मुंबई : येथील नेत्रदीप प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे दृष्टिबाधित व्यक्तींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. करोनामुळे यावर्षी या स्पर्धा व्हॉट्सअॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑडिओ स्वरूपात होणार आहेत. वक्तृत्व, पररचित काव्यवाचन, चित्रपट गीत गायन आणि कथाकथन या सर्व स्पर्धा रविवार, २० मार्च रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत होतील.
स्पर्धांचा तपशील असा :
१) वक्तृत्व स्पर्धा : विषय असे – १) लता मंगेशकर – एक अनमोल भारतरत्न, २) युक्रेन-रशिया संघर्ष आणि जागतिक परिणाम, ३) पर्यावरण संवर्धन माझी भूमिका, ४) ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम, ५) राजकीय नेत्यांचे सामाजिक वर्तन. स्पर्धकांना या ५ विषयांपैकी एकाच विषयावर ४ ते ६ मिनिटांत सादरीकरण करता येईल. स्पर्धकांची एकच ऑडिओ क्लिप ग्राह्य धरली जाईल. पाठवलेली ऑडिओ क्लिप डिलीट करून पुन्हा पाठवल्यास ग्राह्य धरली जाणार नाही. स्पर्धकाने आपल्या ऑडिओ क्लिपला एको, बॅकग्राऊंड म्युझिक किंवा व्हॉइस इफेक्ट्स असा कोणताही इफेक्ट देऊ नये.
२) चित्रपट गीत गायन स्पर्धा : स्पर्धकांनी मराठी किंवा हिंदी चित्रपटातील गाण्याचे ४ ते ६ मिनिटांत सादरीकरण करावे. स्टारमेकरसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार नाही. तसेच कोणताही डिजिटल इफेक्ट देता येणार नाही.
३) पररचित काव्यवाचन स्पर्धा : कविता पररचित असावी. सादरीकरणात मूळ कवी अथवा कवयित्रीचे नाव सांगावे. कवितेच्या सादरीकरणामध्ये कोणताही डिजिटल इफेक्ट देऊ नये. कवितांचे वाचन करावे त्या गायन स्वरूपात सादर करू नये.
४) कथाकथन स्पर्धा : कथा सादर करण्याचा कालावधी ८ ते १० मिनिटांचा असेल. कथेच्या सादरीकरणामध्ये कोणताही डिजिटल इफेक्ट देऊ नये.
स्पर्धेसाठी नाव नोंदवण्याची अंतिम तारीख १८ मार्च २०२२ असेल. सर्व स्पर्धकांनी आपल्या कलेचे किंवा आपल्या विषयाचे सादरीकरण मराठी भाषेतच करावे. स्पर्धकांना आपली कला अथवा विषय सादरीकरणासाठी दिलेल्या वेळेपेक्षा ३० सेकंदांचा अतिरिक्त कालावधी ग्राह्य धरला जाईल, सर्व स्पर्धांसाठी परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. एका स्पर्धकाला जास्तीत जास्त तीन स्पर्धांमध्ये सहभाग घेता येईल. स्पर्धकाने आपली कला सादरीकरणाच्या सुरुवातीला आपले संपूर्ण नाव, शहर/गावाचे नाव, नेत्रदीप प्रतिष्ठान हे समूहाचे नाव, स्पर्धेचे नाव आणि कवीचे आणि कवियत्रीचे नाव किंवा कथा सादर करताना कथाकाराचे नाव सांगणे अनिवार्य राहील. स्पर्धकांनी आपल्या अंधत्वाचे प्रमाणपत्र संस्थेने मागणी केल्यानंतर सादर करणे आवश्यक आहे.
सर्व स्पर्धांसाठी यशस्वी झालेल्या पहिल्या तीन विजेत्यांना बक्षिसे दिली जातील. कोणत्याही एका स्पर्धेत सहभागी २० पेक्षा अधिक स्पर्धक असल्यास २ उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जातील. यशस्वी स्पर्धकांना गुणानुक्रम २,५००, २,००० आणि १,५०० रुपयांची पहिली तीन बक्षिसे, तर उत्तेजनार्थ प्रत्येकी १,००० रुपयांचे बक्षीस दिले जाईल. रविवार, २७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता विजयी स्पर्धकांची नावे जाहीर केली जातील. विजेत्यांना बक्षिसाची रक्कम स्पर्धकांच्या स्वतःच्या बचत खात्यात संस्थेतर्फे जमा करण्यात येईल. त्यामुळे सर्व विजेते स्पर्धकांचे बचत खाते असणे अनिवार्य आहे. बक्षिसाची रक्कम इतर कोणाच्याही खात्यात जमा केली जाणार नाही.
स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी तसेच नावनोंदणीासाठी सचिन माने (९९८७३३२९११), निखिल देशमुख (९५९४९९८१७३), रामदास निकम (८०८०६२८६२३) किंवा भाग्यश्री गांधी (७३०३६३७८००) यांच्याशी सायकांळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत संपर्क साधावा. स्पर्धकांनी व्हॉट्सअॅपवर आपले नाव, शहर आणि सहभागी स्पर्धांची नावे लिखित स्वरूपात किंवा ऑडिओ मेसेजच्या माध्यमातून कळवावी.
(गुरुदत्त वाकदेकर)

