाला.

आगोमचे डॉक्टर महाजन तसेच १३ महिन्यांत २०0 हजार किलोमीटर सायकल चालवून भरतभ्रमण केलेले गंधार कुलकर्णी यांनी यावेळी सायकलभ्रमण या विषयावर संबोधित केले. नवीन सायकलिस्टनी सायकल घेण्यापासून ते सायकल चालवताना घ्यायची काळजी याविषयी चिपळूण सायकलिंग क्लबचे मनोज भाटवडेकर यांनी अत्यंत उपयुक्त माहिती दिली.
२०२० दुबई हाफ आयर्नमॅन फिनिशर आकाश लकेश्री यांनी ट्रायथलॉनची तयारी या विषयावर संबोधित केले. सायकलिंग आणि डाएटच्या योग्य नियोजनामुळे आजारपणतून बरे झालेल्या मृत्युंजय खातू आणि अमित लड्ढा यांचे प्रेरणादायी अनुभव कथन झाले.

जिल्ह्यातील ११ जणांनी २०२१ साली ऑडा फ्रान्स आयोजित करत असलेल्या बीआरएम स्पर्धेचा अतिशय मनाचा एसआर किताब मिळवला. त्यापैकी उपस्थित असलेल्यांची मुलाखत यावेळी झाली.

खेड सायकलिंग क्लबतर्फे आयोजित या पहिल्या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी खेड सायकलिंग क्लबचे विनायक वैद्य, प्रीतम पाटणे, विनायक कुडकर, दीपक नलावडे, शैलेश पेठे, रूपल पाटणे, दापोली सायकलिंग क्लबचे अंबरीश गुरव, चिपळूण सायकलिंग क्लबचे प्रसाद आलेकर, श्रीनिवास गोखले, डॉ. तेजानंद गणपत्ये, रत्नागिरीतील योगेश मोरे, धीरज पाटकर यांनी विशेष मेहनत घेतली.

सूत्रसंचालन धनश्री गोखले आणि प्रसाद देवस्थळी यांनी केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply