रत्नागिरीत २५ जानेवारीला ग्रामीण आणि समुदाय आधारित पर्यटन परिषद

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेने ग्रामीण पर्यटन आणि समुदाय आधारित पर्यटन या विषयावर सलग चौथ्या वर्षी पर्यटन परिषद आयोजित केली आहे. येत्या २५ जानेवारीला राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहात दिवसभर ही परिषद होणार आहे, अशी माहिती रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी दिली.

भाटलेकर यांनी सांगितले की, रत्नागिरीच्या शाश्वत पर्यटन विकासासाठी संस्था कार्यरत आहे. पर्यटन संचालनालय (कोकण विभाग, नवी मुंबई) यांच्या सहकार्याने २५ जानेवारीला राष्ट्रीय पर्यटन दिनाचे औचित्य साधून चौथी रत्नागिरी जिल्हा शाश्वत पर्यटन परिषद होणार आहे. तीन पर्यटन परिषदा आणि एक जागतिक पर्यटन दिन साजरा केल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन परिषदेमुळे चांगले दिवस येऊ लागले आहेत. देशविदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणात रत्नागिरीकडे वळू लागले आहेत. प्रामुख्याने टुरिस्ट गाइड प्रोग्रामसह इतर अनेक प्रशिक्षण कार्यक्रम केल्यामुळे अनेक तरुण सध्या गाइडचे काम करू लागले आहेत.

पर्यटन विकास व्हावा आणि स्थानिक स्तरावर तसेच शासन स्तरावर वेगवेगळ्या सोयीसुविधांसाठी पर्यटन परिषदेतून मागण्या करण्यात येतात. तालुक्यातून येणाऱ्या मागण्या जिल्हा स्तरावरून मंत्रालय स्तरावर पाठवून त्यांचा पाठपुरावा करण्यात येतो. त्यामुळे अनेक सोयीसुविधा जिल्ह्यामध्ये आता निर्माण होत आहेत. शासनही पर्यटन विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे.

अशा विविध उद्देशांनी रत्नागिरीत २५ जानेवारीला आयोजित केलेल्या पर्यटन परिषदेला उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, माजी खासदार नीलेश राणे, पर्यटन संचालनालयाचे कोकण प्रमुख हणमंत हेडे, माजी आमदार बाळासाहेब माने, हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया, उद्योजक शाळिग्राम खातू, संजय यादवराव, डॉ. श्रीधर ठाकूर, रमेश कीर, सुधीर पाटील, आमदार, खासदार व इतर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. करोनाचे निर्बंधामुळे ही परिषद मोजक्याच पर्यटकप्रेमींच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच फेसबुक, यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे श्री. भाटलेकर यांनी सांगितले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply