साठावी राज्य नाट्य स्पर्धा : रत्नागिरी केंद्र : नाटक पहिले

प्रतिमा : एक गाणे : एका मनस्वी नाट्य कलावतीचा संघर्ष

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी साठावी म्हणजे हीरक महोत्सवी स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू झाली आहे. प्राथमिक फेरीच्या या स्पर्धेचे मुंबईतून ऑनलाइन पद्धतीने एकत्रितरीत्या उद्घाटन झाले. रत्नागिरीच्या केंद्रावर २८ फेब्रुवारीपर्यंत सात नाट्यसंस्थांची नाटके सादर केली जाणार आहेत.

करोनाच्या परिस्थितीमुळे दोन वर्षे बंद असलेल्या नाट्यगृहाचे दरवाजे अलीकडेच उघडले आणि नाट्यरसिक दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात, ती राज्य नाट्य स्पर्धा सुरू झाली. राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीत होणाऱ्या प्राथमिक फेरीत जिल्ह्यातील अनेक नाट्यसंस्था सहभागी होतात. यावर्षी ही स्पर्धा सुरू झाली असून रत्नागिरीच्या स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात स्पर्धेची नाटके सादर केली जात आहेत.

पहिल्या दिवशी २२ फेब्रुवारी रोजी प्रतिमा : एक गाणे या नाटकाने स्पर्धेची सुरुवात झाली. मुचरी (ता. संगमेश्वर) येथील राजयोग कलामंच या संस्थेने हे नाटक सादर केले होते. मनोहर सुर्वे यांनी ते दिग्दर्शित केले. प्रवीण धुमक यांच्या सूचक मांडणी केलेल्या नेपथ्याने कथानकाला साजेशी वातावरण निर्मिती केली होती.

दोन पिढ्यांमधले वैचारिक अंतर, संघर्ष आणि एकट्याचाही मनातील विचारांचा गोंधळ हे विषय कोणत्याही लेखकाला लिहिण्यास प्रवृत्त करतातच. याशिवाय कला नि कलावंत यांच्याकडे हात राखूनच पाहण्याची समाजाची वृत्तीदेखील लेखकांच्या सृजनाला नेहमीच खुणावत असते. मग तो लेखक कथा कादंबरी लिहिणारा असो अथवा नाटककार, हौशी मराठी नाट्यस्पर्धेत सादर झालेले पहिले नाटक हे या प्रश्नांवरच्या कलात्मक रीतीने केलेल्या भाष्याचा सुंदर नमुनाच होतं.
     
नाट्यक्षेत्राला जीवनाचा मार्ग बनविण्याची जबरदस्त इच्छा मनात असणारी आणि त्यासाठी न्यायाधीश असणाऱ्या वडिलांच्या विरोधालाही न जुमानता घराबाहेर पडलेली प्रतिमा ही युवती या नाटकाची नायिका आहे. तिच्याच शब्दांत सांगायचे तर ‘आनंदाच्या प्रवासा’साठी ती निघाली आहे. या प्रवासात तिला भेटणाऱ्या नाट्यक्षेत्रातीलच व्यक्ती आणि ती यांच्यातील संबंधांची गुंतागुंत उलगडताना हे नाटक आयुष्यात येणाऱ्या निरनिराळ्या संघर्षांचे, अंतर्विरोधांचे वेगवेगळ्या प्रकारे होणारे प्रकटीकरण दाखवते.

‘राष्ट्रीय नाट्य विद्यालय’ अर्थात ‘एनएसडी’मध्ये प्रतिमा  नाट्यकलेचे शिक्षण घेऊ लागलीय. तिचा आणि तिचा पत्रमित्र बन्सी यांच्या पत्रव्यवहाराने नाटकाचा प्रारंभ होतो. रंगमंचावर दोन टोकांना दोघे बसलेली आहेत. तिचे पत्र तो वाचतो तेव्हा त्याच्यासमोर कागद असतो नि तिचा आवाज येत असतो. शेवटी ‘प्रतिमा’ हे पत्रलेखिकेचं नाव तो उच्चारतो. त्याचे पत्र ती वाचते तेही अशाच रीतीने! या सादरीकरणातून या प्रयोगातील नवीनता ध्यानात येऊ लागते.

सेटच्या मध्यभागी फ्लॅटच्या गॅलरीत उघडतो त्या पद्धतीचा मोठा दरवाजा. त्याच्या दोन्ही बाजूंना चित्रांचे मोठे कॅनव्हास. त्यातले वाळवंटात चालणाऱ्या उंटांचे चित्र लक्ष वेधून घेते. दुसऱ्या बाजूला भिंतीवर टांगलेली न्यायदेवतेची तसबीर नि खाली वकिलांच्या कचेरीत असतात तसल्या पुस्तकांचे कपाट. खरे म्हणजे तो सेटमधला भाग आहे, पण खऱ्या रॅक आणि पुस्तकांऐवजी मोठ्या चित्राने तो दाखवलाय. प्रतिमाचे वडील वरिष्ठ न्यायालयातील न्यायाधीश, त्यांच्या पेशाला शोभेलशी पार्श्वभूमी आहे ती.

प्रतिमा एक मनस्वी कलावंत आहे. कलेची उपासना, कलेचा आस्वाद आणि कलेतून आनंद हा तिचा मार्ग तिनेच निवडलाय. न्यायाधीश वडिलांची इच्छा की तिने गणितात प्रावीण्य मिळवून रँग्लर ही त्या विषयातली सर्वोच्च बहुमानाची पदवी प्राप्त करावी. पण प्रतिमाला ते मान्य नाही. तिच्या भावाने वडिलांच्या इच्छेखातर चित्रकलेचा छंद बाजूला ठेवून ‘हार्वर्ड’मधून मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. प्रतिमाने मात्र नाट्यक्षेत्राचा मार्ग निर्धाराने निवडला. या मार्गाने वाटचाल करताना तिच्या आयुष्यात वडील आणि आणखी चौघे येतात. वडिलांच्या, कदाचित थोड्या अधिक वयाचे राजाजी हे ‘एनएसडी’चे प्रमुख. ग्रीक नाट्यशास्त्राचे त्यांनी वर्गात दिलेले धडे प्रतिमाला पटत नाहीत. ती त्यात बदल करून प्रयोग करू पाहते. ते नाटक तसंच झालं पाहिजे, या मताशी ठाम असलेले राजाजी तिला परवानगी नाकारतात. प्रतिमाला ते कलावंत असण्यापेक्षा प्रशासक अधिक आहेत हे कळून चुकते. तिला त्या नाटकांना आधुनिक बाज द्यायचाय. सगळे कथानक पात्रांनी सादर केल्यावर ‘म्हणून मुलांनो, तुम्हीही बोध घ्या’ या थाटाचे निवेदकाचे प्राचीन ग्रीक पद्धतीचे भाष्य तिला नकोय. ग्रीक ऑर्केस्ट्राऐवजी देशी संगीत ती त्यात आणू पाहतेय.

तिची वाट सोपी नाहीच. पण ती मागे वळत नाही. आपल्या स्वप्नातले गाव केव्हातरी सापडेल हा आशावाद तिला साथ देतो. बन्सी हा आधी पत्रमित्र आणि मग प्रत्यक्ष भेटलेला तरुणही अशाच स्वप्नामागे फिरणारा. “हे भिकेचे डोहाळे, बाहेर अंधार आहे,” असे जेव्हा त्याचे काका म्हणाले होते तेव्हा “असूदे, मी माझी एक पणती लावीन,” असे उत्तर देऊन निर्धारानं बाहेर पडलेला.

दरम्यान, प्रतिमाबरोबर नाट्यशास्त्र शिकणाऱ्या देवाशीषबरोबर तिचे रेशमी नाते जुळते. पण वैचारिक भेदामुळे त्यांचे रस्ते वेगळे होतात. त्याला नाटक करून मोठे व्हायचे आहे, खूप पैसा मिळवायचाय, तिला पैसा, मोठेपणा यांचा उबग आलाय. त्याच्या नाटकात मिळणारी भूमिकाही तिच्या मनातल्या नायिकेशी जुळत नाही, ती नकार देते. “माझीच मी, एकटीच मी, प्रवासात मी” हे पालुपद म्हणत ती भटकत राहते. अनेक दिशा, अंधार, भांबावलेपण याने थकून जाते. आपण एकट्या आहोत, भोवताली भले मोठे शून्य आहे, या वास्तवाच्या जाणिवेनं दमून झोपी जाते…..

आणि तिला जाग येते “केसरिया..…” या राजस्थानी गायनाच्या स्वरांनी, ती मोहरते.   “मला गाव दिसलं, स्वप्नातलं गाव! ही भारून टाकणारी पहाट, हे स्वच्छ दाणेदार सूर… आणि तो चेहरा, आनंदी चेहरा, निश्चयी चेहरा,” तिचं निवेदन बन्सी हरवून, हरखून ऐकत राहतो.

प्रतिमा सांगत असते, “…. तो राजस्थानी तरुण बोलू लागतो, लढाई असेल छोटी, पण हिम्मत मोठी, तीच दाखवतो आम्ही.” मी समजावून घ्यायला लागले त्याला, त्याच्या राजस्थानला. “आमच्या ठेक्यानं तुमचे पाय नाचले नाहीत तर पुन्हा येणार नाही इथं” हा त्याचा आत्मविश्वास तिला प्रभावित करतो.

आपल्याला हव्या असलेल्या नाटक जगण्याच्या उन्मुक्त आनंद शोधण्याच्या प्रवासात तिला भेटलेल्या या राजस्थानी जयसिंगमुळे कलेवर, तिच्या अभिजातपणावर प्रेम करण्याचा मार्ग तिला गवसतो, त्या मार्गावर चालणे सुखद वाटू लागते. “बदल घडतच राहणार आहे, आणि या बदलांमुळे नवनिर्मिती होणार आहे. …. माझं गांव, माझी भूमी, माझा रंगमंच” असे म्हणत स्वतःभोवती गिरक्या घेत आनंदात न्हाऊन निघते.

तिचे हे निवेदन ऐकता ऐकता बन्सीच्या मनातला गोंधळही नाहीसा होतो, तिच्यापुढे नतमस्तक होऊन तो पुढच्या प्रवासाला निघतो.

प्रतिमाच्या मुख्य भूमिकेत आहे आसावरी आखाडे. नाट्यकलेचा आस्वाद घेण्याची तळमळ असणारी युवती तिने उत्कटतेने सादर केलीय. विविध प्रसंगातील तिचा मुद्राभिनय, आनंदाचा शोध घेत हरवून जाणं, गिरक्या घेऊन आनंद व्यक्त करणं जेवढ्या ताकदीने साकारलंय, तेवढ्याच ताकदीने संघर्षाच्या वेळेचे ठाम राहणे नि दुःखाच्या प्रसंगी कोलमडून पडणेही साकारलेय.

उच्चभ्रू आणि प्रतिष्ठित न्यायाधीशाच्या आतील मूळची दाबून टाकलेली कविता, मुलगी न जुमानता निराळ्या वाटेने निघते तेव्हा बाप म्हणून होणारी तगमग राजेश रेडीज यांनी रंगमंचावर चांगली व्यक्त केलीय. राजाजींची भूमिका दिग्दर्शक सुर्वे यांनीच केलीय. एका प्रथितयश संस्थेच्या प्रमुखपणामुळे प्राप्त झालेला लौकिक आणि वाढते वय यांतून स्वभावात आलेला हेकेखोरपणा त्यांनी परिणामकारक रीतीने दाखवलाय.

  • राजेंद्रप्रसाद मसुरकर, रत्नागिरी (९९६०२४५६०१)

नाटकातील एक दृश्य

………

स्पर्धेत आज, २३ फेब्रुवारी रोजी सादर होणारे नाटक –
थैमान
लेखक-दिग्दर्शक – प्रा. अवधूत भिसे
सादरकर्ते – सागरदीप शैक्षणिक, सांस्कृतिक, कला आणि क्रीडा मंडळ,
पालशेत, ता. गुहागर
स्थळ – स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी.
वेळ – सायंकाळी ७ वाजता

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply