मु. पो. किन्नोर : निरर्थक नि अन्याय्य रूढींविरोधातील बंडाची कथा

साठावी राज्य हौशी नाट्य स्पर्धा : रत्नागिरी केंद्र : सहावा दिवस (अंतिम नाटक)

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी साठावी म्हणजे हीरक महोत्सवी स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू झाली आहे. या स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात प्राथमिक फेरीतील नाटके २२ फेब्रुवारीपासून सादर होत आहेत. २७ फेब्रुवारीला सादर झालेल्या `मु. पो. किन्नोर` या नाटकाचा हा परिचय… (नाटकातील एका प्रसंगाचा व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

हिमालयामध्ये गेलेला पर्यटक, प्रकाश त्याचं नाव, मुखियाचं घर शोधतोय. पारशांसारखे दिसणारे पहाडी लोक भेटतात, राहण्याची व्यवस्था होते. व्यवस्था करणाऱ्या माणसाचे तीन मुलगे, बाप आणि मुलाच्या वयात अंतर कमी हे पर्यटक हेरतो. रात्री त्याचा मोठा मुलगा गोपी खोलीतून ओरडत बाहेर येतो, पाठोपाठ केस पिंजरलेली त्याची पत्नी. त्याच्यात पुरुषत्व नाही, असं त्याची चारच दिवसांपूर्वी लग्न झालेली त्याची पत्नी गंगा म्हणते.

दिवस उजाडल्यावर बैराग्याच्या वेषातील मुखिया येतो. त्यानेच लग्न जमवलेलं आहे. तिला भूतबाधा झालीय, असं सगळे म्हणतात. तिच्यावर लक्ष ठेवायला सांगून जातात, एक भाऊ थांबतो. ती नीटनेटकी आहे. धाकट्या दीराला हा प्रकार सांगते. त्या भागात घरातल्या सर्व मुलांनी एकाच स्त्रीबरोबर लग्न करण्याचा अर्थात बहुपतित्वाचा प्रघात आहे. त्यामुळे आपला भाऊ नपुंसक आहे, हे ऐकून त्याला फार काही वाटत नाही. आपण फसवले गेलोय हे तिला उमगतं.

“एक विचारू, मीसुद्धा तुझा नवरा आहे, तुला माझी भीती नाही वाटत?” वगैरे संवाद. त्याचं कॉलेजमधल्या एका मुलीवर प्रेम आहे. गंगा त्याला अमृता प्रीतमचं पुस्तक आणून देते. थोड्या वेळाने एकटीच असताना पळून जाण्याचा प्रयत्न करते. मुखिया येतो, आता तो पॅन्टशर्ट घालून आहे. प्रत्येक मुलामागे त्याने पैसे मोजलेत, तो गावचा प्रमुख, गावात दहशत. तिचा छळ करतो. सासरा येतो, ओरडतो. मुखिया जातो. पर्यटक या साऱ्याचं चित्रण करतो. घरमालक कोयता घेऊन मुखियाच्या नावाने ओरडत जातो.

सासू मुखियाच्या सांगण्यावरून पंचायत बसवण्यास तयार होते. कुटुंबातल्या सर्वांची चर्चा. सासरा समजूतदार.
“भगवान शंकराशपथ मी सांगते ते खरं आहे.”
“तू कोण ठरवणार तो पुरुष आहे की नाही ते?” सासू विचारते.
गंगा त्याने दिलेल्या त्रासाची माहिती सांगते.
“द्रौपदीमुळे महाभारत घडलं होतं, मी माझ्यावरचा अन्याय सहन करणार नाही.” तिच्यावर प्रेमचंद वगैरे लेखकांचा प्रभाव आहे. सासू जाते. गंगा, कुशी आणि वीरजी घरात. ती घर सोडून जायला निघते. “त्या मुखियाने आज वासनेने माझ्यावर हात टाकला, त्याला विरोध करायला याल तुम्ही?” सासरा आणि कुशी तयार होतात. शेकोटीतल्या अग्नीच्या साक्षीने कुशी तिला लग्नाच्या बंधनातून मुक्त करतो. अनेक स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तिला साथ देण्याची तयारी दाखवतात.

प्रकाश येतो, बहुपतित्वाची चाल असल्याची माहिती वीरजी सांगतो. त्याचे दोन मोठे भाऊ कड्यावरून पडून मृत्यू पावले. सर्वांची मिळून एकच पत्नी! प्रकाश, गंगा, वीरजी आत जातात.

गोपी दारू पिऊन येतो. कुशी गोपी संभाषणातून ते मुखियाचे मुलगे असल्याचं स्पष्ट होतं, गंगासुद्धा त्याचीच मुलगी असं गोपी म्हणतो. हे वास्तव समजल्यावर कुशी अत्यंत अस्वस्थ होतो. (अभिनय झकास!)

कुशीला दवाखान्यात नेऊन आणल्याचं मुखियाला कळतं. वीरजीची पत्नी आणि मधला मुलगा ज्वाला यांची चर्चा. पर्यटकाबद्दल संशय. मुखिया आणि सासू यांचे संबंध आहेत. त्यांच्या समाजात विधवा स्त्रीला घराबाहेर पडता येत नाही, दोन नवरे मेले, तरी धाकटा वीरजी जिवंत असल्यामुळेच कुंथल मुखियाला भेटू शकते. तो तिला आत नेतो, हे लक्षात येऊन गोपी अस्वस्थ होतो. “तुमचं आत काय चाललं होतं?” मुखिया गोपीचा गळा आवळून बाहेर नेतो. त्याला कड्यावरून ढकलून देतो. त्याची आई बाहेर येते आणि प्रकार लक्षात येताच टाहो फोडते.

हा प्रकार गंगाने पाहिलाय. मुखिया तिचा पाठलाग करतो. गंगाची शोधाशोध. मुखियाला सापडते. ती जवळच पडलेला सुरा उचलून सुटण्याचा प्रयत्न करते. त्याला बोलण्यात गुंतवून पळून जाते.

मधला मुलगा ज्वाला दवाखान्यातून येतो, त्याला गोपी दिसत नाही. कसल्या तरी मानसिक धक्क्याने कुशीच्या छातीत कळ आलेली आहे. तुला काय वाटतं, असं आईला विचारतो. वीरजी आणि गंगाला कुशीने एकत्र तर पाहिलं नसेल, असं ती ज्वालाला सांगते. तिला घडलेल्या प्रकारचा अंदाज येतो, पण मनाला पटत नाही. विडी शिलगावते. वीरजी येताच आत जाते. वीरजी गंगाला हाक मारून पाणी आणायला सांगतो. कुंथल पाणी आणते. गंगाची विचारपूस करतो. त्याने कुशीला काहीतरी सांगितलं असं बोलू लागते, गंगाचं नाव घेते, “एवढा नीच मी नाही” गंगेच्या लग्नासाठी तिला मुखियाने पाच हजार रुपये दिल्याचं सांगतो. “एक नवरा असेल तर बाईला आनंदाने राहता येतं. पण आपल्याकडे एकेका बाईला चार चार नवरे. मग पुरुष जातात दुसऱ्या बाईकडे… आजपर्यंत बायको म्हणून एकदाही स्पर्श नाही केला, मग तू तुझ्या वासनेची भूक कशी भागवलीस? तो मुखिया ….”

ती कुशीला भेटायला दवाखान्यात जाते. तो गोपीला हाक मारतो, तेव्हा गोपी घरात नाही हे समजतं. पर्यटक बनून आलेला पत्रकार येतो. आपल्याला कोणीतरी ढकलण्याचा प्रयत्न केल्याचं सांगतो. मुखियाने गोपीला दरीत ढकलल्याचं सांगतो. हकीकत कळल्यावर वीरजी दुःखी होतो….!

ज्वाला आणि कुंथल शोक करत येतात. ती गंगाचं आणि पाहुण्याचं नाव घेते. ज्वाला पोलिसांकडे जातो, वीरजी सत्य सांगतो. “तो बघ पुरावा”, पत्रकार बाहेर येतो.

कुशी घरी येतो, सत्य सांगतो… “आपल्या समाजात स्त्रियांची जशी मुस्कटदाबी होते, तशी पुरुषांची होत नाही? आता पांडवांच्या काळाची परिस्थिती राहिलीय? ….. यापुढे कोणाला पटो न पटो, मी गंगाला साथ द्यायचं ठरवलंय. गंगा कुठंय?” “तुझ्याच खोलीत”, असं पत्रकार सांगतो, गंगा बाहेर येते, मुखियाने गोपीला ढकलल्याचं सांगते…… सगळी हकीकत सांगते. संतप्त ज्वाला म्हणतो, “मुखियाचं काय करायचं?” वीरजी सांगतो, “आपण कशाला? तो शंकरच काय ते करील.”

मुखिया येतो, झटापट वगैरे …. गंगा आतून कोयता घेऊन येते. मुखिया सर्वांच्या पाया पडल्याचं नाटक करत फिल्मी स्टाइलने गंगाला पकडतो. या झटापटीत ज्वाला दरीत पडतो. कुंथल चपळाईने कोयता काढून गंगाला मारण्याचं नाटक करत अचानक मुखियावर वार करते. “वीरजी तू मुक्त आहेस”, असं गंगाला सांगतो, पडदा पडतो.

पांडवांचं नाव घेत हजारो वर्षं पाळली गेलेली बहुपतित्वाची रीत मोडण्यासाठी त्या समाजातल्या भरडल्या गेलेल्यांनीच घेतलेल्या पुढाकाराची ही कहाणी. ही कल्पना नाट्यरूपाने लिहिली प्रा. अवधूत भिसे यांनी, जांभारी येथील श्रीभैरीदेव समितीने ती रंगमंचावर आणली. तसं पाहिलं तर हाताळायला हा विषय अवघडच, रूढी-परंपरा यांच्या चक्रात अडकलेल्या त्या पहाडी माणसांच्या नीती-अनीतीच्या कल्पना काहीशा निराळ्याच, पण गावपुढाऱ्यांची दहशत, आपल्याला नको असणाऱ्यांना चेटूक करणारे ठरवून गावपंचायतीद्वारे नेस्तनाबूत करण्याची पद्धत, स्त्रियांच्या देहाचा व्यापार मांडण्याची वृत्ती हे सगळं सर्वत्र आढळतं तसंच! गावातलेच दोघेतिघे याविरुद्ध दंड थोपटतात हे विशेष.

एकामागून एक रहस्य उलगडत असताना त्या त्या पात्राची होणारी प्रतिक्रिया आणि त्या अनुषंगाने होणारे संवाद, त्यातला जोश, ती ती भावमुद्रा आणि प्रत्येक हालचाल नि संवादाचं अचूक ‘टायमिंग’ हे वाखाणण्याजोगं होतं. या वर्षातील हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी या नाटकासोबत संपली.

मध्यंतराच्या वेळेत या वर्षातील परीक्षक नंदकुमार सावंत (बेस्ट), मुंबई, श्रीपाद जोशी, चंद्रपूर आणि प्राची गोडबोले, सांगली यांना पुस्तक भेट देऊन त्यांचा ऋणनिर्देश करण्यात आला. ‘दि पॉवर ऑफ मीडिया फौंडेशन, दक्षिण रत्नागिरी’कडून पत्रकार अमोल पालये यांना ‘साहित्य रत्न’ पुरस्कार – सन्मानपत्र प्रदान करण्यात आलं.

  • राजेंद्रप्रसाद मसुरकर, रत्नागिरी (९९६०२४५६०१)

…………

परीक्षकांविषयी :
राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील नाटकांचे सादरीकरण २७ फेब्रुवारी २०२२ रोजी समाप्त झाले. स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर २२ ते २७ फेब्रुवारी या काळात सहा नाट्यप्रयोग सादर झाले. या स्पर्धेला परीक्षक म्हणून नंदकुमार सावंत (बेस्ट, मुंबई), श्रीपाद जोशी (चंद्रपूर) आणि प्राची गोडबोले (सांगली) उपस्थित होते. या परीक्षकांचा थोडक्यात परिचय असा :
नंदकुमार सावंत (बेस्ट, मुंबई) : निनाद-गोरेगाव या हौशी नाट्य संस्थेचे १९८४ पासून सक्रिय सभासद. बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाचे मानद सचिव (एकांकिका विभाग). राज्य नाट्य स्पर्धेत ११ नाटकांचे दिग्दर्शन. दिग्दर्शनाची तीन बक्षिसे. अभिनयाची ४ रौप्य पदके, ३ प्रशस्तिपत्रके. प्रकाशयोजनेचे एक प्रशस्तिपत्रक. राज्य नाट्य स्पर्धेत परीक्षक म्हणून ९ वेळा नियुक्ती.
श्रीपाद जोशी (चंद्रपूर) : सुवर्णपदकासह एमए (मराठी).
नट, कवी, नाटककार.
१३ नाटके, एक एकांकिका संग्रह, एक कथासंग्रह, दोन कवितासंग्रह, ३ काव्यनाटिका.
दोन पुस्तकांना राज्य शासनाचा वाङ्मय पुरस्कार.
राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाची दोन रौप्यपदके, तीन प्रमाणपत्रे.
घर अण्णा देशपांडेंचं हे नाटक नाट्यसंपदेतर्फे कै. प्रभाकरपंत पशणीकर यांच्या प्रमुख भूमिकेसह व्यावसायिक रंगभूमीवर सादर.
सौ. प्राची गोडबोले (सांगली) : एमए (इंग्लिश, मराठी, थिएटर).
तुझ्यात जीव रंगला मालिकेत राणाच्या सासूची भूमिका.
राज्य नाट्य स्पर्धा, संस्कृत स्पर्धा, बाल नाट्य स्पर्धेत ३५ वर्षे सहभाग.
राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाची १३ रौप्यपदके, प्रमाणपत्रे.
व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, लेखिका, दिग्दर्शिका.
………….

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply