थैमान : ‘करोना’च्या नावाखाली होऊ शकणाऱ्या अनाचारांचा कलात्मक वेध

साठावी राज्य हौशी नाट्य स्पर्धा : रत्नागिरी केंद्र : दिवस तिसरा

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी साठावी म्हणजे हीरक महोत्सवी स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू झाली आहे. या स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात प्राथमिक फेरीतील नाटके २२ फेब्रुवारीपासून सादर होत आहेत. २३ फेब्रुवारीला सादर झालेल्या ‘थैमान’ या नाटकाचा हा परिचय… (नाटकातील एका प्रसंगाचा व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

कोणतीही महत्त्वाची, अनेक लोकांशी संबंधित घटना घडली की त्यानंतर येणारा गणेशोत्सव, रंगावली प्रदर्शन, स्नेहसंमेलन वगैरेमध्ये तिचं प्रतिबिंब पाडणारे देखावे, रांगोळ्या, नाटकं सादर होतात. गेली दोन वर्षं सगळ्या जगाला व्यापून नि झाकोळून टाकणारी ‘कोविड १९’ या विकाराची भयानक साथ आली, तिनं निर्माण केलेली परिस्थिती आणि तिचे परिणाम हा निरनिराळ्या प्रकारच्या सृजनशील कलावंतांना मसाला पुरवणारा विषय ठरणं स्वाभाविक होतं. ‘थैमान’ या नाटकाच्या रूपाने पालशेत येथील ‘सागरदीप शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळा’ने ‘कोविड’ अर्थात ‘करोना’च्या साथीच्या नावाखाली एखादा भयानक गैरव्यवहार कसा होऊ शकेल यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय.

‘थैमान’ सुरू होण्यासाठी पडदा उघडताच समोर दिसतं समाशंभूमीचं दृश्य. संपूर्ण नाटकभर हेच दृश्य आहे. रंगमंचावर मध्यभागी एक दगडी बाक, प्रेक्षकांच्या उजव्या बाजूला वरचा भाग अर्धवर्तुळाकार असलेला एक खिडकीएवढा दरवाजा, त्या खिडकीच्या पुढे तीनचार फुटांचा ओटा. बस्स, एवढंच नेपथ्य. पडदा उघडून काही क्षण होतात तेवढ्यात तीन कोविड योद्धे स्ट्रेचरवरून प्रेत आणतात, ते त्या अर्धवर्तुळाकार खिडकीत ठेवतात. धूर येतो. म्हणजे ती विद्युतदहिनी आहे वाटतं. त्यातलाच एक जण शोक करतो. यानंतर मुख्य कथानक सुरू. 

‘पीपीई किट’ घातलेली महिला येते, मोबाईल मधला फोटो बघून शोक करू लागते. आत्ताच अग्निसंस्कार झाला तो तिचा बाप एक माथाडी कामगार होता, “तुम्ही मुलांना शिकवलं, आम्ही काय दिलं?” म्हणून अश्रू ढाळते.  स्मशानातील नोकर येतो नि छोटंसं गाठोडं तिच्या हातात देतो, या बापाच्या अस्थी. खरं म्हणजे करोनामुळे मेलेल्याच्या अस्थी न्यायला परवानगी नाही, पण स्मशानातील नोकर (ईश्वर) पैसे घेऊन हे काम करतो –

एवढ्यात आत येणाऱ्या दुसऱ्या माणसाला ते दिसतं. त्याचं नांव निळोबा. तोही स्मशानातला नोकरच आहे. त्याला ही खोटी कामं पटत नाहीत. ईश्वर आणखी पांच गाठोडी घेऊन येतो, त्यात पांच लोकांच्या अस्थी आहेत, त्या नक्की कोणाच्या? हा प्रश्न निळोबा विचारतो. ईश्वरला ठाऊक नाही, त्याला त्याच्याशी देणंघेणं नाही. पाचशे रुपये याप्रमाणे अडीच हजार रुपये मिळणार एवढंच त्याला कळतं.

“तू मेलास नि दुसऱ्याच्या अस्थी दिल्या तर?” निळोबा विचारतो. “काय फरक पडतो? मेल्यावर काय?” ईश्वरचं उत्तर.

काही क्षणातच विवेक नावाचा पत्रकार येतो. त्याच्या हातात कॅमेरा. “राख न्यायला इथं कोण येत नाय, तुम्ही कशाला आलात,” अशी विचारपूस निळोबा करतो.

प्लास्टिकमध्ये झाकलेल्या आपल्याच माणसाचे अवयव कोण विकत असेल तर….? तर राक्षस की भुतं याचे फोटो येतात तुमच्या कॅमेऱ्यात?

पत्रकार विचारात पडतो, याला काही तरी दिसलंय, हे खूप भयानक आहे. त्याच्या डोक्यात चक्र फिरू लागतं.

एक जरी प्रेत सापडलं, त्याच्या शरीरातून अवयव काढून घेतल्याचं मीडियाने पोस्टमार्टेम केलं तर बरंच काही उघड होईल. सुकन्या मॅडमच्या कानांवर घातलं पाहिजे. (मघाची मुलगी याची बॉस- सुकन्या)

करोना काळात प्रेतं येतच असतात. असंच आणखी एक नवीन प्रेत कोणीतरी आणतात, पत्रकार आणि निळोबा त्यांच्यावरचं प्लॅस्टिक बाजूला करून फोटो काढतात, तिरडी दाहिनीत टाकताना पत्रकार मुद्दाम ती खाली पाडतो.

“झालेला प्रकार तुम्ही मीडियामधून उघड कराल हो, पण आमची नोकरी जाईल”, निळोबा भीती व्यक्त करतो. पत्रकाराशी गप्पा मारू लागतो. “मी बोलतो कधीकधी या विद्युतदाहिनीशी, एकटाच!”

माणूस मेल्यावर त्याची उत्तरक्रिया करताना कावळ्यांना घास देतात. मग एरवी उकिरड्यावर टाकलेल्या अन्नावर बसणारे कावळे कोण? असे अनेक चमत्कारिक प्रश्न पत्रकाराच्या मनात येत असतात.

आणखी एक प्रेत येतं, फोटो काढतो, प्रतिमा बघून चमकतो, माय गॉड! निळोबा, हे बघा!

निळोबा सांगतो – “काही विशिष्ट डॉक्टरांच्या चिठ्ठ्या घेऊन पेशन्ट येतात, उपचार केले जातात, त्यांचा मृत्यू झाला की इथे आणतात. कोरोनाची लागण होईल या भीतीने

प्रेत नातेवाईकांना दिलं जात नाही याचाच फायदा हे राक्षस घेतात, अवयव रोपण झालं की ऑक्सिजन काढला जातो, सगळं प्री प्लॅन्ड!”

पत्रकाराला कल्पना सुचते. “थोड्या वेळासाठी ही बॉडी मला देता? नेतो आणि आणून देतो”.

मध्यंतरानंतर – प्रेत आणून ठेवलेलं आहे. बाहेर प्रेतावरचे कपडे मागायला मरणाऱ्याचा मुलगा आलाय, इस्त्री करून ठेवायचेत, पैसे मिळणार म्हणून ईश्वर खुश दोन हजार रुपये मिळणार! निळोबा कपडे काढून आणतो, ईश्वर सॅनिटायझर मारतो, हात न लावता काठीने उचलतो, निळोबा खिशातून वस्तू काढतो एकदोन एटीएम कार्ड आणि चाव्या निघतात. यासाठी मुलगा आला कपडे न्यायला, बाप मेला तेव्हा अग्नी द्यायला नव्हता आला.

निळोबा प्रेताशी बोलतो – प्रेताचे कपडे काढून दिले, मला करोना होणार? नर्सेसना रहायला जागा मिळत नाही, त्यांनी कुठे राहायचं ? डॉक्टरमधल्या राक्षसांना सजा होईल की नाही? प्रेत जाळतात.

सुकन्या येते, निळोबाला आणि ईश्वरला कसल्यातरी पिशव्या देते, बाबांची आठवण म्हणून, बहुधा त्यात पोशाखाची कापडं असावीत. पत्रकार येतो, ती जाते. फोटोची पाकिटं देऊन पत्रकार जातो, निळोबा एकेक कागद चितेत टाकतो, जातो.

ईश्वर पाकीट उघडून पाहतो- मला दोनहजार, निळ्याला किती दिले असतील? थोड्याच वेळात मोबाईलवर बातम्या बघतो, “करोनाच्या बॉडीतून अवयव काढून विक्री – ब्रेकिंग न्यूज!”

ईश्वर हादरतो, “माझी नोकरी जाणार …!”

तेवढ्यात भुताने साहेब येतात, “तुझ्याबरोबर आमचे पण बारा वाजवलेस, मीडियावाल्यांनी पुराव्यानिशी दाखवलंय”

“साहेब, काय सेटिंग होत असेल तर बघा, तुम्ही आजपर्यंत सांगितली तेवढी कामं केली साहेब!” साहेबांच्या हातात पाकीट देतो, साहेबांचं मन विरघळतं. “अस्थींचं तसंच चालू राहूदे राजकारण्यांचा मान ठेवावा लागतो.”

निळोबा हातात गाठोडं घेऊन येतो, त्यात मेडिकल कॉलेजमधून आणलेले हातापायांचे तुकडे आहेत, विल्हेवाट लावायला आणलेले. स्वतःशीच बोलू लागतो, “सैतान म्हणजे तरी कोण रे? माणसंच ना?

हे तुकडे तुकडे झालेल्या माणसांच्या शरीराच्या भागांनो, …तुम्ही खरंच बेवारस आहात काय? तुमच्या योगदानामुळे कितीतरी लोकांचे प्राण वाचले, कुणाला आई मिळाली, कुणाला बहीण, मुक्त व्हा, मी तुमच्या अस्थी समुद्रात विसर्जित करीन.”

पत्रकार येतो, ईश्वर त्याला पाडून छाताडावर बसून मारतो. काही काळ जातो. नवीन दृश्य दिसू लागतं.  ईश्वर कुणाशी तरी फोनवर बोलतोय, चेहरा आनंदी,  “क्लीन चिट मिळाली, गावाला आलो की सगळ्यांना चिकन घालणार पैसा हाय तर सगळा हाय.”

निळोबा येतो, नोकरीवरून काढलेला! प्रेत बाहेर न्यायला मदत केली म्हणून. खरे अपराधी सुटून गेलेत!

लोक, नातेवाईक बोलनासे झाले, मलाच चुकीचं ठरवतायत, न्यूजवाला गायब झाला, झाला की केला? तो राक्षसांमध्ये मिसळला तर नसेल ना? खोटं काम करणाऱ्यांना पैसा कसा काय पचतो? डोक्यात प्रश्नांची वादळं थैमान घालतायत. इतक्यात पत्रकार येतो, शाब्दिक धीर देतो. सांगू लागतो, ब्रेकिंग न्यूज खोटी होती, इकडची तिकडची माहिती गोळा करून बनवली होती, ती बनावट होती, पोलीस केस बंद झाली,” निळोबाची प्रश्नोत्तरं……

“बॉडीतून अवयव काढले जातात हे खोटं होतं?”

“तुम्हाला तसं वाटत होतं!”

“मी हरलो, राक्षस जिंकले!” आक्रोश करू लागतो. इकडे पत्रकारही हताशपणे पण आवेगाने बोलू लागतो, “माफ कर निळोबा, प्रेशर आलं होतं, माझी नोकरी गेली असती, या पैशापुढे मी झुकलो, लोकशाहीचा चौथा स्तंभ झुकला!”……   आक्रोश

निळोबा विद्युतदाहिनीच्या खिडकीत उडी घेतो, दोघे ओढू लागतात, पडदा पडतो!

या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं प्रा. अवधूत भिसे यांनी. पापभीरू, सरळमार्गी निळोबा समीर पावसकर यांनी चांगला सादर केलाय, पण कुणाल गमरेने केलेला स्मशानभूमीत करावयाच्या नोकरीला साजेसा रासवट ईश्वर मनावर ठसतो. त्याची अस्सल संगमेश्वरी बोली ‘परफेक्ट’ आहे.

खरंच असं होत असेल का या प्रश्नाने अंगावर नकळत उमटलेले काटे घेऊन प्रेक्षक बाहेर पडतात.

  • राजेंद्रप्रसाद मसुरकर, रत्नागिरी (९९६०२४५६०१)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply