मुंबई : बाहेर जे घडते, त्याचे प्रतिबिंब अंतर्मनात उमटत असते. भावना, संवेदनाची प्रक्रिया झाली की त्यातून साहित्य जन्म घेते. असे सांगत बाहेरच्या घटनांवर लेखकांनी अधिक व्यक्त व्हायला हवे, असे मत नवोदित लेखकांनी व्यक्त केले.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वांद्रे शाखेतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त “संवाद नव्या लेखकांशी” या कोमसाप युवाशक्ती फेसबुक लाइव्ह मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नवलेखकांनी हे मत व्यक्त केले. एखादी गोष्ट सांगायची तीव्रता अधिक असते, तेव्हा लेखक व्यक्त होत असतो. वातावरणाचे पडसाद मनावर उमटले की साहित्यकृती जन्माला येते असेही यावेळी त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात चुटकीभर गंमत आणि अमेरिका खट्टी-मिठीच्या लेखिका डॉ. मृण्मयी भजक आणि डार्क फॅंटसी १९९३ या पुस्तकाचा लेखक प्रतीक भास्कर यांची मुलाखत राष्ट्रीय कीर्तनकार कविता नाईक यांनी घेतली.
कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांच्या अध्यक्षतेखाली या युवा लेखकांच्या लिखाणावर खुलेपणाने चर्चा झाली. यावेळी माजी अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी प्रास्ताविक केले, तर जिल्हाध्यक्षा लता गुठे, सतीश चिंदरकर यांनी लेखकांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले. युवाशक्ती प्रमुख दीपा ठाणेकर यांनी स्वागत, तर वांद्रे शाखेच्या कार्यवाह मनीषा घेवडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिल्पा गंजी यांनी आभार मानले.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media