रामभाऊ सप्रे स्मृती ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेचे ५ आणि ६ फेब्रुवारी रोजी आयोजन

रत्नागिरी : भारतीय बुद्धिबळ इतिहासातील पहिल्या वहिल्या राष्ट्रीय स्पर्धेचे विजेते आणि मूळचे रत्नागिरीचे रामभाऊ सप्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चेसमेन रत्नागिरी व के. जी. एन सरस्वती फाउंडेशनतर्फे येत्या ५ आणि ६ फेब्रुवारीला ऑनलाइन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

या दोन संस्थांकडून २०१३ पासून विविध स्तरावर बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन केले जात आाहे. यंदाची सप्रे स्मृती स्पर्धेचे अकरावे वर्ष आहे. जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या सहकार्याने गेल्या काही वर्षांत राज्यस्तरीय, आंतरराष्ट्रीय गुणांकन, ऑनलाइन अश्या विविध प्रकारच्या स्पर्धा चेसमेन आणि केजीएन सरस्वती फाउंडेशनकडून घेण्यात आल्या आहेत.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षीची स्पर्धा फिडे ऑनलाइन चेस रेग्युलेशन्सच्या नियमावलीनुसार टोर्नेलो या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर खेळवली जाणार आहे. आतापर्यंत ५ देशांतून आणि १८ राज्यांतून ३५० पेक्षा जास्त खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला असून रत्नागिरी व परिसरातील खेळाडूंनीही स्पर्धेत सहभागी होऊन आपले खेळातील कौशल्य दाखवून द्यावे, असे आवाहन जेएसडब्ल्यू फाउंडेशनचे अनिल दधीच यांनी केले आहे.

गतवर्षीच्या स्पर्धेत अंतरराष्ट्रीय गुणांकनाच्या आधारे गट करण्यात आले होते. यावेळेस वयोगटानुसार एकूण ५ गट करण्यात आले असून एकूण ६० हजार रुपयांची रोख बक्षिसे, आकर्षक चषक आणि पदके देऊन खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे. रत्नागिरीतील अधिकाधिक खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी व्हावे, यासाठी जिल्ह्यातील खेळाडूंना विशेष उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार असल्याचे चेसमेनचे प्रसन्न आंबुलकर यांनी सांगितले.

केजीएन सरस्वती फाउंडेशन या स्पर्धेशी, सप्रे कुटुंबाशी सदैव जोडली असून प्रतिकूल परिस्थितीतून येऊनही बुद्धिबळ क्षेत्रात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीचे नाव उज्ज्वल करणाऱ्या रामभाऊंच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्पर्धा गेली १० वर्षे घेत असून यापुढेही हा उपक्रम निरंतर सुरू ठेवून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्याचा आपला मानस असल्याचे माधव हिर्लेकर यांनी सांगितले.

सर्व खेळाडूंच्या पडताळणीसाठी झूम व्हिडिओ कॉन्फरन्स सिस्टीमचा वापर करण्यात येणार असून सर्व राउंड संपेपर्यंत खेळाडूंनी आपला कॅमेरा सुरू ठेवणे बंधनकारक राहील. स्पर्धक ही स्पर्धा फक्त कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून खेळू शकतील. ऑनलाइन बुद्धिबळात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे मुख्य पंच विवेक सोहनी यांनी सांगीतले.

स्पर्धेत सर्व तांत्रिक जबाबदारी रत्नागिरीचेच विवेक सोहनी, चैतन्य भिडे, मंगेश मोडक त्यांच्या सहकाऱ्यांसह सांभाळत असून अधिक माहितीसाठी त्यांच्याकडे ९४२२४७४५४६, ८०८७२२००६७, ९४०५३५२३५६ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन दिलीप टिकेकर यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply