रत्नागिरीत ११ मार्चपासून आर्ट सर्कलचा स्वरभास्कर संगीत महोत्सव

रत्नागिरी : येथील आर्ट सर्कलला पंधरावा संगीत महोत्सव येत्या ११ ते १३ मार्च या कालावधीत थिबा पॅलेसच्या प्रांगणामध्ये भरणार आहे. यावर्षी पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दिनिमित्त हा महोत्सव “स्वरभास्कर संगीत महोत्सव” म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

रत्नागिरीच्या सांस्कृतिक कलाक्षेत्रातील या महत्त्वपूर्ण महोत्सवामध्ये पंडित आनंद भाटे, पंडित राम देशपांडे,  बासरीवादक प्रवीण गोडखिंडी, व्हायोलिनवादक यज्ञेश रायकर, गायिका दीपिका भागवत, ऋतुजा लाड यांसारखे दिग्गज आणि तरुण कलाकारांचे गायन आणि वादन ऐकण्याची संधी रत्नागिरीकरांना मिळणार आहे. या कलाकारांसोबत अजय जोगळेकर (संवादिनी), यशवंत वैष्णव, मयंक बेडेकर, सिद्धार्थ पडियार (तबला) यांची साथसंगत असणार आहे.

दरवर्षी हा महोत्सव जानेवारी महिन्याच्या अखेरीला होतो, मात्र यावर्षी करोनाप्रतिबंधक निर्बंधांमुळे महोत्सवाचे नियोजन मार्च महिन्यामध्ये करण्यात येत आहे. गेली चौदा वर्षे अखंड सुरू असलेल्या संगीत महोत्सवाला देशभरामधून अनेक संगीत रसिक भेट देतात.

महोत्सवाची सुरुवात ११ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता दीपिका भागवत आणि ऋतुजा लाड यांच्या सहगायनाने होईल. त्यांना तबलासाथ सिद्धार्थ पडियार तर संवादिनीवर साथ हर्षल काटदरे यांची असेल. त्यानंतर सुप्रसिद्ध गायक पंडित राम देशपांडे व गंधार देशपांडे यांचे गायन होईल. त्यांना तबलासाथ यशवंत वैष्णव व संवादिनी साथ अजय जोगळेकर करतील. 
महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी १२ मार्च रोजी तरुण गायक नागेश आडगावकर यांचे गायन होईल. त्यांना तबलासाथ मयंक बेडेकर आणि संवादिनी साथ चैतन्य पटवर्धन करतील. यानंतर सुप्रसिद्ध बासरीवादक प्रवीण गोडखिंडी आणि त्यांचे पुत्र व शिष्य षड्ज गोडखिंडी यांचे बासरीवादन होईल. त्यांना तबलासाथ ओजस आडिया करतील. 

अखेरच्या दिवशी १३ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता यज्ञेश रायकर यांचे व्हायोलिन वादन होईल, त्यांना तबलासाथ मयंक बेडेकर करतील. त्यानंतर या महोत्सवाची सांगता भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य व किराणा घराण्याचे अग्रणी गायक आनंद भाटे यांच्या गायनाने होणार आहे. त्यांच्या साथीला तबल्यावर भरत कामत आणि संवादिनीवर सुयोग कुंडलकर असणार आहेत.

तिन्ही दिवसांसाठी तिकीटविक्री थिबा राजवाड्याच्या प्रांगणामध्ये सकाळी अकरा वाजल्यापासून करण्यात येणार आहे. आर्ट सर्कलतर्फे दरवर्षी राबवण्यात येणारी मेम्बरशिप योजना सुरू करण्यात आली असून त्यासंदर्भात अधिक चौकशीसाठी 94216 21217 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply