निमित्त : स्वरभास्कर बैठक

रत्नागिरीत येत्या ३० जानेवारी २०२२ रोजी सकाळी पावणेसहा वाजल्यापासून मध्यरात्री संपेपर्यंत स्वरभास्कर बैठक होणार आहे. या बैठकीची पार्श्वभूमी.
………..

रत्नागिरीत संगीत महोत्सव सुरू व्हावा ही अनेकांची इच्छा होती. त्यामागची प्रेरणा ही नक्कीच सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची होती हे निर्विवाद! असा एखादाच शास्त्रीय संगीतप्रेमी असेल ज्याने एकदाही सवाई गंधर्व महोत्सव अनुभवला नसेल. सवाईला जाणं हे पंढरपूरच्या वारीइतकंच महत्त्वाचं मानलं आहे रसिकांनी! गेली जवळपास सात दशकं हा महोत्सव कलाकारांना आणि रसिकांना प्रेरणा देत आलाय. कलाकारांना सवाईमध्ये संधी मिळणं भाग्याचं वाटतं, रसिकांना तिथे उपस्थित राहणं हे व्रतस्थ असण्यासारखं वाटतं, तर आयोजकांना सवाईसारखं आयोजन करणं आव्हानात्मक वाटतं. या सगळ्यामागची प्रेरणा एकच होती…… स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी!

तसं बघायला गेलं तर भारतभरच नव्हे तर जगभर भारतीय शास्त्रीय संगीताचे महोत्सव फार पूर्वीपासून सुरू आहेत. जालंधरचा बाबा हरिवल्लभ महोत्सव, ग्वाल्हेरचा तानसेन समारोह, गुजरातमधला ताना-रिरी महोत्सव, खजुराहोचा महोत्सव, गोव्यातला केसरबाई केरकर महोत्सव किंवा आता लंडनमध्ये भरणारा दरबार फेस्टिव्हल हे त्यातले काही! पण सवाई तो सवाईच! तिथली शानच वेगळी! हे असं वेगळेपण कशामुळे निर्माण झालं, याचा विचार केला की लक्षात येतं ते भीमसेनजींचं महत्त्व! त्या एका व्यक्तीच्या अस्तित्वाने हा महोत्सव वार्षिक कर्तव्य होऊन गेला होता हजारो रसिकांसाठी! पण फक्त त्यांच्या उपस्थितीमुळेच हे सगळं असं होत गेलं असं मानणं सर्वथा बरोबर ठरणार नाही. यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते त्यामागच्या हेतूंचं अधिष्ठान, त्यामागचा कार्यकारणभाव! आणि इथेच सवाई गंधर्व संगीत महोत्सव सर्वथा सवाई ठरतो.

संगीत शिक्षण घेण्यासाठी घरदार सोडून बाहेर पडलेल्या भीमसेनजींचा प्रवास येऊन थांबला सवाई गंधर्वांपाशी! गुरू-शिष्य परंपरेत राहून गुरुमुखी ज्ञान प्राप्त करण्यासाठी भीमसेनजी मेहनत करत राहिले. गुरूंनी भरभरून दिलं आणि शिष्याने सजगतेने स्वीकारलं. गुरू देत राहिले आणि भीमसेनजी घेत राहिले. भीमसेन गुरुराज जोशी ते भारतरत्न स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी होण्याचा हा प्रवास त्यांच्या मेहनतीचा, निष्ठेचा, त्यांना मिळालेल्या संगीताचा आणि गुरूवरील अफाट श्रद्धेचा द्योतक आहे. म्हणजे भीमसेनजींना समकालीन अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ कलाकार होते, आहेत. पण पंडितजींचं वेगळेपण उठून दिसतं ते त्यांच्यातल्या आयोजनाच्या कौशल्यामुळे! ज्या गुरूमुळे ज्ञानप्राप्ती झाली, ज्यांच्यामुळे जगण्याची बैठक प्राप्त झाली, त्या सवाई गंधर्वांच्या पहिल्या स्मृतिदिनी पहिला महोत्सव आयोजित केला त्याला आता जवळपास ७० वर्षं होत आली आहेत.

कोणत्याही शिष्याने आपल्या गुरूंच्या स्मृतींसाठी उभं केलेलं सर्वोत्तम स्मारक कुठलं असेल, तर ते सवाई गंधर्व संगीत महोत्सव! जिथे त्यांचा हा शिष्योत्तम, दरवर्षी आपली गायनकला अर्पण करत नतमस्तक होत राहिला आणि महत्त्वाचं म्हणजे समकालीन सर्वच कलाकारांसमोर आपल्या गुरूंची larger than life प्रतिमा निर्माण करत राहिला. गुरूंचं इतकं जिवंत स्मारक उभारलं गेलंय, असं दुसरं उदाहरण विरळाच!

एक कलाकार म्हणून पंडितजी थोरच होते, आहेत. पण आम्हांला भावलं ते त्यांचं आयोजनकौशल्य आणि ही अनन्यसाधारण गुरुभक्ती!

कबीर म्हणतो,
गुरू की करनी गुरू जायेगा,
चेले की करनी चेला,
उड जायेगा हंस अकेला

पण इथे मात्र जरा वेगळं घडलंय. या हंसज्ञेयाला आपल्या राजहंसी अस्तित्वाची जाणीव ज्या गुरूंनी दिली, त्या गुरूंशी या राजहंसाने अद्वैत साधलंय……. सवाई गंधर्व संगीत महोत्सव आता सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव झालाय. गुरू-शिष्याचं हे अद्वैत चिरंतन राखणं हे तुम्हां-आम्हां वारकऱ्यांच्या निष्ठेवर अवलंबून आहे. कार्यक्रमाला जायचं ते फक्त ऐकण्यासाठी किंवा सादर करण्यासाठी नाही तर आपापल्या गुरूंविषयी असलेल्या आपल्या श्रद्धेला डोळस दिशा देण्यासाठी!

भारतरत्न स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षातील स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

स्वरभास्कर बैठक

सकाळी ५.४५ ते

स्वरभास्कर बैठक

३० जानेवारी २०२२

सकाळी ५.४५ ते मध्यरात्री संपेपर्यंत.

स्थळ : राधाबाई शेट्ये सभागृह,
गो. जो. महाविद्यालय, रत्नागिरी.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply